प्रामाणिकपणा - Honesty लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रामाणिकपणा - Honesty लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १ एप्रिल, २०२३

प्रमाणिकपना - HONESTY



'माणसाने चांगले राहिले पाहिजे', असा सल्ला प्रत्येक जण देतो. पण..चांगलं राहिलं पाहिजे म्हणजे, कसं राहिलं पाहिजे ? याच सविस्तर विवेचन किंबहुना फोड करून स्पष्टीकरण कोणीही देत नाही. प्रत्येक जण भाषण देणे आणि उदाहरणासह स्पष्टीकरण देणे, अपरिपक्व मनाला परिपक्व मनाने दिलेली ही समजूत असेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा अंतर्मनातील ठेवा कधी कोणाजवळ उलगडेल हेही सांगता येत नाही. गरज असेल, तेव्हा विनंती, मान, सन्मान या गोष्टी कशा घडतात, हे ही कळत नाही. एक गोष्ट मात्र निश्चित या ठिकाणी निष्पन्न होते. 'गरज सरो आणि वैद्य मरो', या लोभापायी माणूस कोणत्या थराला जाईल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. प्रत्येक जण हा परिस्थितीचे आपत्य असतो. ही वस्तुस्थिती असली तरीही, संघर्ष आणि अपयश या दोन गोष्टी सदैव हातात हात घालून पुढे जात असतात. बिकट परिस्थिती मधून आपणास 'साध्य' आणि 'साधन' यातील फरक कळणे खूप मोलाचे आहे. वास्तविक पाहता विवेचन  करण्या पाठीमागचा अट्टाहास असा आहे. नम्रपणे एखाद्याच्या बाबतीत सद विवेकाने विचार करून, त्याच्या भल्यासाठी प्रयत्न करणे. ही व्यक्तीची नीतिमत्ता असते. निष्पाप नीतिमत्ते वरती विनाकारण शंका उपस्थित करून एखाद्याच्या कार्यकुशलता आणि प्रामाणिकपणावर शंकेचे ताशेरे ओढणे व पूर्णपणे अविश्वास दाखवणे, काम झाल्यानंतर त्यातून संधिसधूपणा साधने. हा कुठला आहे सभ्यपणा? लोकांच्या नजरेमध्ये मी किती निष्कलंक आहे? हे दाखवून प्रत्यक्ष आभासी जीवन जगण्यात साध्य ते काय होईल?
आपल्या कोणी कामाला आले नाही म्हणून आपण लोकांचा तिरस्कार न करता वेळ आणि संधी मिळाल्यावर त्यांच्या कामी यायला हवे. हा मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपण जगण्याचा प्रयत्न  केल्यास तो मानव कल्याणासाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो. अगदी त्याचप्रमाणे निष्पाप, निरागस, प्रामाणिक माणसं हे सदैव स्वतःमध्ये परिवर्तन करत राहतात. परिवर्तन हे निस्वार्थपणे असते.कारण,कोणतेही काम करत असताना त्यातली सुधारणा, ही पुढील कामासाठी त्याची प्रेरणा असते. अशी ही माणसं असतात जी की फक्त लोकांच्या कल्याणाचा विचार करतात. कोठे ना कोठे एखाद्याच्या कामी यावे, कोणालातरी आपण मदतीचा हात द्यावा अशी निस्वार्थपणे सेवा किंवा मदतीचा हात देत असताना तो व्यक्ती कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करत नाही. अपेक्षा एकच असते, आपण आपण जगत असताना हे जीवन सत्कार्यास लावण्यासाठी, 'एकमेकांसह करू अवघे धरू सुपंथ' हा मार्ग उत्तम आहे, याची जाण त्याला असते. म्हणूनच तो सदैव या मार्गावर चाललेला असतो. नव्हे त्याचा तो स्वभावच असतो. 

प्रामाणिकपणा हा माणसाच्या मूळ स्वभावात असतो तो अगदी हृदयापासून असतो तो ओढून आणता येत नाही ताणून दाखवता येत नाही त्यासाठी शुद्ध अंतकरण असावे लागते तो मार्केटिंगचा एक फंडा सुद्धा नाही तो प्रत्येकाच्या कार्यामध्ये वर्तनामध्ये तर चालण्या बोलण्यातून व्यक्त होत असतो त्याला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज लागत नाही तो जसा असतो तसाच काल आज आणि उद्या असतो

शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याप्रती पोट तिडकीने चिकाटीने आणि जिद्दीने ,आहे ते ज्ञान,  वर्गातील अत्यंत पाठीमागच्या  विद्यार्थ्याला समजून घेऊन, अभ्यासामध्ये त्याला गोडी निर्माण करणे . त्याचबरोबर त्याच्या सभोवताली परिस्थिती, सामाजिक स्थान आणि त्याची समस्या जाणून घेऊन त्याला समरूप असे शिक्षण देणे, की जो आहे त्या परिस्थितीवर मात करून स्वतःमधील 'स्व' ओळखून शिक्षण घेऊन पुढे जाईल. तो जगातील आपला वेगळा विद्यार्थी असेल, ही किमया फक्त त्याला लाभलेला गुरुच करू शकतो. विद्यार्थ्यातील सुप्त गुणांना वाव देणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. त्याच्या गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्याला संधी देणे, हा जरी नियम असला, तरी त्यातील गुण ओळखून त्याला प्रेरित करणे, हा शिक्षकाचा धर्म झाला. अशा प्रकारची नवीन प्रणाली विकसित झाली तर उद्याचा सुशिक्षित तरुण  विकसित भारत देशाचा तरुण असेल हा त्या, शिक्षकाचा विद्यार्थ्याप्रती प्रमाणिकपणा होय. गुरु- शिष्य परंपरा ही प्राचीन काळापासून अशी चालत आलेली आहे. निस्वार्थ सेवा वृत्ती व निष्पाप-निष्कलंक त्यात असणारा भाव, असाच पुढेही पिढ्यान पिढ्या टिकून राहील. ही सत्यता कोणीही लपवू शकत नाही. 

एखाद्या अभियंत्याने निर्माण केलेली वास्तुशिल्प. त्यातील त्या गुणवत्तेवर अवलंबून असते. ती गुणवत्ता म्हणजेच, त्याचा तो आपल्या व्यवसायाशी असलेला शुद्ध भाव होय. आजच्या  सुशिक्षित अभियंता हा खरोखरच एक निष्णात व्यक्ती आहे . ग्रीस वास्तू पासून ते आपल्या भारतापर्यंतच्या वास्तूंचा विचार केला. निर्माण झालेल्या ऐतिहासिक वास्तू जर पाहिल्या तर तो एक उत्तम स्थापत्यशास्त्राचा आदर्शवत कलेचा अविष्कार आहे. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातील माहिती तंत्रज्ञानामध्ये झालेली दैदिप्यमान प्रगती, ही त्या प्रत्येक अभियंत्याची ओळख आहे.

आदिमानव ते आजच्या आधुनिक युगातील मानव यात झालेला अविश्वसनीय बदल एक उत्क्रांतीचा भाग आहे. परंतु ही उत्क्रांती होत असताना क्रांती - प्रतिक्रांती होत होत्या. तेव्हा सुद्धा मानव कल्याणासाठी काम करणारी ही माणसं होती. गरजेनुसार घेतले जाणारे शोध आणि त्या शोधांचा मानव कल्याणासाठीचा उपयोग म्हणजेच आजचे विज्ञान आणि तंत्रज्ञान होय! त्यावेळेला सुद्धा अशा लोकांना विरोध करणाऱ्या आणि नाव ठेवणारी माणसं होती ना . पण त्यांनी त्यांचा तो छंद जोपासला आणि आज आपण त्याचा उपभोग घेत आहोत .. हे शाश्वत सत्य कोणी नाकारू शकते का ?  

प्रत्येक देशातील नागरिक हा सुखाने झोपू शकतो , प्रगती करू शकतो, निर्भीडपणे संचार करू शकतो, स्वतःसाठी आणि देशासाठी ही काहीतरी करू शकतो . एवढी सुरक्षितता येते कशी? या सर्व गोष्टींचा विचार जर केल्यास आपल्यासमोर एका सैनिकाची प्रतिमा उभे राहते. पूर्वीपासूनच चालत आलेला राष्ट्रवाद , प्रखर राष्ट्रवाद आणि साम्राज्य विस्तार या मोहापायी अनेक युद्ध झाली, होत आहेत आणि होत राहणार.  त्याचीच एक परिभाषा म्हणून सध्या चालू असलेले पश्चिमात्य देशातील युद्ध. आपण सगळेच जाणता आहात, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम आपला जवान करत असतो. अत्यंत 0°c च्या खाली असलेल्या तापमानामध्ये सुद्धा सैनिक देशाची सेवा करतो . वेळप्रसंगी प्राणाची कसलीही परवा न करता बलिदान या देशासाठी देतो. मग तो सैनिक कोणत्याही देशाचा असो. त्या देशासाठीची त्याची देशसेवा, बलिदान हे त्या देशासाठीचे त्याचे प्रामाणिक कार्यच.

जगाचा पोशिंदा शेतकरी , शेती करतो. स्वतःसाठी कमी पण इतरांसाठी जास्त त्याची कष्ट असतात. जगातील सर्व लोक या शेतकऱ्याच्या जीवावर आपला उदरनिर्वाह भागवतात .  मग तो कोणीही असो. आपल्या व्यवसायाशी सलग्न अशा सर्व सुविधांशी पारदर्शक पद्धतीने काम करतो . त्याचे ते कर्तव्य आहे . त्यासाठी असणारी त्याची व्यापक भावनाही खूप महत्त्वाची असते. यातून त्याचे असणारे समाजाविषयीचे ऋण हे तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाची ही शेतकऱ्या विषयी असणारी संकुचित भावना बदलून त्याच्या धन्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. मॉलमध्ये गेल्यानंतर डोळे झाकून भाजीपाला किंवा इतर धान्याची जी किंमत मोजतो. त्याचप्रमाणे बाजारामध्ये बसलेल्या शेतकऱ्याची अवहेलना व्हायला नको , ही  एक आपली त्याप्रति निष्ठाच असायला हवी. अशाप्रकारे समाज व्यवस्थेचे हे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडले जाऊ शकतात. सर्वांनी मात्र एकमेकांशी असलेल नातं अबाधित ठेवण्यासाठी निरहेतुकपणे काम व इमानदारीने आपलेपणा जोपासल्यास कोणाच्याही भावनांना ठेच पोहचणार नाही.

देशाचे समाजकारण आणि राजकारण करणारा एकमेव दुवा म्हणजे राजकारणी. राजकारणी लोक एक आगळीवेगळी भूमिका बजावताना पाहतो . या लोकांनी ठरवलं तर देशाची प्रगती होते. नाहीतर, अधोगती होते. देश विकसित व्हायचा असेल तर, हे राजकारणी लाचार नसले पाहिजेत  किंवा सत्तेचा हव्यास नसला पाहिजे. निस्वार्थपणे सेवा हाच त्यांचा धर्म असला पाहिजे. मानवसेवा- देशसेवा हीच ईश्वर सेवा ! अशी सेवाधारी वृत्ती असणारे समाजकारणी जर निर्माण झाले तर, तो देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. समाज बांधणीमध्ये ही त्यांचा खूप मोलाच वाटा आहे. त्यांची वृत्ती जर निकोप असेल तर त्या देशाचा समाज सुद्धा सुदृढ आणि सशक्त निर्माण होईल, तो मानसिकतेने आणि सार्वभौमतवाने!  मग मतदाराने ही आपले अमूल्य असे 'मत' दान करावे. जनतेने दिलेल्या दानाचा वापर राजकारणी लोकांनी देश विकासासाठी करावा. हा त्यांचा प्रामाणिकपणा विकसित राष्ट्राची पायाभरणी केल्याशिवाय राहणार नाही.

#📝Rahul Dongardive