आबाजी - संत भगवानबाबा
'मन' एक अशी वास्तविक संकल्पना की, तिच्या अनंत पैलूंचा अभ्यास करणारी अनेक विद्वान मंडळी होऊन गेली. जीवनाचा अंतिम सार देखील मानवी मनाचा समाधानरुपी 'वर्म' होय. मन खूपच चंचल आहे. अनेक दुःखांचे कारण देखील मनच. या मानवी मनाला नियंत्रित करून, पंच इंद्रियावर ताबा मिळवतो,तो साधू! योगी सतपुरुष म्हणून ओळखला जातो. मानवी मनाच्या उत्तुंग शिखराला गवसणी घालण्या करिता निघालेलं मन, स्थिर - अस्थिर तर आकाशामध्ये स्वच्छंद विहार करतं तेही मनच!
"नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ||"
"मन चंगा तो कठौती में गंगा |"
संत तुकाराम महाराज व संत रोहिदास महाराज,' मना'चे मोठ्या मनाने वर्णन करतात. जिवनाला अंतरंग द्यायचे असतील तर, मन शुद्ध असायला हवे. मन अशुद्ध आहे तर वरवरच्या काय ला कितीही साबण लावून उपयोग काय? कारण त्वचा साफ होईल पण अशुद्ध मन शुद्ध कधी होणार? मन गंगेच्या पाण्यासारखंं स्वच्छ असेल, निर्मळ असेल, कटोती मध्ये गंगा आपल्याला विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे मन कुठे स्थिरावेल की, मग कशामध्ये मग्न होईल? सहज संता शिवाय कोणीही सांगू शकत नाही .
एक संत-महात्मे या भूमीत जन्माला आले. पावन भूमी होती सावरगाव. सावरगाव तसं माळरानावरती वसलेलं. सर्व बाजूंनी डोंगर दरा. सर्व शेती निसर्गावर आधारित. निराजी पाटील यांचे चिरंजीव भगुआबा. भगुआबांना दोन पुत्रं होते, रामजी व तूबाजी. तुबाजीचा विवाह कौतिकाबाईशी झाला. माता कौतिकाबाई सात्विक व गुणसंपन्न होत्या. त्यांच्या सद्गुणांची चर्चा गावभर होत असायची. पाटलाच्या घराण्या बरोबर आई-वडिलांच्या घराण्याचा ही उद्धार केला होता. तुबाजी पाटील व कौतिकाबाईना चार अपत्ये होती - ग्यानबा, ज्ञानबा ,बाबू व शंकर. घर गोकुळासारखं भरलं होतं. तेव्हा मात्र कौतिका बाईंना पाचव्या अपत्याचे डोहाळे लागले. डोहाळे लागले घोडेस्वारीचे,पंढरपूरच्या वारीचे, भजनाचे, कीर्तनाचे. असे आगळेवेगळे डोहाळे लागणारी माता ही अगदी वेगळीच ना! दिवसामागून दिवस जात होते. नऊ महिन्याचा कालावधी कधी सरला ते कळलेच नाही. माता कौतिकाबाई प्रसूत झाल्या. सूर्याने प्रकाशित असणाऱ्या तेजाला त्यांनी जन्म दिला होता. आखीवरेखीव सुंदर रूप, चंद्रप्रकाशा परी शितल काया, साक्षात कोण्या एका तेजस्वी दैवी शक्तीने जन्म घेतला की काय? असा प्रश्न कौतिका मातेला पडायचा. एवढेच काय परिसरातही चर्चा होत असायची. हे बालक विलक्षणच आहे. कारण ,'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ' या उक्तीप्रमाणे बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी हा तेजस्वी बालक जास्तच रडू लागला. म्हणून आजीची धांदल उडालेली .भगुजी नाव कानात म्हटले ,आणि बाळ शांत झाले. आजोबा पोटाला आला . अशी वल्गना करण्यात आली. तूबाजी पाटलांना प्रश्न पडला, वडिलांच्या नावाने आपल्या पोराला कसं बोलावं. म्हणून आई म्हणाली तुझ्या बाबांना तू आबा म्हणायचास ना मग बाळाचे नाव 'आबाजी', असे नामकरण करण्यात आले.
आबाजी चा सांभाळ तळहाताच्या फोडाप्रमाणे माता कौतिका बाईने केला. आबाजीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. सावरगावला शिक्षणाची सुविधा नव्हती. म्हणून ,शिक्षणासाठी मामाचे गाव लोणी ला पाठवण्यात आले. लोणी मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. तेथेही पुढील शिक्षण नव्हते. परिसरामध्ये निजाम- इंग्रजांमध्ये धुमश्चक्री चालायची, त्यात भारतीय स्वातंत्र्याची वारेही मोठ्या जोमाने घुमत होती. त्याचाही परिणाम आबाजीवर होत होता. प्राथमिक शिक्षण आटोपल्यानंतर परत सावरगावला आले. परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे प्रवाह जोमात चाललेले होते. त्यांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आबाजीवर परिणाम होत होता. एव्हाना त्यांची त्यांना आवड होती. कारण, लहानपणापासूनच आईने पोथी, पुराण, राम ,कृष्ण यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे अध्यात्म हे त्यांचे अविभाज्य अंग बनले होते.
नारायण गड म्हणजे, तुबाजी पाटलांचे कुलदैवत . एकदा वारीसाठी ते नारायणगडावर आले, सोबत आपली मुले, आबाजीला पण घेऊन आले. नगद नारायणा चे दर्शन घेतले, माणिक बाबांचे दर्शन घेतले, परत निघाल्यावर आबाजी गाडीतून उतरून माणिक बाबांच्या जवळ जाऊन बसला. अनेक युक्त्या केल्या. परंतु,आबाजी गड सोडायला तयार नाही. हे पाहून माणिक बाबांनाही आश्चर्य वाटले. माणिक बाबांच्या आज्ञेवरून आबाजीला नारायणगडावर ठेवण्यात आले. आबाजीची निस्सीम भक्ती पाहून माणिक बाबा प्रभावित झाले होते. भविष्यातील नारायण गडाचा उत्तराधिकारी म्हणून आबाजी कडं पाहत होते. गुरूदिक्षा साठी माणिक बाबा आवाक् झाले होते .परंतु त्या बालकाची जिद्द चिकाटी परमेश्वरावरील भक्ती व मंदिरावर जाऊन उडी खाली घेणे, हे अचंबित करणारे होते. शेवटी माणिकबाबांनी आबाजीला पारखले व गुरुदिक्षा दिली. एवढंच नाही तर "भगवान" असे नामकरण केले. आबाजी चे भगवान बाबा झाले. पुढील योगसाधनेच्या अभ्यासासाठी भगवान बाबा अर्थात माणिक बाबांचे पट्टशिष्य मुकुंद राजांच्या गुहेमध्ये तपश्चर्येसाठी गेले. दोन - तीन वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर भगवानबाबांना आत्मज्ञान मिळाले. नारायणगडावर परत आल्यानंतर , हभप श्री बंकट स्वामी महाराज यांचे घडाला पाय लागले . भगवान मध्ये एक दिव्य शक्ती आहे. या शक्तीला ज्ञानाची आणखीन गरज आहे. हे त्यांनी ओळखले ,म्हणून स्वामींनी माणिक बाबांना 'भगवान' मागितला. माणिकबाबांनी मोठ्या जड अंतकरणाने , 'हा देवाचा प्रसाद आपण वाटून खाऊया' असं म्हणून मोठ्या जड अंतःकरणाने भगवान बंकट स्वामींच्या स्वाधीन केला. तिथून पुढे भगवान बाबांचे शिक्षण हे आळंदीला झाले. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन शिक्षण संपन्न होऊन भगवान बाबा पुन्हा नारायणगडावर आले.
प्रथमत: गुरु माणिक बाबांचे आशीर्वाद घेऊन नारायण गडावरती दर एकादशीला कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. बाबा आपल्या रसाळ वाणीतून भक्तगणांना ज्ञानेश्वरीच्या अमृत ज्ञानातून देत असत. गडावर भक्तगणांची वर्दळ वाढत चालली होती. बंकट स्वामींचा आशीर्वाद पाठीशी होता. वारकरी संप्रदायाची पताका, मानाच्या शिरपेचात रोवण्यासाठी नारायण गडावरून पहिली दिंडी पंढरपूरला निघाली. पहिल्या दिंडीमध्ये एकूण फक्त 13 वारकरी होते. दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वरांना अपेक्षित असणारी सर्व समभाव अशी होती. सर्व जातींची माणसं होती, पुढे या दिंडीचे रूपांतर खूप मोठ्या जनसागरात झाले. नगद नारायण आणि माणिक बाबा यांच्या आशीर्वादाने भगवान बाबांना ऐश्वर्यसंपन्नता लाभली होती. हा देह फक्त नारायण गडाच्या सेवेसाठी आणि माणिक बाबांची आज्ञा साठी आहे. भगवान बाबांनी अनेक सत्कार्य केले. गडावरील नारळी सप्ताह प्रारंभ सुद्धा बाबांनीच केला होता. पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे साळसिद बाबा यांच्या नावावर पशुहत्या मोठ्या प्रमाणात होत होती. बाबांनी ती अघोरी प्रथा बंद करून त्या ठिकाणी सिद्धनाथाचे मंदिर उभा केले.पशुहत्या बंद झाली. त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातील चिंचाळा येथे अवघडबाबा याच्या नावाखाली गोहत्या केली जायची. हे बाबांना चांगलेच जिव्हारी लागले होते. भगवान बाबांनी त्या काळामध्ये त्या विरोधात बंड पुकारून अध्यात्माच्या मार्गाने अवघडबाबा हा अवघडबाबा नसून नाथ संप्रदायातील 'अडभंगनाथ' आहेत हे सिद्ध केले. "तेथील गोहत्या करण्याऐवजी माझी हत्या करा ,नंतर गोहत्या करा "असा नारा दिला . शेवटी कल्लू रोहिल्यांनी मध्यस्थी करत तेथील गोहत्येला बंदी घातली. पुढे तो रोहिला बाबांचा परम भक्त बनला.
हे ऐश्वर्य सांभाळण्यासाठी मल्ल तयार करण्यात आले. गोरगरीब वरील अन्याय दूर करण्यात येत होते. पुढे या मल्लांचा गडावरील या भरलेल्या धनाकडे लोभाने पाहू लागले किंबहुना ते धन आपल्या घरी असावे अशी लालसा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. भगवान बाबा ना हे मान्य नव्हते. भगवान बाबा विरोधात अनेक प्रकारच्या चांडाळ चौकटी सुरू झाल्य.
बाबा कोणालाही भीक घालत नसत . सर्व मल्ल आखाड्याचे नियोजित असणारा उस्ताद गवळी. कुस्ती मध्ये भगवान बाबांकडून पराभूत झाला. पन्नास खेड्यामध्ये नावलौकिक असणारा गवळी उस्ताद पराभूत झाला, ही बाब गवळीच्या जिव्हारी लागली,आणि तेथून पुढे नारायण गडावर ती कटकारस्थान रचले जाऊ लागले. पुढे उस्ताद भगवानबाबांना त्रास देणारा ठरला . नको त्या गोष्टींना सामोरे जावे लागले .शेवटी सत्वाची परीक्षा म्हणून बाबांनी स्वतः लिंग छेद केला. एवढे मोठे अग्निदिव्य पार करून सुद्धा खळांचा त्रास मात्र थांबला नव्हता. शेवटी माणिक बाबांच्या निधनानंतर नारायण गडावरती जातीय तेढ निर्माण झाला. उत्तराधिकारी, 'महादेव बाबा 'याचे भांडण कोर्टात गेले. कोर्टातून सुप्रीम कोर्टात अर्थात् निजाम दरबारी. दरबारातून निकाल आला. महादेव बाबा उत्तराधिकारी बनले भगवानबाबांनी नारायण गड सोडल.
महंत माणिक बाबांच्या जाण्याने भगवान बाबांच्या उर्वरित योगसाधनेत खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यात खेळांच्या त्रास हा असह्य होता. शेवटी निर्णय घेतला हिमालयात निघून जावे. हिमालयाचा मार्ग पकडला खरा .परंतु, खरवंडी च्या मातेच्या भक्तीपोटी बाबा परत खरवंडी ला आले. धौम्य गडावर राहण्याचे ठरवले. विजयादशमीच्या मुहूर्तावर भगवान बाबांनी सीमोल्लंघन केले. धौम्य गडाची स्थापना केली. धौम्य गडावर बाबा रामतांना परिसर पाहत होता. परिसरातील दुःखी ,शोषितांना आनंद होत होता. भगवान बाबा च्या मनातील हिमालय आता दूर जात आहे. त्यांच्या प्रेमाचे वलय आपल्याला मिळणार आहे. ही आत्मिक समाधानाची हाक सर्व भक्तगणांना सुखावून टाकत होती. पुढे चालून सर्व भक्तगण, 'गड बांधा रे '...ही मोहीम हाती घेतात. सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतर भगवान बाबांच्या नियोजनानुसार आणि मनातील कृती आराखड्यानुसार एक मोठा गड बांधून तयार झाला होता. बाबांच्या चेहऱ्यावर ही नवचैतन्य दिसत होते. एक नवीन वस्तू उभा राहिली होती. याची ख्याती महाराष्ट्रभर पसरली.
तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते विजय विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यशवंतराव चव्हाण भारावून गेले . भगवान बाबांच्या कार्याची तत्परता आणि सिद्धता स्वतः पाहिली होती. महाराष्ट्राच्या मराठी माणसांचे वर्णन करत असताना महाराष्ट्राची सत्ता कोणा संकुचित व्यक्तीच्या हातात जाणार नाही, त्याची जबाबदारी स्वीकारली. संत सांप्रदायाचे आभार मानून त्यासमोर लीन होऊन भगवान बाबांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी,धौम्य गडाचे नामकरण ,"भगवान गड" जाहीर केले . शासकीय दरबारी 'भगवानगड' अशीच नोंद राहील, अशी घोषणा सुद्धा केली. भगवानगड निर्मितीमध्ये पंचक्रोशीतील अबाल वृद्धांचा सिंहाचा वाटा आहे याची जाणीव आशीर्वादपर भाषणामध्ये भगवानबाबांनी करून दिली.
बाबांचे वय वाढत होते. शरीरही आता पहिल्यासारखे साथ देत नव्हते.यातच बाबांना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. डॉक्टर काळजी घ्यायला सांगत होते. बाबा विश्रांती घेतील? हा यक्षप्रश्न सर्वांनाच भेडसावत होता. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा किर्तन रुपी समाजप्रबोधन मात्र अखंड सुरू होते. हृदयविकाराच्या आजाराने बाबा चांगलेच ग्रासले होते. भविष्यातील गडाचा वारसदार हा प्रख्यात पंडित असावा. समाजाची जाण असावी, भगवान गडावरचा प्रपंच यापुढे प्रज्वलित ठेवण्यासाठी एक निष्णात वक्ता असावा, त्याच बरोबर अध्यात्मातील शिरोमणी असावा .अशा अनेक शंका-कुशंका बाबांच्या मनात येत होत्या . त्यासाठी योग्य ' योगी' म्हणून भीमसिंह महाराज समोर दिसत असत . वारसदाराची संकल्पना भीमसिंह महाराज यांच्या कानावर घातली तेव्हा मामासाहेबांचा वारस म्हणून मला नेमायचा, असे म्हणतात. तेव्हा बाबा थोडे निराश झाले. भीमसिंह महाराजांना बाबा म्हणत, 'तुम्ही गडावर या ,कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हालाच बघावी लागणार' त्यानुसार भीमसिंह महाराज भगवान गडावर येत असत.
14 जानेवारी 1965 हा दिवस, मकर संक्रांतीनिमित्त बाबा दर्शनासाठी गादीवर बसले होते. परिसरातील माता माऊली दर्शन घेऊन परत जात होत्या. पुण्यकाळ दिवसभर असल्यामुळे सुवासिनी येत होत्या. खरवंडी च्या बाजीराव पाटलांची सुवासिनी त्यात होत. बाबांचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या पायाला हात लावला . पायांना ताप चढलेला होता. त्यांनी आलेल्या सुवासिनी बरोबर त्याची चर्चा केली. घरी गेल्याबरोबर सासूबाईंच्या कानावर घातले. सासूबाईंनी बाजीराव पाटील यांच्या कानावर घातले. बाजीराव समजायचे ते समजून गेले. डॉ घेऊन टांग्यात बसून गडावर गेले. बाबांची तब्येत बिघडली होती. बाबांना घेऊन ते नगरला गेले. नगर ला गेल्यानंतर बाबांना हृदयविकाराचा दुसरा झटका येऊन गेला आहे. असे सांगण्यात आले. पुढील उपचारासाठी रूबी हॉल पुणे येथील परदेशातील डॉ ग्रॅट कडे घेऊन जावे ,असे सांगण्यात आले.
पुणे येथील रुबी रुग्णालयात भगवान बाबा वरती उपचार सुरू झाले .परंतु काळ बराच पुढे गेलेला होता. बाबांनाही त्यांची जाणीव होती. शेवटच्या समयी ज्ञानेश्वरी चे निरूपण करावे. रुग्णालयांमध्ये ज्ञानेश्वरी वाचन सुरू झाले. सर्व भक्तांना वाटले आता बाबा सुखरूप बाहेर पडतील परंतु 18 जानेवारी 1965 चा दिवस उजाडला बाबांना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानेश्वरी जवळ हवी होती. अंतिम समय छातीवर ज्ञानेश्वरी घेऊन,
ज्ञानोबा!
ज्ञानोबा!!
ज्ञानोबा!!!
म्हणत बाबांची प्राणज्योत मालवली.
📝लेखक :- डोंगरदिवे राहुल रामकिसन