संवेदना - आपण सदैव म्हणतो आधुनिक युग आणि प्राचीन युगामध्ये खूप फरक आहे.पूर्वीची संस्कृती सांस्कृतिक वारसा त्याचबरोबर आचार विचार दळणवळणाची साधने काळानुरूप बदलत गेली. याचाच परिणाम म्हणून आजचे आधुनिक युग हे खूपच गतिमान त्याचबरोबर संवेदनशील आहे .प्राचीन काळामध्ये एखादा संदेश सहजासहजी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत नसायचा.परंतु , आज मात्र काही क्षणांमध्ये जगामध्ये एखादा संदेश मिनिटांमध्ये पसरतो. वास्तविक पाहता संदेश तोच पसरतो, ज्यामध्ये फक्त आणि फक्त मायावी विचार किंबहुना विघातककृती, वाऱ्यापेक्षाही दुप्पट वेगाने पसरतात . धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस, माणसाचं माणूस पण पूर्णपणे गमावून बसला आहे. ऐकायला बोलायला आणि लिहायला सुद्धा हा वेगळा विषय आहे. अनेक वैचारिक लेख, निबंध संशोधन पर विषय सविस्तरपणे मांडताना आपण पाहतो आहोत. परंतु शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचाच बदलला आहे. यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर, भौतिक सुख सुविधांच्या पाठीमागे लागलेला हा मानव!!! निसर्ग ,आकाश व पृथ्वी अंतर्गत आक्रमण करता करता स्वतःवर सुद्धा आक्रमण करायला मागे पुढे पहात नाही. परिणाम असा झाला, प्रत्येक जण अतिरेकी वर्तन करू लागला. त्यासाठी तो वाटेल ती किंमत चुकवण्यासाठी तयार आहे. तो नाती पाहत नाही , सामाजिक भान ही राखत नाही, अर्थात तो आत्मभान हरून बसला आहे.
विषय मांडताना एक गोष्ट या ठिकाणी प्रखरपणे मांडावीशी वाटते की, पूर्वीच्या काळी असणारी एकत्र कुटुंब पद्धती ही पोषक होती. प्रत्येकाचा मानसन्मान राखला जायचा, प्रत्येक जण आपल्याशी इतरांशी आदराने वागायचा. ज्येष्ठ कनिष्ठ हा आत्मीयतेचा धागा सर्व नाती सांभाळत होता. कालांतराने एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला आणि विभक्त कुटुंब पद्धती आली. गाव खेड्यांचे शहरीकरण झाले. शहरीकरणातून कारखानदारी उद्योगधंदे वाढले आणि माणसाचे स्थलांतर सुरू झाले. स्थलांतराबरोबर माणसे माणसापासून दुरावली जाऊ लागली. उद्योगधंद्यांच्या स्पर्धात्मक जीवनाने सर्व जीवनच पालटले. प्रत्येक व्यवहारिक झालेला आणि माणसाची माणुसकी यातच नेस्तनाबूत झाली. हे त्रिवार सत्य कोणीही नाकारू शकत नाही. प्रत्येकाची साधन आणि साध्य बदलली. माणुसकीच्या आत्मीयतेचा लवलेश उरला नाही.
आधुनिक जगामध्ये स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात बळवलेली आहे की, प्रत्येक जण जगाबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो. कारण , 'थांबला तो संपला' हे ब्रीद वाक्य जगाने स्वीकारले आहे. वस्तुस्थिती ही तशीच आहे. कारण जो याबरोबर चालणार नाही, त्याला कोणीही विचारणार नाही. त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल आणि अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो आहे. या धावपळीमध्ये माणसाचे आरोग्य मात्र धोक्यात आले. कोणालाही शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ राहिला नाही. जो तो फक्त पैसा..पैसा..पैसा...एवढाच विचार करतो. कोणाची फसवणूक कशी करायची? कोणाच्या सात्विक वृत्तीचा गैरफायदा कसा घ्यायचा? रडून ऐकायचे आणि हसून सांगायची ही प्रवृत्ती एवढी बळावली आहे. त्यामुळे एक जण पैसा कमावतो आहे. तर, दुसरा हा मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यानुसार खचून चालला आहे.

मानसिक आरोग्य हे उत्तम आरोग्य असते, हा या पाठीमागचा प्रथम आणि अंतिम उद्देश होता. आपला संस्कृतिक वारसा अथवा वैचारिक अधिष्ठान टिकवायचे असेल तर कुटुंब ही संज्ञा , आदर , मान -सन्मान या गोष्टी जपाव्याच लागतील . मान्य आहे , पैसा खूप मोठा आहे! त्याची गरज पण आहे. खूप पैसा कमवायलाही काही हरकत नाही. तो कमवत असताना लोकांच्या भावभावना पायदळी तुडवून अघोरी संपत्ती कमावण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टावर प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती पिढ्यान पिढ्या टिकणारी असते, ही भावना लोकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. व्यक्ती पेक्षा देश श्रेष्ठ! असे संस्कार ही पुढील पिढ्यांना मिळणे काळाची गरज आहे. कोणत्याही निकोप देशासाठी सुसंस्कृत आणि सुपीक मानसिकता निर्माण होणे अपेक्षित आहे.
या गोष्टी फक्त संवेदना निर्माण कशा होतात यावर अवलंबून आहेत. त्यासाठी संवेदनशील असणे महत्त्वाचा आहे आणि या सकारात्मक संवेदना सकारात्मक विचारातून आणि आचरणातून निर्माण होतात. कोणतीही संवेदना निर्माण होत असताना, वास्तववादी परिस्थिती काय म्हणते? त्या परिस्थितीचे होणारे परिणाम कोणत्या स्वरूपाचे आहेत ? त्यापेक्षा ती परिस्थिती कोणत्या प्रकारे हाताळली जाते ? ही महत्त्वाची गोष्ट .ज्या वेळेला अशी बिकट परिस्थिती कोणत्याही व्यक्तीवर येते, त्यावेळेला सामाजिक दृष्टिकोन आणि सभोवतालचा परिसर त्यावर खूप मोठा परिणाम करत असतो अशा स्वरूपातील व्यक्तीला जर योग्य मार्गदर्शन आणि निर्णय क्षमता सर्वस्वी सकारात्मक घडत गेली तर, निश्चितच येणारा निर्णय हा विलक्षण असतो. याव्यतिरिक्त अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये नकारात्मक विचार त्याचबरोबर होणारा विरोध हा निश्चितच त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य खच्चीकरण केल्याशिवाय राहत नाही. यातून दोन गोष्टी निर्माण होत असतात किंवा घडत असतात एक तर अति उच्च कोटीचा सकारात्मक बदल झालेला असतो किंबहुना रसातळाला गेलेला हतबल माणूस पाहायला मिळतो. मग प्रश्न पडतो, दोष कोणाचा ?
म्हणून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा होणे आवश्यक आहे चिकित्सात्मक परीक्षण झाल्यावर सर्वांचा अंतिम सार ही संवेदनाच असते संवेदनाही दोन प्रकारच्या असतात एखाद्याबद्दल किंवा एखाद्या स्थितीबद्दल सकारात्मक विचारातून मदतीचा हात देण्याची संवेदना ही वेगळी. दुसरी संवेदना अनपेक्षित आहे. आहे त्या परिस्थितीचा फायदा उठवून समोरच्या व्यक्तीला संपुष्ट करण्याची संवेदना.
संवेदना कोणत्याही प्रकारची असो, त्यामध्ये जर मानव हित, समाज हित, राष्ट्रहित जोपासणारी असेल. तर, ती संवेदना प्रेरणादायी-
"बहुजन हिताय, बहुजन सुखाय राहील"
# RAHUL_ DONGARDIVE.