रविवार, ७ एप्रिल, २०२४

जनतेची भाषा 'लोकाशा'

 जनतेची मनातील 'आशा', 'लोकाशा'!!!

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता! कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या तीन आधारस्तंभाला जेवढे महत्त्व लोकशाहीमध्ये आहे, तितक्याच प्रमाणात पत्रकारिता हा लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये देशांमधील होणाऱ्या घडामोडी आणि त्यात भासणारी कमतरता या विरोधात जनतेच्या वतीने आवाज उठवणारी यंत्रणा. लोक भावनेबरोबरच देश हित , राज्य हित, आणि पटरी वरून बाजूला घसरणाऱ्या गाडीला पटरीवर आणण्याचा प्रयत्न , ही पत्रकारिता करत असते किंबहुना त्यामध्ये त्यांना यशही येते. कधी कधी मात्र मोठ्या प्रमाणात आवाज उठवावा लागतो हा आवाज म्हणजे, पत्रकारिता होय.

निर्भीड निरपेक्षता जोपासणारी बीड जिल्ह्यातील एकमेव पत्रितकारिता दैनिक लोकाशाच्या रूपाने नावारूपाला आली. देशपातळीपासून ते बीड जिल्ह्यापर्यंत सर्व स्तरातील बातम्यांचा अग्रलेख असो की सामान्य बातमी असो ती पोट तिडकीने मांडण्याचा आणि ती जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दैनिक लोकाशाचा असतो. कोणत्याही एका राजकीय पक्षाची भूमिका न  स्वीकारता सर्वसमावेशक भूमिका स्वीकारून जिल्हास्तरावरील  मराठवाडा स्तरावरील किंवा महाराष्ट्र स्तरावरील बातम्यांना अचूकपणे मांडून " बहुजन हिताय बहुजन सुखाय"  अशी भूमिका घेणाऱ्या वर्तमानपत्राचा ठसा हा आगळावेगळा ठरतो.

"ऐसी वाणी बोलिए मन का आप खोए,

औरन को शीतल करे,

 आपहुं शीतल होए"

वरील कबीरच्या दोह्यातून आपल्याला अशी प्रतीत होते - 'अशी वाणी असली पाहिजे की, ज्या वाणीने इतरांना तर आनंद मिळतोच आणि स्वतःलाही आनंद मिळतो'. लोकपत्रकारिता मध्ये लोकाशाचे सुद्धा असेच सगळे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. लोकाशावरी अग्रलेख असो किंवा संपादकीय पानावरील लेख, ही सर्व साधारणपणे सामान्य माणूस आणि शेतकरी वर्गावर आधारित असतात. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील विविध नामांकित व्यक्तिरेखा ते निर्माण होणाऱ्या समस्या वर आधारित असतात. त्यामुळे जनसामान्याला एक आवाज निर्माण झाला आहे. ज्या आवाजामुळे सामाजिक समस्या शासन दरबारी  मांडल्या जातात. त्याची दखल शासनाकडून  घेतलेली अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. लोकाशाची भाषा ही खरोखरच जनसामान्याची भाषा म्हणून उदयास येत आहे. प्रत्येकाच्या मनातील अनेक गुपित लोकाशाच्या माध्यमातून शासन दरबारी प्रकट होताना दिसत आहेत. त्यामुळे हा आवाज लोक आवाज बनत आहे. ही वस्तुस्थिती नाकारणे अशक्य आहे.


लोक मनातील बुलंद आवाज, जनसामान्यातील समस्यांचा लेखाजोखा, त्याचबरोबर मानवी मनाच्या अंतर्पटलातील घुसमट, लोक चळवळीच्या माध्यमातून वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून त्याला वाचा फोडण्याचे काम, आजचे निर्भीड निष्पक्ष वर्तमानपत्र दैनिक लोकाशा करत आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. आज एक तप पूर्ण करून दुसरे अर्ध तप पूर्णत्वास जात असताना  आत्यानंद होतो . भविष्याची आधुनिक नांदी ठरताना दिसते. दैनिक लोकाशाच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!! 

डोंगरदिवे राहुल रामकिसन

श्री निगमानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, 

निमगाव (मच्छिंद्रनाथ गड) तालुका शिरूर जिल्हा बीड.