भारतीय राष्ट्रीय-राज्य मार्ग आणि दर्जा Indian- National & state highway and their Quality. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारतीय राष्ट्रीय-राज्य मार्ग आणि दर्जा Indian- National & state highway and their Quality. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

भारतीय राष्ट्रीय-राज्य मार्ग आणि दर्जा


पारतंत्र्यातील भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत यामध्ये जमीन आसमान चा फरक असायला हवा होता. जेव्हा, आपला देश इंग्रजांच्या स्वाधीन होता अर्थात ब्रिटिश राजवट होती. तेव्हा, मात्र भारतातील शासन व्यवस्था ही क्रूर होती.हे मान्य आहे. त्यासाठी भारतीय स्वातंत्र्य सेनानी प्राणाची आहुती देऊन या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी 1942 च्या लढ्यानंतर अनेक घडामोडी झाल्या आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इतिहास आपल्यासाठी नवीन नाही. राष्ट्रीय सणांना इतिहासाची उजळणी अनेक विद्वानांमार्फत केली जाते. त्याची गरज ही आहे की, नवीन पिढीला आपल्या देशाचा इतिहास माहित असावा. त्यानुसार त्यांनी कृती करणे व भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आणि बळकट करणे. भारताचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी त्याची गरज आहे.

इंग्रजांनी भारतात प्रथम रेल्वे निर्माण केली भलेही त्याची सुख सुविधा ही त्यांच्यासाठी त्यांनी केलेली असली तरीही, ती एकदम मजबूत उत्कृष्ट गुणवत्तेची होती. हे  वास्तव. कोणीही नाकारू शकत नाही. 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले', हे काय नवीन नाही. त्यांनी व्यापारही केला ,अन्याय केला अत्याचार केला.  तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण केलेली वास्तुशिल्प, नद्यांवरील पुलं यांची बांधणी एवढी मजबूत होती. ते जाऊन आज 75 वर्षे झाली. तरीही त्या काळात केलेल्या एखाद्या वास्तूची गुणवत्ता आपण पाहत आहोत. एवढेच काय त्यांची कार्यक्षमता संपल्यानंतर आजही भारत सरकारशी ते वस्तू किंवा पूल यांच्या विषयीचा पत्रव्यवहार करतात आणि होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देतात.



वरील दाखले येण्याचा एवढाच उद्देश होता की,आज भारत स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुद्धा आपण साजरा केला. जग भारताकडे एका मोठ्या आशेने पाहत आहे. एक समृद्ध अशी विकसित राष्ट्राची निर्मिती होत असताना 'विकसनशील' शब्द आपल्याला सोडत नाही. मोठी गांभीर्याची गोष्ट जरी असली, तरी सध्याचे राजकारणी त्याकडे एवढे संवेदनशील आहेत असे वाटत नाही. कारण हजारो कोटी रुपये खर्च होऊन सध्याचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले जात आहेत. महामार्गावरील एवढे मोठे खर्च पाहत असताना हृदय भरून येत. आपला भारत हा विकसित होतो आहे याचा अभिमानही वाटतो. परंतु, जेव्हा रस्ते निर्माण होतात तेव्हा मात्र रस्त्याकडे पाहून चिंता वाटते.



डांबरी रस्ते पावसाने खराब होतात. हे जरी मान्य केले. तरीही त्याची गुणवत्ता एवढी कमकुवत असू नये. रस्ता पुढे व्हावा आणि पाठीमागे डांबर उकडून जावे एवढी तरी गुणवत्ता आजच्या गुत्तेदाराने आणि राज्यकर्त्यांनी सांभाळावी. कारण रस्ता निर्माण केला जातो. हजारो, लाखो, करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. त्याचा हिशोबही शासनाला तसा दिला जातो. शासनही त्याप्रमाणे त्याला मंजुरी देते. रोड पूर्ण झाला म्हणून त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट देते. वास्तवात मात्र त्या ठिकाणी खड्ड्यात रोड आहेत? की रोडमध्ये खड्डे आहेत? याचा प्रश्न कोणीही सोडू शकत नाही. भारतातील अनेक राष्ट्रीय किंवा राज्य मार्ग असतील डांबर उखडून खड्डे  पडलेच आहेत . रस्त्यावर निर्माण करण्यात आलेल्या नवीन फुल सुद्धा एक वर्षाच्या आत पडावा , यापेक्षा कौतुकास्पद कामगिरी आधुनिक भारतीय इंजिनिअरिंगची कामगिरी मोठी असू शकते काय ? 



भारतीय स्वातंत्र्यानंतर भारत देश हा लवकरात लवकर विकसित राष्ट्र होईल अशी सर्वांनी अपेक्षा केली होती. भारतीय स्वातंत्र्याचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी "ट्रीस्ट् विथ डेस्टिनी" त्यांचं गाजलेलं भाषण. जग झोपलेला आहे आणि आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत आहोत. हा जल्लोष एवढ्या पुरता मर्यादित न राहता आलेल्या प्रत्येक आवाहनांना तोड देण्यासाठी आपण प्रत्येकाने संघर्ष केला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींचा विसर पडू न देता मोठ्या शक्तीने आणि हिमतीने या देशासाठी अर्थात इमानदारीने स्वयं प्रगती करून घेतली पाहिजे.

आज असे नाईलाजाने शंका येऊ लागते. ब्रिटिश निघून गेले परंतु, त्यांची कूटनीती आणि क्रूरता आजही आपल्या प्रशासन व्यवस्थेने जपून ठेवली आहे की काय? असे   संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतात. 

समाजामध्ये अशी नेहमी चर्चा होत असते की, प्रत्येक रस्ता निर्मितीमध्ये राज्यकर्ता गुत्तेदार आणि प्रशासन व्यवस्थेतील लोक एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जात आहे. रस्ता निर्माण करत असताना त्या रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर कोणीही विचार न करता फक्त आणि फक्त कमिशन कोणाला किती द्यायचे? प्रत्येकाची भागीदारी किती असावी? आणि रस्ता कागदपत्रे कसा पूर्ण करावा? याचा एक नवीन पायंडा स्वतंत्र भारतात अगदी गुण्यागोविंदाने राबवला जातो. वास्तविक याचा कोणालाही पुरावा देता येणार नाही. परंतु अशी चर्चा समाजात दबक्या आवाजाने होत असते. कारण सामान्य माणसांनी अन्याच्या विरोधात बोलू नये हीच अवस्था आज भारतामध्ये सर्वत्र दिसून येते.

भारतातील रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण हे अत्यंत गंभीर आहे. त्याचबरोबर एखादा कर्ता पुरुष त्या कुटुंबातून अपघाताने हिरावून घेतला, तर त्या कुटुंबाची काय परिस्थिती निर्माण होते ? हे ते कुटुंबच जाणे . म्हणून, प्रशासन व्यवस्था आणि राज्यकर्त्यांनी भारतीय जनतेचा पालकत्वाची भूमिका निर्भय आणि इमानदारीने निभावल्यास, रस्तेच काय असं कोणत्याही शाखेतील काम हे सरळ आणि नियमाने केल्यास सामान्य जनतेचे हाल होणार नाही . छोटी बालके आपल्या आई-बाबांना मुकणार नाही. सामान्य जनतेला न्याय मिळेल एवढी माफक अपेक्षा एका भारतीयांनी करावी यात वावगे पणा वाटू नये.

📝🖊Dongardive Rahul.