Nigmanand Mauli : The untold story (part 07) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Nigmanand Mauli : The untold story (part 07) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ मार्च, २०२१

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी ( भाग-7)

भाग -07

आधुनिक युगातील थोर संत!

संत वामनभाऊच्या सल्ल्याने आणि महंत भीमसिंह महाराज यांच्या ,"मायंबा वर निवासी व्हा", या विनंती ने बाबा प्रेरित झाले. त्यांच्यामध्ये पुन्हा नवचैतन्य संचारले. बाबांनी निश्चय केला, आता आपण हिमालयात जाणार नाही.सर्वांनी याची खात्री पटली, बाबांचा  मायंबा वरती आपल्या कार्याचा परिणाम सुरू झाला.

वै. संत वामनभाऊ महाराज

वामनभाऊंच्या सांगण्यावरून बाबांनी भगवे कपडे त्यागले, त्याचबरोबर डोक्यावरील जटा, दाढी विधिवत काढली. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन भजन, कीर्तन, प्रवचने यामधून समाज सुधारण्यास सुरुवात केली. पशुहत्या बंद करा. नमसकीर्तन करून त्यांचे उद्बोधन सुरू झाले. तमाशे, जलसे, अंदाधुंद व्यवहार, यावर बाबा प्रखरतेने बोलत. त्यांना बहुतांश चैन विलासात रमनाऱ्याचा राग येई, बाबांच्या विरोधात 'ते' षडयंत्र सुद्धा करून पहात. पण निगमानंद यांच्यात एका माऊलींचा सुद्धा वास होता. बाबा आपल्या लेकरांची सर्व खोडी ओळखून होते. आलेल्या सर्व प्रसंगांना तोंड देणे आता सहज शक्य झाले

        "असाध्य ते साध्य करि सायास, 
              कारण अभ्यास, तुका म्हणे । "

तुकाराम महाराजांच्या युक्ती प्रमाणे, समाजातील सर्वात विघातक प्रवृत्ती होती, पशुहत्या. मायंबावर पशुहत्या, ही सामान्य गोष्ट होती. मुळात या प्रथेचा, बाबांना खूप त्रास होत होता. निगमानंद माऊली ध्यानस्थ बसले, त्यांना उपाय सुचला.  मायंबाचा 'मच्छिंद्रनाथगड' करायचा. आजचा मायंबा हा पूर्वीचा नाथ संप्रदाय होता. मायंबा वरती त्यांचे निवासस्थान होते , ही गोष्ट , त्यांनी भगवानगड निवासी संत भिमसिंह महाराजांना  बोलून दाखवली. निगमानंद माऊलींचे हे कार्य, समाजातील सर्वात मोठा बदल आहे. यातील गमक, भीमसिंह महाराजांनी ओळखले. निगमानंद माऊलींना त्यांनी शब्द दिला, "'मी स्वतः मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेला उपस्थित राहील".ते स्वतः त्या रात्री उपस्थित राहिले. 

1971 सली संत शिरोमणी वैकुंठवासी गुरुवर्यय भगवान बाबा यांनी चालू केलेल्याा नारळी सप्ताह चे नियोजन निमगाव मध्येे केले. याच सप्ताहामध्ये मच्छिंद्रगड स्थापना झाली. विठ्ठल -रुक्माई, शिव, आणि श्री गुुरु मच्छिंद्रनाथाची मूर्ती, प्राणप्रतिष्ठापना महंत भीमसिंह महाराज यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. नारळी सप्ताहाची सांगता एका परिवर्तनाने झाली होती. हा 'काला' सर्वांच्या आजही लक्षात आहे. मायंबावरची पशुहत्या बंद होणार, हे तेथीील विघ्नसंतोषी लोकांना आवडले नाही.त्यांचे बाबांच्या विरोधात कट कारस्थान सुरूच ठेवले. मूर्ती् प्राणप्रतिष्ठापना विरोधात त्यांनी निगमानंद माऊली विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निनावी फोन करून माहिती दिली. 

बीड हुन निघालेला पोलीस फोर्स रात्री निघाला , पाडळसिंगी , तिंतरवणी ला आला. तिंतरवणी हुन निघालेला पोलीस फोर्स वरंगलवाडी ला पोहोचला.परंतु, त्यांना मायंबा वर रात्रभर येता आले नाही. याची साक्ष देणारे शेकडो लोक आजही आहेत.सकाळी निगमानंद माऊलींना पोलीस घेऊन गेवराई ला गेले. मोठ्या आदर सत्कार आणि  सन्मानाने त्यांना सोडून देण्यात आले. निगमानंद माऊलींचा आगळावेगळा साक्षात्कार परिसरातील लोकांनी अनुभवला. 

स्वामी निगमानंद महाराज


निगमानंद माऊली ने मनातील पहिला संकल्प पूर्ण केला. आता त्यांच्या अमृततुल्य वाणीने समाज प्रबोधन सुरू केले. जे वाईट आहे, त्यावर प्रत्यक्ष प्रहार केला. करारी स्वभाव , अध्यात्माची सांगड या गोष्टींमुळे सत्कार्याचा प्रभाव समाजावर दिसून येऊ लागला. सद्गृहस्थाने त्यांना आत्मसात केले. त्यांच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली, "टाळ वाजल्यावर काळ पडेल" हा विघ्नसंतोषी लोकांचा अपप्रचार आपोआप थांबला. लोक तुळशी माळ घालू लागले. मांसाहार सोडून शाकाहार स्वीकारला. धावपळीच्या या बिकट स्थितीत मायंबा चे भक्त  वै. गुरुवर्य धोंडीराम महाराज यांचा मोलाचा वाटा आहे. 

 "एकमेका साह्य करू । अवघे धरू सुपंथ।। "

असा एक वारकरी संप्रदाय बाबांसमोर एकत्र येत होता. निगमानंद माऊली स्वतःला संतांच्या मेळ्यात हरवून बसले होते, हा बदल माऊली साठी एक  अग्निदिव्यच! 

अग्निदिव्य पाडत असताना, हे  समाजप्रबोधनचा अखंड वसा सदोदित  तेवत ठेवण्यासाठी, त्यांनी  'हरिनाम सप्ताहाची' संकल्पना जनतेला बोलून दाखवली. जनतेनेही त्यांना सहज होकार दिला. अखंड हरिनाम सप्ताह, हाच मच्छिंद्रगडाचा नारळी सप्ताह म्हणून ओळखला जातो. पहिला नारळी सप्ताह हा मौजे नांदिवली येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.  ज्या गावाला हे नारळी सप्ताह चे, 'नारळ' दिले जाईल, त्या गावात त्या  नारळाची वाजत गाजत मिरवणूक काढली जात असायची. नारळ घेतल्यापासून सप्ताह पार पडेपर्यंत निर्व्यसनी शाकाहारी राहणे, हे नियम सर्व गावकऱ्यांसाठी बंधनकारक असत. हा नियमा सर्व जण आजही काटेकोरपणे  पाळतात. नारळी सप्ताह चे नारळ घेण्यासाठी गाव गावची रांग लागलेली आहे.

1979 ला पहिला सप्ताह नांदिवली येथे सुरू झाला आजही तो अखंडपणे सुरू आहे 2019 चा 10 एप्रिल पासून सुरु होणारा सप्ताह मौजे निमगाव येथे संपन्न होणार आहे. सुरुवातीला जो पहिला सप्ताह सुरू झाला होता, त्याचे आज विशाल वटवृक्ष तयार झाले आहे. याची साक्ष आपण हे होऊ शकता. भव्य दिव्य असा महाकाय मंडप, स्टेज,आरंभीच्या दिवशी विद्यार्थी कलागुणांचे संस्कृतीक दर्शन, असं दर्शन कोणत्याच नारळी सप्ताह दिसणार नाही. भव्य असे निगमानंद माऊलींचे स्वागत, वारकरी संप्रदायाच्या पताका,टाळ,मृदंग,वीणा ,भक्तगणांच्या रांगाच रांगा, एक निराळीच शिस्त! ही शिस्त लावताना कोणी दिसते, ना कोणाचे बंधन.परंतु, यातील शिस्तही निगमानंद माऊलींच्या नैतिकतेची, श्रद्धेची आणि अपार भक्तीचीच! प्रत्यक्षात स्वर्गसुख काय असते? याची प्रत्येक भक्ताला अनुभूती येते.स्वतःला ते धन्य मानतात.  

भूतकाळामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केल्यास, मायंबाचा , 'मच्छिंद्रनाथगड' झाला. परंतु,तत्कालीन समाजव्यवस्था आणि विघातक प्रवृत्तीकडे झुकलेला समाज, आज पूर्णपणे बदलला आहे. भूतकाळातील एकही वाईट प्रथा, अनाचार, दुराचार या गोष्टी कोसोदूर गेल्या आहेत. एक सृजनशील समाज निर्मिती माऊलींच्या रूपाने साकारली आहे. मच्छिंद्रनाथ गडावर भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.हनुमान मंदिर, कामधेनु मंदिर, भव्य असेे राधाकृष्ण मंदिर प्रवेशद्वाराजवळच आहे. 

 निगमानंद माऊली ज्याठिकाणी सदैव बसलेले असतात. तेथे दत्ताचे मंदिर असून,त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व संतांच्या मूर्ती साकारल्या आहेत.



संत भीमसिंह महाराज

शांतीब्रह्म संत भगवान बाबा

नारद मुनी

संत नरहरी महाराज 

अत्रीऋषी

महर्षि वशिष्ठ

संत ज्ञानेश्वर

संत तुकाराम


श्री संत एकनाथ महाराज

व्यास महर्षी 

गोपाल श्रीकृष्ण

वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज

संत सावता महाराज

साईबाबा

मच्छिंद्रनाथ मंदिरातून एक प्रदक्षिणा म्हणजे,  सर्व देव व महात्म्यांचे दर्शन होते. मच्छिंद्रनाथाचे मंदिर हे विशाल, भव्य  आहेच,परंतु, यावर सर्व नक्षीकाम हे दाक्षिणात्य कलाकुसर आहे. विठ्ठल रुक्माई,शिव मंदिराचा , जीर्णोद्धार केला आहे. मोठमोठी सभामंडप, हे सर्वांचेे लक्ष वेधून घेतात. बाजूला साई मंदिर( आजचे बाबांचे समाधी मंदिर)  तर विलक्षण कलेचा नमुना आहे. आलेेेेला प्रत्येक भक्त ही कलाकुुुुसर पाहण्यात दंग होऊन जातो. जगातील आश्चर्य म्हटल्याास वावगे ठरणार नाही, याच मच्छिंद्रनाथ गडावर बाबांच्या कृपाशीर्वादाने वर्धमान महावीर महावीरांचे आगळेवेगळे मंदिरी हे साकारत आहे. साई मंदिराच्या समोरच शाळेची  सर्व सोयींनी युक्त तीन मजली इमारत आहे.  खरंच  सर्वांनी एकदा भेट द्यावी असा ठिकाण, 'मच्छिंद्रनाथगड'.
ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराज समाधी मंदिर

मच्छिंद्रनाथ मुख्य मंदिर

दत्त मंदिर

मच्छिंद्रनाथ जन्म देखावा

प्रांगणातील मंदिरे

विशाल प्रवेशद्वार

राधाकृष्ण मंदिर

हनुमान मंदिर

कामधेनु मंदिर

पूर्वमुखी प्रवेशद्वार मच्छिंद्रनाथगड

आळंदी- पंढरपुर- पैठण,याठिकाणी गडाच्या दिंड्या जातात. दिंडीतील भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून निगमानंद माऊलीने आळंदी येथे तीन मजली भक्तनिवास निर्माण केले आहे. पंढरपूरला देखील दोन मजली भक्त निवास बांधले आहे. पंढरपूरला आगळा-वेगळा भक्तनिवास बांधण्याचा बाबांचा माणूस आहे. पैठणला ही तीन मजली भक्तनिवास आहे. वारकरी संप्रदायाला आवश्यक असणारे पोषक वातावरण बाबा करत आहेत. या वातावरणातून निगमानंद माऊलींच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्रात नावलौकिक गायनाचार्य निर्माण झाले आहेत. मृदंग वादक आणि इतर कलेत निपुण असे कलाकार ही तयार झाले. हेच गायनाचार्य , मृदंगाचार्य, बाबांचा  'गुरुपूजन सोहळा' मोठ्या आनंदाने दरवर्षी साजरा करतात. 

निगमानंद माऊलीने वयाची 97 वर्षे पार केली आहेत. आजही तोच उत्साह, तीच उमेद त्यांच्याकडे पाहून होते. भगवान परमात्म्याचा अंश आहे, हे निर्विवाद सत्य दिसते. सदोदित मानव सेवा  व त्यांचे दुःख निवारण, बाबांचे अहोरात्र प्रयत्न आजही चालू आहेत. खरंच समाज परिवर्तनाचा ध्यास, मानव सेवेची आस, प्राणीमात्रावर दया, हे त्यांच्याजवळ अत्यंत विलक्षण आहे. त्यांचे वर्णन माझ्यासारख्या पामराने काय करावे? असे असणारे थोर संत म्हणून त्यांची ओळख आहे . 

परिवर्तन रूपी मच्छिंद्रनाथ गड स्थापनेनंतर समाजातील असणाऱ्या वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, असाह्य वेदना, आणि समाज  विघातक प्रथा, ह्या दुःखास कारणीभूत आहेत. बरबटलेल्या  या अवस्थेतून समाजाला बाहेर काढायचे झाल्यास उपाययोजना आवश्यक आहे. तेंव्हा त्यांची  सिंदफणा नदीवर गेली. एवढा पूर येऊनही येथील शेतकरी पाण्यापासून वंचित आहे, ही बाब त्यांच्या   मनात घर करू लागली. होतकरू व शेतात काम करण्याची इच्छा असणाऱ्या शेतकऱ्यांशी निगमानंद माऊली संवाद साधू लागले. प्रत्येकाच्या शेतात जाऊन विहिरी खोदण्यास प्रोत्साहन दिले. स्वतःच्या हाताने विहिरीचे मार्किंग करत असत,त्यांनी सुचवलेल्या परिसरात शेकडो विहिरी आजही अस्तित्वात आहेत,त्यांचे पाणी आजही जिवंत आहे. 

ओसाड माळरान असलेल्या बहुतांश परिसर,पण..बाबांच्या माऊली अंतकरणाने,परिसरामध्ये या सिंचन योजनेमुळे सर्व परिसर भरून गेला. विशेष करून माळेवाडीचे क्षेत्र, आज शेकडो एकर वाढलेले आहे. सर्व लोक सदन झाले आहेत. आजही श्रद्धा, माऊलींच्या कृपाशीर्वादाने दिलेल्या नारळ रुपी प्रसादातून प्रत्येकाच्या विहीर- बोरला पाणी येते, हे भक्तावर  बाबांचे कृपाछत्र आहे. 'सर्वांचे भले व्हावे'..ही त्यांची अंतरात्म्याची साद प्रत्यक्षात साकारली  आहे . 

सक्षम होण्यासाठी शिक्षण -
श्री निगमानंद माध्य.व उच्च माध्य.विद्यालय

निगमानंद माऊलींचे परिवर्तनवादी कार्य अत्यंत जोमाने चालले होते. दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. बाबांचा प्रवास सुद्धा टांग्यातून असायचा. सभोवतालची मुले-मुली शिक्षण संस्था दूर दूर असल्यामुळे शिक्षणापासून कोसो दूर होती. जास्तीत जास्त  चौथीपर्यंतचे शिक्षण, ते ही इच्छा  असणारे पालकच- पाल्यांना देत असत. सर्वसमावेशक, सर्वांना शिक्षण मिळेल अशी सुविधा उपलब्ध नव्हती. ही 'सल' मनात होतीच. 

निगमानंद माऊलींनी आता अधिकृतरित्या संस्थान उभारले होते. एवढ्यात औरंगाबाद हुन आयुक्तांचे पत्र आले. पत्रामध्ये आपण एखादी शिक्षण संस्था उभारून, शिक्षणाचे कार्य कराल का? असे विचारले. बाबांनी त्या पत्राला हो म्हणून उत्तर पाठवले. 1985 ला श्री मच्छिंद्रनाथ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.  इसवी सन 1986 ताबडतोप परवानगी मिळाली,आणि बाबांनी माऊलींच्या स्वरूपात, श्री निगमानंद विद्यालय, निमगाव, येथे आठवीचा वर्ग सुरू केला. पुढे  विद्यालयाची प्रगती वाढत गेली.  ज्ञानासाठी शिक्षक मोठ्या प्रयासाने मिळवले तत्कालीन परिस्थितीत शिक्षकांना शासनाचा पगार नसताना, स्वतः पगार दिले. शिक्षणाची गंगा अखंडपणे प्रवाहित आहे. आज विद्यालयातून शेकडो विद्यार्थी ज्ञान ग्रहण करून बाहेर पडत आहेत. या जोडीला या संस्थेची दुसरी शाळा, श्री निगमानंद विद्यालय तळणेवाडी तालुका गेवराई येथे कार्यरत आहे. दोन्ही शाळांची यशाची परंपरा उत्तम आहे. आज या शाळेतून अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स,शिक्षक, प्रशासकीय सेवेत, विद्यार्थी कार्यरत आहेत. ही माऊलींची  दूरदृष्टीता फळास येताना दिसते आहे. दोन्ही शाळांना विशाल अशा इमारती आहेत. स्वतंत्र सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा, प्रांगण,शौचालय आहेत. आज श्री निगमानंद विद्यालय आयएसओ प्रमाणित आहे.


 WRITER #RAHUL DONGARDIVE


वाचकांना नम्र निवेदन आहे की, "निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी"  मधील सर्व लेख हे, निगमानंद माऊली हयात असतानाचे आहेत. त्यामुळे बाबा हयात असताना जी परिस्थिती होती, ती लिखाणातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे.हे सर्व लेख, "दै. झुंजार नेता", मध्ये प्रकाशित झालेले आहेत.