जिलेटिनचा स्फोट शेतकरी आणि शेतकऱ्याची स्वप्न चिंधड्या चिंधड्या झाली...
एक साठी ओलांडलेले शेतकरी . आयुष्यभर शेतामध्ये राबराब राबले , हाडाची काड केली, मुलांना शिकवलं, शेती पिकवली. नवरा बायको ने शेतीमध्ये कष्ट करत असताना ना दिवस पाहिला आणि रात्र पाहिली . शेतामध्ये रक्ताचे पाणी करायचं ,...पण शेत पिकवायची! पिकलेल्या धान्यातून वर्षभराची धान्य खाण्यासाठी घरी ठेवायचं आणि उरलेलं धान्य बाजारात विकून घर प्रपंच भागवायचा . ती शेतीही निसर्गावर अवलंबून आहे . निसर्ग बऱ्यापैकी उदार झाला तर शेती पीकायची . तो कमी झाला आणि जास्त झाला तरी शेतीवर आसमानी संकटांना का काहुर माजायचं. अशी विचारधारा घेऊन शेतकरी आलेल्या संकटातून देवाच्या परमश्रद्धेतून देवालाच साकडे घालायचा. माझी शेती पिकू दे, मुलांना शिक्षण देईल एवढा पैसा दे , मला फुकटचं नको ,माझ्या शेतीच्या पिकलेल्या आणि शरीरातून निघालेल्या घामाच्या हिमतीवर दे, माझी संसार रुपी वेल अशीच बहरू दे , हे ईश्वरा जगाचही कल्याणकर आणि त्या पाठोपाठ माझ्या मुलाबाळांचही भलं कर . अशी टाहो फोडणारा बाप आणि आई ही प्रत्येक कुटुंबाची आधारस्तंभ असतात . त्या कुटुंबासाठी एक मैलाचा दगड असतात. त्या कुटुंबासाठी तो पाठीचा कणा असतो. तोच आधारवड सुद्धा असतो!
अपार कष्टातून असाच गगनाला भिडणारा वेलु भरला होता . आप्पासाहेब सोपानराव मस्के यांनी जिद्दीच्या जोरावर मुलांना शिक्षण दिले होते. एक मुलगा डॉक्टर बनवला दुसऱ्या मुलांना शिक्षण देऊन त्याला सक्षम करण्यासाठी ते सदैव तत्पर होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली झाली होती. आप्पासाहेबांची स्वप्न साकार करण्याची प्रत्यक्ष वेळ आली होती. त्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार मुलांनी शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू केले. विहीर खोदण्याचे काम पोकलेन मशीन द्वारा सुरू होते. माती काम झाल्यानंतर खडक फोडण्यासाठी जिलेटिन कांड्याचा वापर केला जातो. त्याद्वारे खडक फोडला जातो म्हणून ट्रॅक्टरने विहिरीत बार घेण्यासाठी जिलेटिन कांड्या बांधावर ठेवण्यात आल्या होत्या. शेतकऱ्याच्या घरातील सर्वांनी याची माहिती होती.पण..आप्पाराव मात्र यापासून अनभिज्ञ होते. विहिरी शेजारी बांधावर गवत वाढलेले असल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे बांधावरील गवत जाळण्याची प्रथा शेतकऱ्याच्या मनामध्ये तरळत होती. आप्पासाहेब सकाळीच उठले आग काडीपेटी घेतली, शेतातील बांध पेटवण्यासाठी गेले. बांधाचे एका साईड पासून त्यांनी बांध पेटवला . वाळलेल्या गवत असल्यामुळे बांध पेटत पेटत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात होता. विहीरीजवळच्या टोकाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या होत्या, हे दृश्य त्यांच्या मुलाने पाहिले तोही जोरात धावत वडिलांकडे धावत गेला.तो ओरडून सांगत होता त्या ठिकाणी जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या आहेत. तेथील आग विझवा नसता तेथून दूर जा. सोपानराव सुद्धा घाबरून गेले त्यांना काय करावे कळत नव्हते. आग विझवावी कि तिथून पळून जावे,संभ्रमात असतानाच पेटलेला बांध मात्र जिलेटीनच्या कांड्यावर पोहोचला आणि नको ती गोष्ट घडली. क्षणामध्ये सोपान रावणच्या स्वप्नांचा चकनाचुर झाला . सोपानरावांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या जिलेटिन कांड्याचा स्फोट एवढा भयंकर होता की परिसरात चार ते पाच किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज घुमला ,घरावरची पत्रे थरथरली, प्रचंड असा आवाज येऊन आकाशामध्ये धुळीचे लोळची लोळ उडाले . प्रत्यक्ष स्फोटापासून आप्पासाहेबांच्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या, मृतदेह चाळीस ते पन्नास फूट उंच उडून पडला आणि एका सदग्रहस्थाचा अंत झाला. जवळच असणारा त्यांचा मुलगा ऋषिकेश पाहत होता . त्याला काय करावे? कळत नव्हते. त्या स्फोटामध्ये उडालेल्या माती व खडे त्याच्या चेहऱ्यावर जाऊन आरपार घुसले डोळेही अधू झाले. डोळ्यांवरती उपचार जालना येथील गणपती रुग्णालयात सुरू आहेत.
घडलेला प्रकार हा अत्यंत निर्दयी आणि संयमाचा बांध फुटणारी आहे . आपण सहज म्हणतो , ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला फळ मिळते . परंतु , या ठिकाणी अशी घटना घडल्यानंतर कर्म सिद्धांत थोडासा विक्षिप्त वाटतो. कारण , चांगले कर्म करणाऱ्याच्या वाट्यालाही अशी परिस्थिती निर्माण व्हावी. याला योगायोग समजावा की दुर्दैव समजावे. धार्मिक कर्म सिद्धांत थोडासा बाजूला ठेवला तर विज्ञान युगात वावरत असताना सत्य कडू जरी असले तरीही ते मान्य करावेच लागते. सूर्य कधी तळ हाताने झाकता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे विज्ञान युगात मशिनरी किंवा स्फोटकांशी खेळत असताना चुकीला माफी नाही हे सिद्ध होते. मग ती चूक कळत नकळतपणे का असेना चूकच सिद्ध होते. त्या ठिकाणी कोणाचीही गय केली जात नाही. अशा गोष्टी घडल्या म्हणजे आपण त्याला निव्वळ योगायोग किंवा प्रारब्ध असे समजतो प्रत्यक्षात मात्र वास्तव वेगळे असते म्हणून प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी.
शेतकऱ्यांना आवाहन...
वृक्षवल्ली आम्हा सोयरे.... असे म्हणत असताना आपण त्या वृक्षांची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे शेतातील बांध पेटवत असताना वृक्षलगत न पेटवता त्या ठिकाणी खुरपणी करून गवत काढावे. त्यामुळे त्या वृक्षाची निगा राखली जाईल. परिसरातील सर्व शेतांमधून चक्कर मारत असताना बरेचसे लिंबाची झाडं जळालेली ही आढळली. त्यामुळे निसर्गाची खूप मोठी हानी होते. अशा प्रकारची हानी होऊ नये म्हणून, बांधावरील गवत पेटवताना काळजी घ्यायला शिका. शेतकऱ्याच्या बांधावरील झाड कधीही तोटा देणार नाही त्याचा फायदाच करून जाईल.
📝#Rahul Dongardive
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा