सोमवार, २१ जून, २०२१

Orphans of Covid

           कोरोनाचे अनाथ



लाखो जीव मृत्यूच्या भीतीपोटी मृत्यू पूर्वीच मृत्यू पावली. लाखो कुटुंबे आपल्या माणसांना पोरकी झाली. एव्हाना कौटुंबिक जीवनाचा आनंद गमावून बसली. कोणाचे वडील गेले, कोणाची आई! कोणाचा भाऊ गेला,कोणाचा मुलगा गेला,  शेकडो मुलांचे आई-बाबा गेले. त्या निरपराध निष्पाप बालकांना मुलांना जीवन कसे जगावे? आणि का जगावे? असे कुट पडलेले प्रश्न. त्यांच्या डोळ्यातील संवेदनांची, चेह-यावरची उदासीनता मनाला सुन्न करून टाकते. एवढे मोठे घात या माणसावर होत असताना नाइलाजास्तव माणुसकी मात्र निपचित पडली आहे. कोणालाही कोणाच्या संवेदना, वेदना कळत नाही. सर्व काही कळुन सुद्धा अदृश्य असणारा मृत्यू हे करू देत नाही. असं म्हटलं जायचं ,"मरणादारी का तोरणा दारी." अर्थात दुश्मनाच्याही अंतिम विधीला जावं, आणि लग्नालाही जावं. कितीही मोठी दुश्मनी असली तरी, या दोन विधीला लोक जात असायची. पण..जेव्हापासून कोरोना आला, तेव्हापासून त्याची भीती व संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेता पूर्ण चित्रच पालटलं. 'कोणी नाही रे कोणाचे..' याची अनुभूती जगाने वैयक्तिक घेतली. ज्यांच्या शिवाय एक क्षणही जगणं कठीण होतं, त्यांच्या शिवाय त्यांना अंतिम विधी देण्यात येत होता. भीतीच्या आकांताने लोक स्वतःला बंदिस्त करून घेत होती. शासनाच्या नियमांचे पालन करत होती. शासन ही जनतेच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. अर्थव्यवस्थेपेक्षा माणसं जगली पाहिजेत, ही शासनाची भूमिका होती. नव्हे माणुसकीची परिसीमा होती. प्रगती करता येईल जग पुढेही जाईल नवनवीन शोध घेतले जातील. परंतु, ज्यांच्यासाठी हे करायचे आहे ती माणसं जिवंत राहिली पाहिजेत. एवढीच भावना समोर ठेवून जगातील प्रत्येक राष्ट्र मानवी अस्तित्वासाठी झगडत असताना दिसत आहेत. माणूस जगला पाहिजे तो जोपासला पाहिजे निसर्गाच्या संवर्धनासाठी ज्याप्रमाणे माणूस प्रयत्न करत होता त्याच प्रमाणे मानवाच्या अस्तित्वासाठी मानव अहोरात्र शोध आणि संशोधन करत असताना आज आपण पाहत आहोत. 

Covid-19 च्या पहिल्या लाटेने  जगातील शहरावर घाला घातला होता. ती लाट मात्र शहरा पुरतीच मर्यादित राहिली. जेव्हा दुसरी लाट आली,  तेव्हा मात्र जगातील खेड्यापाड्यांमध्ये घराघरात घुसली. पहिल्या लाटेने जेवढा मृत्यू तांडव केला नसेल, त्यापेक्षा भयंकर  'मृत्यू तांडव' खेड्यापाड्यात पोहोचले. जगातील  प्रत्येक खेड्यामध्ये कोरोना पोहोचला. सर्वांनीच या कोरोना ची दाहकता आणि भयंकर स्थिती अनुभवली. घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला त्या व्यक्तीला लोक हॉस्पिटल ला घेऊन जात ऍडमिट होण्याच्या अगोदरच लाखो रुपयांचे डिपॉझिट भरावे लागत  असे. सुरूवातीला रुग्णाची कंडीशन स्थिर असायची. एक दोन दिवस रुग्ण उपचाराला साथ देत. अचानक तब्येत बिघडली.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एचआरटीसी रिपोर्ट काढला जायचे, त्यानंतर त्यामध्ये निमोनिया चे प्रमाण दाखवले जाई, त्यानुसार त्याला ऑक्सिजनची गरज भासत असायची. परिस्थिती हाताबाहेर जात असताना डॉक्टर मात्र रुग्णावर होणारा एका दिवसाचा खर्च रुग्णांच्या नातेवाईकांना सांगत. दररोज सात हजार ते पंधरा हजार पर्यंत एवढा खर्च त्या रुग्णावर केला. दहा ते पंधरा दिवस त्याला सुट्टी मिळत नसायची. पंधरा दिवसानंतर सुट्टी मिळण्याची वेळ झाल्यावर रुग्ण बरा असताना अचानक हृदयविकाराचा झटका येत असे. आलेल्या हृदयविकाराचा झटका रुग्णाचा शेवटचा श्वास होता. होत्याचं नव्हतं होत असे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णाच्या उपचारावर लाखो रुपयांमध्ये खर्च करून रुग्ण दगावत होते. ही कोरोनाची निर्दयता जगावर खूपच हृदयद्रावक होती. लाखो निरपराध लोकांचे कोरोना संसर्गाने संसार उध्वस्त केले. जगामध्ये हजारो लोक अनाथ झाली. विशेष करून ज्या मुलांचे आई-वडील दोघेही कोरोना महामारी मुळे मृत पावली. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर निराधार अनाथ मुलांचा प्रश्न जगाला खुणावत आहे. अनेक सेवाभावी संस्था, निराधार आश्रम, अनाथ आश्रम या अनाथांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारत आहेत. 


जगामधील सर्वात विलक्षण अपवाद म्हणून कर्नाटकातील लावण्या कडे पाहता येईल. कारण, ही अनाथ एक आगळी वेगळीच. मंड्या जिल्ह्यातील सिविल हॉस्पिटल मध्ये घडलेला प्रकार. अवघ्या दहा दिवसांमध्ये अनाथ झालेली मुलगी. बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये लावण्याची आई ॲडमिट झाली. लावण्यांच्या आईने लावण्याला जन्म दिला. लावण्या चा जन्म झाला अवघ्या पाच दिवसांमध्ये वडील कोरोना ने वारले. स्वतःच्या मुलीला पाहता नाही आले. एवढा दुर्दैवी क्षण , त्या पित्याच्या मरणापूर्वी होता. थोडाही आनंद व्यक्त न करता,स्वतःच्या राजकन्येला न पाहता, कोरोनाच्या काळाने त्यांच्यावर घाला घातला. पतीच्या निधनाची वार्ता पत्नीच्या कानावर पडल्यानंतर तेथून पुढे पाच दिवसानंतर पतीच्या निधनाच्या धक्क्याने आणि  कोरोनाने जन्मदात्री सुद्धा मृत पावली. जन्म घेतल्यापासून पुढे अवघ्या दहा दिवसांमध्ये लावण्या अनाथ झाली. आईचे 'ममत्व' आणि पित्याचे 'पितृछत्र' जन्म  घेतल्यानंतर काही दिवसातच संपुष्टात आले. आई  आणि बाबा कोणाला म्हणायचं ? ही करुण कहाणी आयुष्यभर रहस्यच राहणार. शेवटी मामा मामी पुढे आले, त्यांनी तिला दत्तक घेण्याचे जाहीर केले. मामाच्या मुलींनी त्या बालिकेचे  नाव 'लावण्या' ठेवले. लावण्या मात्र आपल्या आई-बाबांना दहा दिवसात मुकली.

उत्तर प्रदेश मधील गोंडा जिल्ह्यातील घटना covid-19 दुसरे लाटेचा परिणाम येथे दिसून आला नियतीने आदिती आणि अमन यांच्याशी क्रूर चेष्टा केली. कोरोनाने ना पाहिला श्रीमंत, ना गरिब! त्याने पाहिला तो फक्‍त 'माणूस'. होत्याचे नव्हते आणि नव्हत्या ची कृती करण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे.तिच क्षमता मानवनिर्मित आपत्ती मध्ये भयंकर आहे. याची जाण जगाला करून दिली. मी आणि माझं..माझं...करत माणूस स्वतःसाठी जीवन जगण्यास विसरून गेला. मोह, लोभ, माया, मत्सर आणि स्वार्थापोटी मृगजळांमध्‍ये स्वतःलाच हरवून बसला. असाच कोरोनाचा घाला आदित्य आणि आमन यांच्या कुटुंबाविषयी झाला. एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती मृत पावली covid-19 संबंधित सर्व लक्षणे त्या बाधित व्यक्तींना दिसून आली. परंतु, सुरुवातीला  RT-PCR चाचणी अभाव असल्यामुळे, योग्य वेळी निदान न झाल्यामुळे, ऑक्सीजन पुरवठ्या अभावी या भावंडांना स्वतःचे आप्तेष्ट गमवावे लागले. जिथे खेळण्या-बागडणे, त्याचबरोबर शिक्षणाचे वय आहे. तेथे मात्र गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. कौटुंबिक प्रपंचाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व काही असताना, हतबल होताना दिसत आहेत. ग्रामीण भागात हा प्रकार अनुभवयास आला. 


पुणे येथील गायकवाड यांच्या घरामध्ये कोरोनाचे चार बळी गेले. अहमदाबादमधील मेघा मेहरा अनाथ झाली.  दिल्लीच्या आमीत  प्रसादने आई  गमावली. छत्तीसगड मधील एका मुलाचे वडील वारले. उत्तर प्रदेश मधील शामली या गावातील आई वडील वारले. वर्धा मध्ये सुद्धा दोन भावंडाचे आई वडील मृत्यू पावले.बरेली येथील एका सहा वर्ष आणि आठ वर्ष असणाऱ्या दोन मुलींचे आई बाबा वारले. या बातम्या पाहून आणि ऐकून काळजाचे ठोके चुकवावे आणि मन् सुन्ना व्हावे, अशा हृदयद्रावक घटना भारतामध्ये घडल्या. जगामध्ये अशा कित्येक घटना असतील ,ज्यांचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही किंबहुना तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये covid-19 चे अनाथ बालके, वृद्ध, व तरुण आज हतबल होताना दिसताहेत. जगातील सर्व देशाच्या सरकारांना ही नवीन समस्या भेडसावत आहे. सामाजिक दृष्टिकोनाचे भान ठेवून जगातील अनेक संघटना, सेवाभावी संस्था आणि अनाथ आश्रम या मुलांना दत्तक घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ही मोठी जमेची बाजू .आशा मुलांना आधार बनत आहे. शासनानेही त्या अनाथांचे पालकत्व स्वीकारले आहे. 

मानवी मनाच्या उत्तुंग शिखराला गवसणी घालत असताना, किंतु- परंतु, जर -तर, जसे-तसे त्या गोष्टींचा विचार करत माणूस देहभान विसरून भौतिक सुखाच्या पाठीमागे लागला. भौतिक सुविधेसाठी नको त्या गोष्टी तो करु लागला. नैसर्गिक साधन संपत्ती वर आक्रमण ही त्याची सवय बनू लागली. वर्चस्वासाठी नको त्या साधनसामुग्रीचा शोध घेऊ लागला, एव्हाना स्वतः स्वतःच्या विनाशाचे कारण बनू लागला. वास्तव परिस्थितीची जाण मात्र तो विसरून गेला.सार्वभौमत्वाच्या नावाखाली स्वतःचा प्रदेश सावरून इतर देशावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करू लागला. जागतिक स्तरावर आगळे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी मानवत हित सोडून दुराचार, दुराग्रही बनू पाहत आहे. त्याची प्रचिती आज पावलोपावली येताना जग पाहत आहे. त्याचाच एक दूर गंभीर परिणाम आजचा कोरोना! संशोधक शास्त्रज्ञ अभ्यासकांच्या मते जगभर तिसऱ्या लाटेचे सावट सुरू आहे. हीच तिसरी लाट अवघ्या दहा ते पंधरा दिवसात भारतातही सुरू होणार आहे. असा संशोधक दावा करतात. लाट येईल किंवा नाही हा जरी  यक्ष प्रश्न असला तरी शासनाच्या घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे एक भारतीय म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. जबाबदारी आणि कर्तव्य यांचे आत्मभान आपणा सर्वांना असायला हवे. सुदृढ भारत बनवण्यासाठी सतर्कता आणि नियमांचे अनुपालन करणे काळाची गरज आहे. या गोष्टींची जबाबदारी जर आपण घेतली, तर भविष्यातील होणारा एखादा अनाथ आपण वाचवू शकतो. हीसुद्धा एक देश सेवा ठरू शकते. "मास्कअप इंडीया" या काळामध्ये चळवळ बनली पाहिजे. तरच आपण एकमेकांना सहकार्य करू शकतो. तेच सर्वात मोठे कोरोना लढ्यातील मोठे शस्त्र आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्या मुलांचे आई वडील किंवा दोघांपैकी एक गमवला असेल, अशा बालकांना वय वर्ष अठरा पर्यंत आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा, अठराव्या वर्षी मासिक सहायता निधी, आणि  23 व्या वर्षी पी एम केअर फंडातून दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. या आर्टिकल द्वारे सर्व वाचकांना आव्हान करण्यात येते की असा एखादा गरजवंत अनाथ आपल्या जवळ कोणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क करून त्याची माहिती देऊन सहकार्य करावे. 
                                                               - राहुल डोंगरदिवे
                                                              मो. नं : ९१३०७२९९७७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा