A great hero Doctor Babasaheb Ambedkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
A great hero Doctor Babasaheb Ambedkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

एक महानायक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

एक महानायक :डॉ.बाबासाहेब आंबेडकर


जाती-पाती, उच-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, गरीब-श्रीमंत, वर्णभेद अशा भयंकर प्रतिकूल परिस्थितीमध्ये असामान्य व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला. प्राचीन कालखंडापासून आज पर्यंत चालू असलेल्या  कूप्रथांचा ज्यांनी बिमोड केला, ते म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर होय. भारतीय समाजव्यवस्था चार वर्णांमध्ये विभागली गेली होती. ब्राह्मण क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्र वर्णांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक जातीला नीच जाति म्हणून अस्पृश्य समजले जाई. अस्पृश्य वर्गामध्ये असणाऱ्या सर्व जातींचा स्पर्श सुद्धा पाप समजले जाई. एखाद्या अस्पृश्य समाजातील व्यक्तीचा, स्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला चुकूनही स्पर्श झाला, तर विटाळ समजला जाई. स्पर्श झालेल्या व्यक्तीचे शुद्धीकरण केले जाई. सर्व सामाजिक अधिकारांपासून वंचित असलेला समाज म्हणजे शुद्र वर्ण होय. एवढेच नाही तर या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश सुद्धा नव्हता. शूद्र वर्णातील व्यक्तीने देवाचे दर्शन घेतल्यास, देव सुद्धा अपवित्र होत असे,देवाचेही शुद्धीकरण केले जायचे ! सार्वजनिक पाणवठे त्यांच्यासाठी खुली नव्हती. सर्व खालच्या दर्जाची कामे करावी लागत होती. जमिनीवर थुंकण्याचा अधिकार नव्हता.  मानवतेला काळिमा फासणारे अशा या दयनीय परिस्थितीमध्ये दलित- पददलित, मागास, वर्णव्यवस्थेने अत्यंत गंभीर हाल करून सोडलेल्या समाजाचा मार्गदाता, उद्धारकर्ता, युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेश मधील महू येथे 14 एप्रिल 1891 ला झाला. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे इंग्रज सरकारच्या महू येथील छावणी मध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते. त्यांना एकूण 14 अपत्य झाली. त्यापैकी आठ जणांचे लहानपणीच निधन झाले. बाळाराम, आनंद,  तुळसा, मंजुळा, गंगा आणि चौदावे अपत्य भीमराव. भीमरावांचा जन्म ज्या जातीत झाला, ती जात " महार". महार या जातीला अस्पृश्य समजले जाई. बालपणा मध्ये खेळण्या-बागडण्याचे दिवस होते. त्याच वेळी ब्रिटिश सरकारने एक निर्णय घेतला.अस्पृश्य वर्गातील सर्व जातीच्या लोकांना ब्रिटिश सेवेतून वगळण्यात आले. स्पृश्यांच्या बाजुने घेतलेला हा  ब्रिटिश कंपनीचा निर्णय होता. नाईलाजाने रामजी सपकाळ यांना महू सोडून सातारा येथे यावे लागले. बालपणातच जातीयतेचे चटके व त्याची गंभीरता भिमराव नी अनुभवली होती. वडिलांवर कबीरपंथाचा प्रभाव होता. रामजी सकपाळ कबीर पंथी भजनामध्ये मग्न होत असत. सहाजिकच सर्व कुटुंब सात्विक होते. अन्याय, अत्याचार, तत्कालीन जातीव्यवस्था या विरोधात सकपाळ उठत असे. भीमराव जसजसे मोठे होऊ लागले, तशी त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता, तर्क-वितर्क करण्याची पद्धत, न्यायप्रियता, हिंसेला हिंसेने तोंड न देता शांती व संयमाने सोडवणे, हे गुण त्यांच्या बालपणातच प्रकर्षाने जाणवत होते. युक्तिवादामध्ये तर त्यांचा आगळा-वेगळा हातखंडा होता. वयाच्या पाचव्या वर्षी ज्या ठिकाणी आईच्या कुशीत वामकुक्षी काढायची,आईशी लाडाने भांडायचं, बाल हट्ट धरायचा, भावंडांशी मौजमस्ती करायची, वडील आल्यानंतर वडिलांशी तक्रार करायची, पुन्हा आईला घट्ट मिठी मारून सर्व विसरून जायचं,आईच्या मायेने पुन्हा नाहून जायचं. ते छत्र हरवलंं. भिमाबाईचा डोकेदुखीच्या आजारांने 20नोव्हेंबर, 1896 ला घात केला. भीमाबाईच्या निधनानंतर भिमराव एकटे पडले. मातृछत्र हरवले हवालदिल झालेले भीमराव आईच्या आठवणींनं कासावीस होत असत. भीमाबाईच्या निधनानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी आत्या मिराबाईवर आली. अत्यंत बिकट परिस्थितीमध्येही मीराबाईने भीमरावांचा लाडाने सांभाळ केला. भीमाबाईच्या निधनानंतर रामजी सकपाळने नातेवाईकांच्या आग्रहाखातर दुसरा विवाह जिजाबाईंशी केला. जिजाबाई च्या आगमनानंतर कुटुंबात थोडासा कलह निर्माण झाला. भीमराव मात्र आपल्या ध्येयापासून कधीही डगमगले नाही. 
भीमराव लहानपणा पासूनच आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी सर्व परिचित होते. 7 नोव्हेंबर 1900 मध्ये, साताऱ्याच्या ,'गव्हर्नमेंट वरनऻक्युलर हायस्कूल' मध्ये प्रवेश घेण्यात आला. अस्पृश्यांसाठी शिक्षण ही त्या काळामध्ये एक अनोखी कल्पना होती. वर्णव्यवस्थेने अस्पृश्यांना शिक्षणाची दारे बंद केली होती. परंतु, ब्रिटीश कंपनीच्या शाळेत त्यांना प्रवेश मिळाला होता. प्रत्येक वर्षी सर्वप्रथम येण्याचा मान भीमरावचा असे. शिक्षण घेत असताना त्यांना जातिव्यवस्थेचे भयानक चटके बसत होते. पावलोपावली त्यांना वर्णव्यवस्थेने बरबटलेली लोक त्रास देत होती. भीमराव कधीही आपल्या ध्येया पासून आणि अभ्यासाच्या व्यासंगा पासुन हटले नाहीत. 1907 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. सकपाळ परिवारामध्ये आनंदाला पारावार उरला नाही. रामजींचा आनंद द्विगुणित झाला होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये बाबासाहेब वर्ण व्यवस्थेतील शूद्र समाजातील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले पहिले विद्यार्थी ठरले. कुशाग्र बुद्धिमत्तेला प्रेरित होऊन बाबासाहेबांचे शिक्षक असणारे आंबेडकर गुरुजी यांनी त्यांचे उपनाम बाबासाहेबांना दिले. तेव्हापासून भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या सतराव्या वर्षी 1908 मध्ये भीमरावांचा विवाह रमाबाईंशी झाला. विवाहानंतरही त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पदवी शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती. भीमराव  चांगल्या गुणांनी पास झाले. 12 डिसेंबर 1912 मध्ये भीमरावांना पहिले अपत्यप्राप्ती झाली, त्याचे नाव 'यशवंत' असे ठेवण्यात आले. 
यशवंतच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत 2 फेब्रुवारी 1913 ला  वडील रामजी सपकाळ यांचे निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली. वडिलांच्या निधनानंतर भीमरावांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची कृपा झाली. उच्च शिक्षणासाठी भीमराव जहाजाने न्यूयॉर्कला 23 जुलै 1913 ला पोहोचले. कोलंबिया विश्वविद्यालयामधून 1915 मध्ये एम.ए. डिग्री प्राप्त केल्यानंतर 10 जून 1916 मध्ये पीएचडी पूर्ण केली. पीएचडी पदवी त्यांना आठ वर्षानंतर प्राप्त झाली. प्रबंध प्रकाशित करण्यासाठी इतका वेळ लागला, कारण पैशाअभावी प्रबंध प्रकाशित करू शकले नाहीत. प्रबंध प्रकाशित झाल्यानंतर , 1924 ला पीएचडी  पदवी  प्रदान करण्यात आली. एवढ्या शिक्षणावर त्यांचा उदरनिर्वाह खूप चांगला झाला असता. ज्ञानाची भूक असणारा सामान्य माणूस ज्ञानासाठी काय करू शकतो, याची कल्पना करणे न करणे बरे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढील शिक्षणाची आस त्यांना सतावत होती. 1916ला  पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. लंडनमध्ये, 'लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक अंड पोलीटिकल सायन्स' या नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवला भीमराव लंडनला गेले होते. शिष्यवृत्ती अचानक बंद झाल्यामुळे त्यांना मायदेशी परत यावे लागले. हा त्यांच्या जीवनातील अत्यंत दुःखद प्रसंग होता. संकटांनी त्यांना घेरले. अर्धवट शिक्षण सोडून विदेशातून परत यावे लागणे, त्यासारखे दुसरे दुःख नाही. ती सल मात्र त्यांना सारखीच निराश करत होती. लंडनहून परत आल्यानंतर झालेल्या करारानुसार भीमरावांना सैन्य सचिव या पदावर बडोदा संस्थान मध्ये काम करावे लागणार होते. एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना सुद्धा एक विद्याविभूषित व्यक्तीला जातीवादाने सोडले नाही. माठातील पाणी सुद्धा पिऊ दिले नाही. कार्यालयातील फाईल दुरून अंगावर फेकल्या जात असत. भीमरावांच्या मनाची अवस्था अत्यंत दयनीय होत असे. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. तेथील सेवक त्यांना पाणी देत नाही, तेव्हा मात्र ते स्वतः उठून पाणी घेत. जातीच्या चांडाळ चौकटी मध्ये असलेले सहकारी विरोध करत. बडोदा संस्थानातील सहकाऱ्यांच्या चेहर्‍यावरील भाव मुद्रा पाहून, भीमराव शुद्धीकरणाचा संस्कृत मंत्र अस्खलितपणे म्हणत. तेव्हा मात्र सहकारी आश्चर्यचकित होत. सर्व कूटनीतीला कंटाळून बाबासाहेबांनी बडोदा संस्थानचे सैन्य सचिव पद सोडून दिले. सैन्या सचिवपद भीमरावांनी सोडल्यानंतर बडोदा संस्थान चे महाराज सयाजीराव गायकवाड यांना खूप दुःख झाले. 

कौटुंबिक प्रपंच चालवण्यासाठी 1918 मध्ये त्यांनी मुंबई येथील, 'सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स इकॉनॉमिक्स ,' येथे प्रोफेसर म्हणून नोकरी केली. सर्व काही व्यवस्थित असताना भीमराव यांची अर्धवट शिक्षणाची वार्ता कोल्हापूरच्या शाहूमहाराजांच्या कानी पडली. 1920 मध्ये पुढील उच्च शिक्षणासाठी भीमरावांना कोल्हापूर संस्थांद्वारे शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती मंजूर केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक अंड पोलीतिकल सायन्स, या ठिकाणी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी भीमराव लंडनला गेले. त्यावेळची मनाची तळमळ त्यांच्या मनात तीच होती, जेव्हा ते लंडन सोडून भारतात परत आले होते.  जानेवारी 1923 मध्ये डी. एस. सी. ही पदवी प्राप्त केली. 'गेज इन' मधून बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण झाले. आठ वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. अल्पावधीत अनेक विक्रम करणारा जगातील एकमेव व्यक्ती भीमराव ठरले. 3 एप्रिल, 1923 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स, पिएचडी आणि बॅरिस्टर अशा अनेक पदव्या मिळवून ते भारतात परत आले. ज्ञानसूर्याची हीच विशेषता होती. अल्पावधीतच एवढ्या डिग्री मिळवणारे जगातील एकमेव आणि अद्वितीय भीमराव होते. 
भारतात परत आल्यानंतर विद्वान व्यक्तीला सुद्धा जातीयतेचे  चटके बसतात. मग ज्यांना या ज्ञानाची कसलीच जाण नाही, त्यांच्या अंधश्रद्धेला तर पर्यायच राहिला नव्हता. भीमरावांनी या प्रथेवर आघात करण्याचे ठरवले. त्याकाळामध्ये बोले समितीच्या ठरावाला महाड येथील स्थानिक संस्था व लोक, मान्यता देत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भीमरावांनी त्या विरोधात दंड थोपटून काम केले. 1927 ला दहा हजार अनुयायां सोबत चवदार तळ्या साठी आंदोलन केले. ज्या तळ्यामध्ये पशुपक्ष्यांना संचार करण्यास आणि पाणी पिण्यास मज्जाव नाही तेथे मात्र मानवास प्रखर विरोध, हे भीमरावांना मान्य नव्हते. हजारोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चाला यशही आले. भीमरावांनी प्रथमतः चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले. गावामध्ये विरोधी लाट पसरली, अस्पृश्यांनी पाणी बाटवले. प्रस्थापित उच्चवर्णीयांनी या मोर्चा वरती लाठ्याकाठ्या ने दगड गोट्यांनी हल्ला चढवला. अनेक लोक जखमी झाले. भीमरावांनी मात्र खूप शांततेने आणि संयमाने प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाला कोर्टात खेचले, त्यांना न्यायालयामार्फत सजाही दिली. भीमराव जेव्हा कोर्टात एखादा खटला लढवत असत, त्यावेळी परिसरातील नामांकित वकील त्यांचा  युक्तिवाद ऐकण्यासाठी येत असत. वकिली व्यवसाय मध्ये सुरुवातीला ज्यांनी नाकं मुरडली, तीच विरोधी गटाची वकील भीमरावांचा कोर्टातील संवाद ऐकण्यासाठी येत. पुढे ते त्यांचे स्तुतिपाठकही झाले. भीमरावांनी क्रांतीला सुरुवात केली. त्याची सुरुवात चवदार तळ्याच्या आंदोलनाने झाली. 

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि बाबासाहेबांची आपल्या समाजाला वर्ण व्यवस्थेतून बाहेर काढून समान हक्क देण्यासाठीची तळमळ, त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ब्रिटिश सरकारने गोलमेज परिषदेसाठी भारतीय नेत्यांना बोलावण्यात आले. पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी अनुपस्थित राहिले. परंतु बाबासाहेबांना संधीचे सोने करायचे होते. त्यामुळे त्यांनी गोलमेज परिषदेला महात्मा गांधींचा विरोध असताना हजेरी लावली. महात्मा गांधीजींना ते अजिबात आवडले नव्हते. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्या बांधवांसाठी हक्क आणि स्वतंत्र मतदारसंघ यासाठी खिंड लढवली. गोलमेज परिषद मधील बाबासाहेबांचे भाषण सर्वांसाठी कुतुहलाचे ठरले. इंग्रजांना भारतीय वर्ण व्यवस्थेतील शूद्रांची जाणीव झाली. बाबासाहेबांच्या मागणीला त्यांनी होकार दिला. महात्मा गांधीजीच्या पोटात मात्र पोटशूळ उठला. बाबासाहेबांच्या या मागणीला गांधीजींनी विरोध दर्शवला. एकवीस दिवस फक्त पाण्यावर काढले. गांधीजींची परिस्थिती अत्यंत खालावली, कस्तुरबा गांधीच्या विनंतीला मान देउन बाबासाहेबांनी गांधीजींचे प्राण वाचवले, यालाच आपण 'पुणे करार ' असे म्हणतो. 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जवळील येवला येथील परिषदेमध्ये धर्मांतराची घोषणा करण्यात आली. बाबासाहेब कडाडले-

"मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही ते मात्र माझ्या हातात आहे" 

धर्मांतर करायचे, पण कोणता धर्म स्वीकारायचा, हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. धर्मांतर हे मात्र अपरिहार्य होते. 

 1942 च्या चले जाव लढ्यानंतर स्वातंत्र्य चळवळीचे वारे जोरात वाहू लागले. स्वातंत्र्य चळवळीने वेग पकडला होता. स्वातंत्र्य मिळणार अशा सर्व अशा, सर्वांच्या मनात पल्लवित झाल्या होत्या. आंदोलनाची धार सरकारने लक्षात घेतली होती. 1939 ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. या युद्धामध्ये भारतीय सैन्याने ब्रिटीशांच्या बाजूने लढा द्यावा असे ठरले किंबहुना भारतीय सैन्य ब्रिटीशांच्या बाजूने दुसऱ्या महायुध्दात उतरले. आशा होती आपल्याला स्वातंत्र्य मिळणार. दुसरे महायुद्ध 1945 ला संपल्यानंतर भारतातील आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली ज्या स्वातंत्र्याची वाट भारत पाहत होता, तो दिवस उजाडला. भारतीय आंदोलनापुढे ब्रिटिश कंपनी नतमस्तक झाली. 15 ऑगस्ट 1947 ला 'भारत स्वतंत्र' झाला अशी घोषणा ब्रिटिश सरकार कडून करण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री अर्थात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चा प्रारंभ, पंडित जवारलाल नेहरू यांचे भाषण लाल किल्ल्यावर झाले. नियतीशी करार हे त्यांचे भाषणाचे सार होते. स्वातंत्र्य मिळाले पण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या देशाला घटना असावी,असे ब्रिटिश सरकारने सुचवले. घटना निर्मिती साठी विद्वान् माणसाची आवश्यकता भासू लागली, शेवटी ब्रिटिश सरकारला  सुचवावे लागले, एक कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला मसुदा समिती अध्यक्ष व इतर सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. सरदार वल्लभाई पटेल यांना मात्र त्यांच्यावर खूप विश्वास होता. सरदार वल्लभाई पटेल, महात्मा गांधीजींनी बाबासाहेबांना विनंती केली. घटनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. घटना निर्मिती प्रक्रिया 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली. या काळामध्ये एकूण 7353 तक्रारी आल्या त्यापैकी 2473 तक्रारीवर विचार करण्यात आला. जगातील जवळपास पन्नास ते साठ राज्यघटनांचा अभ्यास करून एक परिपूर्ण राज्यघटना निर्माण झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व,आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य  यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले. राज्यघटनेमध्ये मूळ प्रस्ताविक 22 भाग 395 कलमे व आठ अनुसूची असा समावेश होता. संविधान सभा अध्यक्ष यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक परिपूर्ण राज्यघटना सुपूर्द केली, तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. राज्यघटना घटना समितीकडे सुपूर्द केल्यानंतर राज्यघटनेविषयी

डाॅ. बाबासाहेब म्हणतात -

     " मै महसूस करता हूँ कि संविधान ,साध्य है, यह लचीला है, पर साथ इतना मजबूत भी है कि देश को शांति और युद्ध दोनो के समय जोडकर रख सके. वास्तव में, मै कह सकता हूँ कि अगर कभी कुछ गलत हुआ तो इसका कारण यह नही होगा कि हमारा संविधान खराब था, बल्कि इसका उपयोग करने वाला अधम था"

26 नोव्हेंबर 2015 पासून  हा दिवस  संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कालानुरूप आजची घटना 452 कलम, 26 भाग , आणि 12 परिशिष्टे अशी आहे. राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. कारण , 26 जानेवारी 1930 ला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र करण्यात आला होता. ध्वजारोहन करण्यात आले होते. 26 जानेवारी1950 पासून भारतामध्ये संसदीय शासन पद्धति चा अंमल सुरू झाला. 

भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. महिलांच्या अधिकाराबाबत त्यांच्या मनात सारखी चिंता होती. भारतीय महिला सुरक्षित आणि अधिकार संपन्न असावी, म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलाची ची निर्मिती केली. नेहरूंच्या मंत्रिमंडळात मात्र त्या 'हिंदू कोड' बिलला प्रखरतेने विरोध केला. बाबासाहेबाना त्या वेदना असह्य झाल्या. जगाच्या पाठीवर असा एकमेव कायदेमंत्री असेल ज्यांनी स्त्रियांच्या बाबतीतील अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून, कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतर झालेल्या निवडणुकीत मात्र बाबासाहेबांचा पराभव झाला.त्यानंतरही ते राज्यसभेचे सदस्य होते.

येवला येथील धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांना खुणावत होती. अनेक धर्मांचा अभ्यास केला.त्याच बरोबर सर्व धर्मप्रमुख बाबासाहेबांना प्रलोभने आणि मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले. बाबासाहेबांनी सर्व धर्माचा त्याग केला. गाडगे महाराजांनी सांगितलेल्या भारतीय धर्माचा स्वीकार करा,याकडे त्यांचे लक्ष होते. बौद्ध धर्माचा त्यांनी खूप अभ्यास केला. श्रीलंकेला गेल्यानंतर ते आणखीन प्रभावित होते. शेवटी बौद्ध धर्म स्वीकारायचा त्यांनी ठरवले. बौद्ध धर्मामध्ये कोणतीही विषमता नाही, भेद नाही, सर्वांना समान संधी आणि समानता आहे. हे त्यांनी शोधले होते. येवला घोषणेच्या तब्बल वीस वर्षानंतर, सर्वांगाने विचार करुन  बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारायचे ठरवले. 14 ऑक्टोबर, 1956 रोजी नागपूर येथे 5 लाख अनुयाया सोबत 'बौद्ध धर्म' स्वीकारला. घटना निर्मिती प्रक्रिया पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तब्येत सारखी खालावत जात होती. धर्मांतरानंतरही बाबासाहेबांची  तब्येत बिघडत चालली. सवितामाई आंबेडकर  यांनी बाबासाहेबांची खूप काळजी घेतली. सेवक रत्तू बाबासाहेबांच्या सेवेत असायचा बाबासाहेब आता बौद्ध झाले होते रेडिओवरील पंचशील त्रिशरण ऐकून प्रसन्न झाले. मी भारत बौद्धमय करीन हा विचार बाबासाहेबांना पुढे घेऊन जात होता. परंतु, काळाला वेगळेच काही मान्य होतं. इतिहासातील ती काळरात्र डिसेंबर महिन्यात उजाडली.तो दिवस होता 6 डिसेंबर 1956  कोटी कुळांचा उद्धार करता, पालन हार  काळाच्या पडद्याआड गेला. पूर्ण भारतावर शोककळा पसरली. दीनदलितांच्या  दुःखाला सीमा राहिली नाही. बाबासाहेबांचा देह अंतिम दर्शनासाठी दिल्ली येथील निवासस्थानी ठेवण्यात आला, नंतर तो विमानाने मुंबईला आणण्यात आला. मुंबई येथील राजगृह येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला. अंत्यविधीसाठी लाखोंचा जनसमुदाय  मुंबई येथे पोहोचला. राजगृह ते दादर चैत्यभूमी पर्यंत सर्व रस्ते  माणसांनी फुलून निघाले होते. आसवांचे महापूर येत होते. कंठ दाटून येत होता. एक क्रांती रुपी वादळ शमले होते  ज्ञानवंत, प्रज्ञावंत, विश्वरत्न, भारतरत्न चिरनिद्रा घेत शांत झाला होता. कोटि जनांना  हक्कासहित  समाज उद्धाराची नवक्रांती मशाल तेवत ठेवण्यासाठी अनुयायांच्या हाती सोपवली. अन स्वतः ज्ञानाचा अथांग सागर चैत्यभूमीवर विसावला! 
 डॉ. बाबासाहेबांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम  ! ! ! 

              WRITER :
#RAHUL R. DONGARDIVE