सोमवार, १ मे, २०२३

विकृती - Distortion

 


माणसं माणसासाठी जगतात , माणसं माणसासाठी मरतात आणि तीच माणसं एकमेकांच्या सहवासातून निर्माण होणाऱ्या कृती आणि प्रतिकृती यावर आधारित असणारी मानसिकता कशी निर्माण होते , त्यानुसार वर्तन करतात. माणसाला माणूसपण शिकवणारी ही माणसंच आणि त्याच माणसाला माणसातून उठवणारी ही माणसाच ! समाजातील सजग आणि सृजनशील कृतीयुक्त कार्यातून सुदृढ समाज निर्माण होणे, ही झाली सद्बुद्धी. परंतु ,याच सुदृढ समाजाला एक अमान्य गोष्टी किंवा विरोधी असणारी वाईट करणारी कृती म्हणजे, विकृती होय ! सर्वांनाच असे वाटते की आपण एका चांगल्या प्रतिष्ठित पदावर विराजमान व्हावं. मग ते राजकारण, समाजकारण  , नोकरी , उद्योग असो. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आणि प्रतिस्पर्धा ही असतेच. स्व विकास करत असताना, माणूस कोणत्याच थराला जाईल हे सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी तो नको त्या गोष्टीची स्पर्धा करत असताना कळत नकळतपणे तो इतरांची ईर्षा करतो . इतरांवर जळतो आणि स्व प्रगतीच्या नावाखाली संपूर्णपणे विरोधाला विरोध करत राहतो. त्यामध्ये सत्य काय असत ? याची त्याला काही घेणे देणे असते ? तो फक्त स्पर्धा आणि स्पर्धाच करत राहतो त्या स्पर्धेमध्ये तो नीती मूल्य याचा कसलाही विचार करत नाही. फोडा आणि राज्य करा, या प्रवृत्ती प्रमाणे तो स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी नको त्या थराला जातो.. 

समाजातील कोण्यातरी एका व्यक्तीची समाजाप्रती असणारी  घृणा  त्या समाजालाच विनाकारण त्रास देत असते. हा झाला एक भाग आणि दुसरा भाग असा बहुसंख्य समाज अल्पसंख्याक समाजावर वैयक्तिक मतभेद पोटी एकंदरीत समाजाला दोष देतो ( आंतरजातीय). प्रतिष्ठित समाजाची प्रतिष्ठा लाभलेल्या समाजातील कोणत्याही एका व्यक्तीने केलेले वाईट कृत्य ही त्याची गलती असते, शेकडो वर अनेक चांगली काम किंवा वर्तन करून सुद्धा एखाद्याच्या चुकीवर बोट ठेवून समाजा च्या पारंपरिक पद्धतीने त्याला दोषी ठरवणे किंवा पारंपारिक दूषण लावणे , अशा प्रकारची मानसिकता सहजासहजी बदलणे शक्य तर नाहीच . ही मानसिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज पसरते. हिला ही रोखणे वाटते तितके सोपे नाही . कारण ,एका विशिष्ट वर्गाने एका विशिष्ट वर्गाला कमी लेखणे ही त्या पाठीमागची मानसिकता अत्यंत गंभीर आहे. तीच मानसिकता विकृती म्हणून उदयास येत आहे . तिला रोखणे कोठेतरी आवश्यक आहे . पण पुढाकार कोण घेणार ? आधुनिक भारतामध्ये आपण राहत असलो तरीही उचनीचितीची मानसिकता सहजासहजी नष्ट होत नाही , ही शोकांतिकाच म्हणावी लागेल . यालाही कारण तसेच आहे जे की , विकसनशील देशाच्या दिशेने प्रगती करत असणारा आपला देश राजकीय अस्थिरतेमुळे उदासीनतेमुळे आणि राजकीय जिवंतपणा ठेवण्यासाठी राजकीय पक्ष नको त्या थराला जाताना आपण पाहत आहोत . सत्तेच्या हव्यासापोटी ही विकृत मानसिकता नवीन पिढी घडवू पहाते आहे. पुरोगामी भारताचे अथवा महाराष्ट्राची संकल्पना ही व्यासपीठापूर्तीच मर्यादित झाली आहे. बोलणारा वक्ता बोलून जातो नको ती स्वप्ने दाखवून जातो राज्य किंवा देश यापैकी कोणतीही सत्ता मिळवल्यानंतर व्यासपीठावरील नेता कार्यकर्ता नंतर मात्र जातीय समीकरणांमध्ये अडकून बसतो. समाजातील घडत असणाऱ्या निंदनीय गोष्टींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खत पाणी घालतो ही सत्यता नाकारता येणे एवढे सोपे नाही. 

इज्जती वर बोलू काही. . . . 

बहुतेक ठिकाणी आपण असे पाहतो. गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंत ज्याच्या हातात सत्तेच्या चाव्या असतात, त्याच चाव्या आपल्या संबंधित लोकांच्या बाजूनेच असतात. एवढेच नाही तर तशा त्या फिरवल्याही जातात . साहजिकच आहे बहुसंख्याकांच्या हातातच सत्तेच्या चाव्या असतात मग अल्पसंख्यांकाच्या बाजूने कधी न्याय मिळेल काय ? हा मोठा एक प्रश्न आहे .आज कालच्या परिस्थितीचा आढावा जर घेतला तर प्रत्येक गाव पातळीवरील चा निर्णय हा ज्या पक्षाची अथवा पार्टीची सत्ता असते . त्याच बाजूने सर्व निर्णय घेतले जातात . प्रश्न विकासात्मक असेल किंवा एखाद्याच्या चारित्र्याविषयी असेल, गंभीर आणि महत्त्वाची बाब म्हणजे अल्पसंख्यांक समाजातील लोकांवर आरोप करणे तेवढेच सोपे आहे जेवढे एखाद्या रस्त्यावरील जनावरांना दगड मारणे . पण एखादा बहुसंख्यांक समाजातील व्यक्ती कितीही वाईट अथवा चरित्रहीन असेल त्यावर आरोप करणे तर सोडाच पण एक ब्र काढणे सुद्धा  शक्यच नाही. बहुसंख्याकातील एकमेकावर आरोप करतील , शांत बसतील आणि समझोता सुद्धा होतो. त्यावर कोणीही काही बोलणार नाही.  अल्पसंख्यांकातील एखाद्या काल्पनिक गोष्टीवर सुद्धा  एवढे मोठे अग्नि तांडव केले जाते. त्याची कल्पना करणे तर शक्यच नाही. पण त्यांना सहजासहजी इज्जतीतून उठवणे अगदी सहज सोपे आहे. कोणतीही गोष्ट झाली बस त्याचा अल्पसंख्यांक दर्जा किंबहुना जातीय दर्जा काढून अवमान करणे ही सुशिक्षित लोकांमध्ये नवीन रीत पुढे येऊ पाहते आहे. सुशिक्षित समाजातून लोकांमधून नाविन्य निर्माण होण्याची आशा वाटते , तेथेच अशी जर खिळ बसत असेल, आपण नवनिर्माण काय करणार .हा झाला गाव पातळी ते देशपातळीवरचा विषय .


सुशिक्षित लोकांमधील आपण द्वेष कसे असतात याविषयी  सांगायचे झाल्यास , सुशिक्षित लोकांमध्ये जास्त जातीय समीकरणे दिसून येतात . सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा ही मानसिकता विकोपाला गेली आहे. कारण नोकरी क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना कार्यालयामध्ये जातीय समीकरणे दिसतात ठीक आहे. नातेसंबंध असतील, सामाजिक जबाबदारी असतील किंवा रक्त संबंध असतील यावर आपल्याला काहीही भाष्य करायचं नाही. परंतु ,या सर्वांनी मिळून इतर वर्गवारी मधून आलेल्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा वेगळा आहे. नोकरी क्षेत्रांमध्ये सामान्यतः सर्वसाधारण मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय अशी वर्गवारी आहे. त्यानुसार त्यांची निवड होते. सर्वसाधारण मधून येणारे उमेदवार नोकरीच्या अगोदर वेगळेच असतात. एवढेच काय सगळ्याच  कार्यालयांमध्ये हे वेगळे असतात.  जेव्हा नोकरी म्हणून एकत्र येतात , तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये काम करत असताना एकमेकाकडे बघण्याची भावना ही उदारमतवादी नसून संकुचित प्रवृत्तीची होते. याला कोणीही अपवाद असू शकत नाही. सर्व सारखेच सर्वसाधारण गटातील लोकांना असे वाटते की, मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय गटातील लोक हे त्यांच्या पारंपरिक प्रथा व आचरण यानुसार ते तसेच आहेत. जे की सर्वसाधारण लोकांची मानसिकता ही त्यांच्याविषयी अकारण नको ते गैरसमज करून त्या गैरसमजांना बळी पडतात आणि त्यानुसारच त्यांच्याशी ते वर्तन करतात. वास्तविक परिस्थितीची जाण काय असते किंवा भूतकाळ आणि वर्तमान काळ यातील फरक जाणून घ्यायला ते तयारच नाही. मग प्रश्न येतो , ही माणसं म्हणजे कधीही न सुधारणारी आणि त्यातूनही जर कामांमध्ये एखादी कमतरता असेल किंवा चूक घडली  असेल तर बस त्याच्या जातीच्या माथी मारायची आणि जर का तीच चूक सर्वसाधारण गटाकडून झाली तर चुका होत असतात. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. अशी सबक पुढे देऊन मार्ग काढायचा हा कोणता नियम आहे? का रीत आहे ? ही झाली एक बाजू आता दुसऱ्या बाजूचा विचार करू एखादा इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय कर्मचारी अत्यंत हुशार असेल किंवा तो त्या क्षेत्रासाठी योग्य काम करत असेल , तेही जमत नाही. प्रत्येक वेळेला त्याच्या चांगुलपणाचा विचार तर करत नाहीत. परंतु एका थोर महापुरुषाच्या नावानं त्याला हिनवणे किंवा त्याच्या पाठी नको त्या थराच्या टीका करणे, उपहासाने बोलणे , त्याचे मनोबल खच्ची करण्यासाठी नको नको त्या ट्रिक्स वापरणे, यावरही न थांबता तोंडावर गोड बोलून त्याच्या पाठी नवनवीन प्रकारचे षडयंत्र रचने, त्यानुसार कृती करणे, तरी त्यांना यश आले नाही. त्यांनी षडयंत्र करायचे , डावपेच खेळायचे मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय आणि मात्र चुपचाप ते सहन करायचे. तर तो चांगला आणि त्या विरोधात आवाज उठवला किंवा साधं बोललं तरीही त्याच्या जातीच्या नावावर त्याची अवकात काढणे, ही मानसिकता कोठे बंद पडणार आहे. ही मानसिकता कधी सुधारणार आहे . मग या मानसिकतेला विकृत का म्हणू नये ? शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करत राहण्यापेक्षा या विकृत मानसिकतेने विद्यार्थ्यांचाच नाही तर वैयक्तिक त्या लोकांचा सुद्धा तोटा आहे. ज्यामध्ये विकृत मानसिकता असणारे लोक अहोरात्र झटत असतात हे बोटावर मोजणे इतकेच असतात परंतु हजारोंना वेठीस धरतात . हे दुर्दैव...! शैक्षणिक पवित्र क्षेत्रात अशा प्रकारच्या विकृत मानसिकता असतील आणि अशाच प्रकारची विकृत मानसिकता जर अधिकारी पदाच्या मनात असेल, तर त्या कार्यालयाचा किंवा त्या विभागाचा इतर लोकांशी व्यवहार कसा असेल याची कल्पना करणे अशक्य आहे. म्हणूनच शेक्सपियरने म्हटले असावे, " गोड बोलणारी माणसं धोकादायक असतात. "

गैरसमज कसा निर्माण केला जातो ? 


एखादा विचार किंवा सदगृहस्थ किती चांगला आहे किंवा किती वाईट आहे. प्रथमतः याचा कोणीही विचार करत नाही. चांगला असेल त्याला चांगलं म्हणावं, वाईट असेल त्याला वाईट म्हणावं. अशी शिकवण प्रत्यक्ष अचरणात असते . मग मोठा विचार असेल तर, मोठ्या विचारानुसार आपण आहोत. त्यानुसार त्याचे अनुकरण करतो आहोत, त्याचे आपण अनुयायी बनतो . पण ..तो व्यक्ती किंवा तो विचार जेव्हा इतरांकडून किंवा इतर मार्गाने त्या विचाराची जात कळते. तेव्हा मात्र तो विचार ती व्यक्ती तुच्छ वाटू लागते.  तोच विचार एखाद्या सदगृहस्थणे( बहुसंख्यांक)  मांडला तर,  मात्र त्याला डोक्यावर घेऊन त्याची वाह वाह केली जाते . चांगल्या विचाराची वाह वाह झालीच पाहिजे . तो  सदगृहस्थ कोणीही असो . त्याच्या चरणावरती नतमस्तक होण्याची प्रत्येकाचीच तयारी असावी. जेव्हा तो विचार विज्ञानवादी दृष्टिकोनातून सत्य असेल. 

विचार श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे यापेक्षा, तो मांडणारा किंवा व्यक्त करणारा त्याचा दर्जा अर्थात सामाजिक दर्जा कसा आहे ? याच्यावर अवलंबून आहे. मग सामाजिक श्रेणीनुसार तो कोणत्या श्रेणीतून येतो. यावरती अवलंबून असते. आजच्या आधुनिक श्रेणीनुसार अ , ब , क, ड ,असा असेल . जर  तो 'ड 'या श्रेणी मधील असला तर, त्याच्या विचारांना आजही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पाहिजे तेवढे महत्त्व आहे ? विचारवंत त्यांना मानतात पण त्या विचारवंतांचे विचार कोणीही सामान्य स्थळापर्यंत मानत नाही. कारण , सामाजिक विचारसरणीनुसार 'अ'  श्रेणीतील लोकांनाच आजही महत्त्व . हे महत्त्व प्राचीन काळापासून आहे. शेवटच्या श्रेणीतील एखाद्या सदगृहस्थाने चांगली कृती, चांगला विचार, चांगले संस्करण,  उत्कृष्ट चारित्र्य किंवा कर्तव्य पार पाडत आचरण करीत असेल तर त्याला कोणत्या मार्गाने बदनाम करण्यात येईल. अशा प्रकारचा विकृत विचार मनात घेऊन वरील श्रेणीतील लोक सारखेच चिंतेत असतात.  त्यातूनच ते अनेक प्रकारच्या युक्ती आणि प्रत्युत्त्या करत असतात. यामध्ये त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ खर्च करतात . त्यानुसार त्यांना कधीही यश येतही नाही.  जर  का आलेच ,तर ते चिरकाल नसते . त्यांची अघोरी मानसिकता त्यांना अशी दुष्कृत्य करायला भाग पाडतात. त्यानुसार ते वर्तन करत असतात.  चांगला विचार कधीही मरत नसतो किंवा तो संपुष्टात येत नसतो. तो चिरकालपणे तेवत राहतो . हे या विकृत मानसिकता पाळणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. जित्याची खोड मेल्याने जात नसेल तर शेवटी मात्र हाती धुपाटणे. याचा विसर पडू नये. धर्माच्या गोष्टी सांगायला असू नयेत त्या आचरणात असाव्यात. 

थोर महापुरुषांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. प्रत्येकांना आपल्या सोबत घेऊन चांगली कामे केली सर्व समाजाचा तळागाळातील लोकांचा विचार करूनच मोठमोठ्या क्रांती या भूमीवर झाल्या. बदलाची क्रांती घडल्या, घडतील ,परंतु ,बदल झालेला कायमस्वरूपी टिकतो किंवा नाही का इतिहास जमा होतो यासाठी प्रतिक्रांती सुरू आहे. या प्रतिक्रांती रोखायच्या असतील शिक्षित लोकांनी सुशिक्षित होणे गरजेचे आहे. सामाजिक व्यासपीठावरून फक्त बोल घेवडा करण्यापेक्षा कृतीयुक्त कार्यामध्ये सहभागी व्हावे. जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणावे. न्यायव्यवस्थेचा विचार करत असताना सत्तेच्या बाजूने सामाजिक न्याय असावा. या ठिकाणी पुराव्याची गरज असू नये. पुराव्याचा विचार जर केला गेलाच, पुरावा हा सुद्धा  सत्याचा असावा. पुरावा जर खोटा निघाला किंवा बनाव निघाला. तर मात्र सत्याला कधीही न्याय मिळणार नाही . समाजातील सुप्त विकृती वाढायला वेळ येईल आणि अन्याय अत्याचार झालेल्या व्यक्तीला न्याय मिळेल ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण , समाजातील हजारो अनेक प्रकरण आहेत, जी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचतील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून समाजातील न्यायदेवता जिवंत राहिली पाहिजे. एवढी अपेक्षा करूयात.

घातक प्रवृत्ती विकृत कृती... 



जगातील सगळेच लोक चांगले आहेत शहाणे आहेत हे निर्विवाद सत्य, आपण जाणतो आहोत.  त्यांची प्रवृत्ती जर चांगली असेल तर ते कधीही वाईट गोष्टीचा विचार करणार नाही. जर का त्यांची प्रवृत्ती विघातक असेल तर ते कधीही आयुष्यामध्ये चांगला विचार किंवा चांगली कृती करू शकत नाहीत . त्यांनाही रोखता येऊ शकते . पण...पुढाकार कोणी घ्यावा? यावर अवलंबून आहे. प्रवृत्ती कोणतीही असो चांगली असो अथवा वाईट असो. परंतु पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो ती व्यक्ती कोणत्या श्रेणीतील आहे? त्याची श्रेणी जर 'अ' श्रेणीतील असेल तर मात्र त्याला कोणीही बोलू शकत नाही. ना विरोध करू शकत नाही. पण 'ड' श्रेणीतल्या व्यक्तीला  कृती चांगली असो अथवा वाईट कोणीही बोलू शकते. कोणीही आरोप करू शकते. चांगल्या कृतीला तर कोणी शाब्बासकी किंवा प्रोत्साहन देणार नाही. पण का जर कृती वाईट असेल ना, तर मात्र त्या व्यक्तीची गय होत नाही. घातक प्रवृत्ती अ, ब ,क ,ड या श्रेणीतील कोणाचीही असेल त्याला सजा मिळालीच पाहिजे. ही बाब कौतुकास्पद आहे . तीच नंदनीय घटना कृती अ  श्रेणीतील लोकांनी केली आणि त्याच्या विरोधात कोणतीही कार्यवाही होत नाही. त्याला क्षमा केली जाते ही बाब मात्र गंभीर असून अशा प्रकारची मानसिकता ही सुद्धा विकृती आहे. 


लेखक: 📝🖋डोंगरदिवे राहुल



२ टिप्पण्या: