Bhangar
वरवर बघता वाटत असेल,
याचा धंदा केवळ भंगार!
उपेक्षेच्या जगण्यालाही,
याने केला आहे शृंगार!
वजन कमी करण्यासाठी,
पाणी ओततो मुळावर!
आतमधे सजली माणसं,
अतृप्तीच्या सुळावर!
भंगारवाला नसेल तर,
बकाल होईल सगळं जग!
ए.सी.ची तर वृत्ती अशीच,
आत गारवा,बाहेर धग!
ओझं कमी करण्यासाठी,
ओतलं नाही वाटेल तिथं!
त्याचा सद् भाव ओतत गेला,
तहानलेली झाडं जिथं!
सावलीवरती हक्क सांगत,
झाडाजवळ थांबत नाही!
माझ्यामुळेच जगलंय असं,
स्वतःलाही सांगत नाही!
"निष्काम कर्म!"गीतेमधलं,
कळलेला हा पार्थ आहे!
"जीवन"देऊन,भंगार घ्यायचं,
केवढा उंच स्वार्थ आहे!
पाणी विकत घ्यायचं आणि,
अर्ध पिऊन फेकून द्यायचं!
कृतज्ञता/कृतघ्नता,
याचं भान केव्हा कसं यायचं?
डिग्री पेक्षा नेहमीच तर,
दृष्टी हवी अशी साक्षर!
भंगारवाला अंतर्धान नि,
अवतीर्ण होतो ईश्वर!
🙏🏻🙏🏻
Writer : unknown