मंगळवार, ४ जून, २०२४

संयम ठेवा, सामाजिक आरोग्य राखा , जातीयवाद दूर ठेवा!!!

 
"युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं", अस विधान करताना आपण सर्व पाहतो आणि ऐकतो. भारतीय हिंदू धर्मव्यवस्था जरी चातुर्वर्ण व्यवस्थेवर अवलंबून असली तरीही ही व्यवस्था बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यावर अवलंबून होती. पूर्वीपासूनच या धर्म व्यवस्थेला जाती व्यवस्थेची कीड लागलेली आहे. जगामध्ये इतर धर्माकडे पाहत असताना प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे. प्रत्येक धर्मातील एक व्यक्ती ही त्या धर्माची व्यक्ती असते. परंतु आपली धर्म व्यवस्था ही हिंदू धर्मातील व्यक्ती हिंदू म्हणून पाहिली जात नाही आश्चर्य वाटेल परंतु हे शाश्वत सत्य आहे!  कारण, हिंदू धर्मातील व्यक्ती  हिंदू व्यक्ती असली पाहिजे अर्थात तो कोणत्याही जातीतला असला , तर तो हिंदू आहे ना!  मग त्याची जात का पाहिली जाते? पूर्वी खेडे ही स्वयंपूर्ण होती . म्हणजेच सार्वभौम होती. सार्वभौमत्वासाठी जगातील व्यापारीकरण वाढले आणि साम्राज्यविस्तारासाठी शीतयुद्धापासून अनुयुद्धापर्यंत जगाने स्पर्धाही केली . त्याचे परिणाम मात्र मनुष्याचा संहार झाला.
औद्योगिकीकरणाच्या अगोदर खेडी ही सार्वभौम होती . गावातील सर्व  गरजा गावातच भागत असत,  ही व्यवस्था बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यावर अवलंबून  होत्या. 
प्राचीन काळापासून ते स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर पर्यंत, स्वतंत्र्यप्राप्तीनंतर काही वर्ष भारतामध्ये सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत होता .  कोणाला मनापासून कसलीही अडचण नव्हती. लोकशाहीचा खरा अर्थ हा लोकांसाठीचे शासन, जे लोकांच्या हितासाठी कार्य करेल असा आहे. कारण ते लोकांनी लोकांसाठी केलेले कार्य आहे. प्राचीन काळातील काही राजवटी सोडल्या तर  सर्व सुख समाधानच होते. 
भारताला स्वातंत्र्य मिळवून सुवर्ण महोत्सव ही साजरा केला . परंतु आजची परिस्थिती पाहता भारतामध्ये जातीयवाद कमी होण्याऐवजी तो तीव्र प्रमाणात वाढताना दिसून येतो . खास करून लोकसभा, विधानसभा ते ग्रामपंचायत पर्यंत जातीवादाची समीकरणे प्रत्येक वेळेला बदलताना दिसतात. प्रत्येक वेळेला नवीन रणनीती आखली जाते किंबहुना राजकीय पक्ष आणि राजकारणी त्यामध्ये यशस्वी होतात . परंतु आजची महाराष्ट्राची परिस्थिती किंबहुना देशाची दशा सारखी झाली आहे. खरंतर या गोष्टी लोकशाहीसाठी पोषक नाही आहेत . पण या गोष्टींना खतपाणी कुठून कसे मिळते? आणि त्याची अंमलबजावणी समाजामध्ये आपोआप होते , हे दुर्दैव समजावे लागेल. 
एवढी पार्श्वभूमी मांडण्या पाठीमागचा उद्देश हा होता की, बीड जिल्ह्यातील सध्याची राजकीय स्थिती समाज माध्यम आणि समाज माध्यमातून केल्या गेलेल्या अफवा याचा विचित्र परिणाम सर्वत्र पाहायला मिळतो . एकमेकांविषयीचे समज गैरसमज, सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या टीका टिप्पणी याचा परिणाम इतका भयंकर होताना दिसतो आहे की, त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात जाते की काय? अशी शंका मनात निर्माण होते. वास्तविक पाहता राजकारण येईल जाईल हा देश अबाधित राहील परंतु देशातील गृहयुद्ध हे देशाला परवडणारे नाही. ही वस्तुस्थिती असताना देखील समाज कोणत्या मुद्द्यांनी केव्हा ? कसा? आणि कधी भरकटेल ? हे निवडणुका आल्यानंतरच का होत? आणि एवढा जातिवाद कसा माणसाच्या मनात येतो ? हा यक्षप्रश्न माणसाच्या मनात सतत सलतो. 
बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर खासदार निवडणुकीसाठी कोणीतरी येणार. कोणीतरी पडणार हे शाश्वत सत्य आहे. दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकत नाही!  ही वस्तुस्थिती आहे . राजकारण येईल आणि जाईल , कोणाचा विजय होतो - कोणाचा पराभव होतो . हा जरी आपल्या अस्मितेचा प्रश्न असला, पण..जीवन जगण्यासाठी जातीय समीकरणाच्या पुढे जाऊ आपले हितसंबंध जोपासवे लागतात आणि अडचणीच्या काळामध्ये आपण गावातली माणसं शहरातील माणसं एकमेकांच्या गरजा भागवतो.  एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी देखील होतो. अशी प्रांजल भावना सर्वांचे  मनात असते. पाच वर्षातून एकदा असे कोणते संकट प्रत्येक जातीवर येते की, त्यामुळे प्रत्येकांच्या अस्मिता धोक्यात येते की काय ? असं वाटू लागतं. भ्रमक कल्पना समाजामध्ये पेरल्या जातात . विशिष्ट ठिकाणी कोणता तरी समूह कोणत्या तरी विशिष्ट जातीच्या विरोधात बोलतो आणि त्याचे पडसाद जिल्हा ते राज्यभर उमटतात असं व्हायला नको . 
समाजातील प्रत्येक घटकाला एक नम्र विनंती असेल, कोणीही कोणाच्या जाती विरोधात किंवा नेतृत्व विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून अथवा समाजासाठी घातक असणाऱ्या रेकॉर्डिंग असतील किंवा व्हिडिओ असतील व्हायरल करू नये. एवढी जरी सर्वांनी भूमिका स्वीकारली ना तरीही समाजातील एकमेकांविषयी जे घटक आज वेगळ्या पद्धतीने वागत आहेत ते वागताना दिसणार नाहीत. 
आजही स्वतःचे आत्मपरीक्षण करा,आज एवढा विरोध करूनही, एखाद्याच्या जर दुःख वाट्याला आले , तर दयाही आपल्यालाच येणार आहे . नाईलाजाने का होईना आपली मन आपल्या बांधवांशी जुळले जाणार आहेत .  एकमेकाविषयी एवढी अनादराची भावना का ? चला एक होऊया राजकारण संपले. सामाजिक सलोखा राखूया . बीड जिल्ह्यातील बंधू भाव पुन्हा एकदा सक्रिय करून महाराष्ट्रात आदर्श  घडवूया.  ताई, भाऊ, दादा ,अण्णा , भैय्या ,काकी- काका ही सर्व आपलीच आहे . कोणीही  इथून पुढे सामाजिक आरोग्यासाठी कोणाच्या विरोधात वाईट भूमिका ,टीकाटिप्पणी करू नये . जाती अंतच्या लढाईसाठी सज्ज होऊया   . "भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत"  ही प्रतिज्ञा सार्थ ठरवूया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा