भूकंप - राजकीय अस्थिरतेचा
नैसर्गिक संतुलन ही निसर्गाने संतुलित ठेवण्यासाठी स्वनिर्मित स्वरचना आहे . या ठिकाणी कोणत्याही एका गोष्टीचा उद्रेक झाल्यास तिला नियंत्रित ठेवण्यासाठी निसर्गाने त्यावर उपायही निसर्गनिर्मित करून ठेवले आहेत . पृथ्वीच्या अंतरंगाचा विचार करताना भूकवच, मध्यावरण आणि गाभा अशी रचना आहे . पृथ्वीच्या पृष्ठभागावर निसर्गनिर्मित सजीव सृष्टी आहे. यामध्ये कोणी कोणावर आक्रमण जर करत असेल तर, त्या ठिकाणी निसर्गाचे संतुलन बिघडायला लागते आणि त्यानुसार निसर्गर त्याच्यावर उपाय योजना करतो.याचाच परिणाम म्हणून पृथ्वीवर येणारी सुनामी ही भूगर्भातील हालचाली अर्थातच भूकंपामुळे येतात.. भूकंपाची तीव्रता आणि दाहकता जशी पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांना जाणवते ,त्यापेक्षाही तीव्र असे होणारे मानवनिर्मित भूकंप भयंकर असतात. एक भाग म्हणून आपण संवेदनशील या विषयाचा विचार करत असताना मानवनिर्मित अणुबॉम्ब त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा सहारक्षस्त्राने जीवित हानी तर होतेच , त्याचबरोबर त्याचे दुष्परिणाम शतकानू शतके भोगावे लागतात . गेल्या दोन वर्षापासून अशा प्रकारची दाहकता आपण पाहत आहोत . युक्रेन युद्धापासून जागतिक राजकारण ते प्रत्येक देशाचे राजकारण आणि त्याचा झालेला जगावर दूर गंभीर परिणाम सर्व जग अनुभवत आहे . जगाच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात की,त्याचा प्रत्येक देशावर परिणाम होतो . परंतु भारत या देशांमध्ये जागतिक वातावरणाबरोबरच प्रादेशिक वातावरण व राजकारण, केंद्र व राज्य संबंध, राजकारणातील कूटनीती व त्यासाठी आखली गेलेली रणनीती ही काही आगळी वेगळीच आहे.
भारतातील एकंदरीत एकूण राजकारणाचा विचार केला असता, आपले एक गोष्ट सहज लक्षात येते की, चालू असलेली परिस्थिती पक्ष व विरोधी पक्ष यांच्यामध्ये एक प्रकारची एकमेकांची कुरघोडी करण्याचा प्रयत्न. अंतिम विचार हा कोणत्याही मार्गाने सत्ता प्रस्थापित करणे व ती सत्ता टिकवण्यासाठी आणि भविष्यात पुनरसत्ता प्राप्त करण्यासाठी नको त्या स्थराचे राजकारण गलिच्छ पद्धतीने कसे राबवले जाते, याची सीमा ओलांडताना आपण पाहतो. प्रत्येक जण माझंच खरं, पण खरं ते माझं कोणीही म्हणत नाही. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला मीडिया मात्र 'गोदी मीडिया' म्हणून नावारूपास येत आहे . एखाद्या पत्रकारांना जर त्या विरोधात आवाज उठवला तर तो देशद्रोही संबोधला जातो . त्याच्यावर नको त्या एजन्सी वापर करून त्याला चांगलीच अक्कल घडवली जाते. असा सर्व विरोधी पक्षाचा सूर आहे..हे आपण दररोज भारतीय न्यूज चैनल वरून पाहत असतो . प्रत्येक राज्यामध्ये आपल्या पक्षाची सत्ता कशी आणायची व ती कशी टिकवायची याचा अत्यंत लेखाजोखा राजकीय पक्ष ठेवतात विचारसरणी व नैतिक मूल्य पायदळी तुडवतानाही कोणाला काहीही वाटत नाही. दोन्हीही बातम्या आपल्या मीडियातून दाखवल्या जातात . परंतु ,कोणत्या बातमीला किती महत्त्व द्यायचं? हे आपली मीडिया ठरवते. राष्ट्रहितापेक्षा व्यक्ति हित जास्त महत्त्वाचे वाटू लागले आहे. मान्य आहे प्रखर राष्ट्रवाद असू नये कारण त्यामुळे साम्राज्यवाद वाढ वाढतो . यातून सत्ता संघर्ष विकोपाला जातो हा सत्ता संघर्ष देशाच्या सीमा व इतर जागतिक मुद्द्यांशी संबंधित असतात. हाच सत्ता संघर्ष केंद्र आणि राज्य यांच्यात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असते.
भारतामध्ये बहुपक्ष पद्धती असल्यामुळे ,राष्ट्रीय राजकारणापासून प्रादेशिक राजकारणापर्यंत आपणाला अनेक प्रकारची राष्ट्रीय पक्ष ते प्रादेशिक पक्ष पहावयास मिळतात . त्यामुळे राष्ट्रीय पक्ष हा प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा किंबहुना कोठे कोठे निर्माण करण्याचा प्रयत्न परिस्थितीनुरूप केला जातो. असं म्हटलं जातं, केंद्राचे सरकार आहे ते राज्यात असलं म्हणजे, त्या त्या राज्याचा विकास होतो. या उलट जर विचार केला . केंद्रातील एक सरकारने राज्यातील विरोधी गटातील सरकार असल्यास त्या राज्याला मात्र त्रास होताना दिसतो आहे.
गत दोन वर्षाचा लेखाजोखा जर घेतला तर , सर्व न्यूज चॅनल वाल्यांनी महाराष्ट्रातील भूकंपाचा मोठा कांगावा केला होता. त्यानुसार सत्ता परिवर्तन ही झाले . राजकारणामध्ये डावपेच, कूटनीती आणि रस्सीखेच ही रणनीती जरी असली तरी , त्यानुरूप कार्य करणे मर्यादा ओलांडून नसावे . अशी ही धारणा असावी . याउलट राज्यातील वातावरण अस्थिर करून लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करणे आणि आमच्या शिवाय कोणत्याही राज्याला पर्याय नाही अशी सबब पुढे करणे . त्यानुसार जर परिवर्तन होत नसेल तर मात्र केंद्राच्या यंत्रणेतील असणारे एजन्सी याचा गैरवापर किंबहुना चांगला वापर कसा करायचा हे जो तो राजकीय पक्ष ठरवतो. कोणत्याही एका पक्षावर बोलायचं नाही. परंतु सरकार कोणाचेही असो त्यातील कमतरता शोधून जनतेसमोर मांडणे हा गुन्हा असू शकतो काय ? समाज हिताचे आणि राष्ट्रहिताची निर्णय सत्ताधारी पक्षांनी घ्यावे व त्यानुसार कृतीयुक्त कार्य पार पाडावे. ही त्या पक्षाची नैतिकता आहे. भारताच्या अखंडतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि त्यानुरूप पावले उचलणे ही भारतातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. निव्वळ टीका करायची म्हणून टीका करू नये. विरोधी आहात म्हणून विरोध करू नये. हा साधा सरळ नियम सर्वांनी पाळला तर , भारत विकसित झाल्याशिवाय राहणार नाही . 'विकसनशील ' शब्दातून आपण बाहेर पडू आणि हीच आपली खरी श्रद्धा आणि राष्ट्रवाद होय.
महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आणि सत्ता समीकरणांमध्ये जे काही बदल होत आहेत, हे अनपेक्षित जरी असले तरीही त्या त्या पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत. असं मतदान करणारी जनता चर्चा करत आहे . निवडणुका होतात तेव्हा सर्वच पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतात , वचननामा प्रसिद्ध होतो . त्यानुसार जनता त्यांना निवडून देते. हेच लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा मात्र जनतेच्या मताला कसलीही किंमत राहत नाही . त्यांना हवे तसे ते वागतात कटपुतलीच्या खेळाप्रमाणे ते खेळ करून दाखवतात. त्यांना खेळवणारा दुसराच कोणीतरी असतो. अशा पद्धतीची ही लोकप्रतिनिधी काम करतात. कधी कधी पहाटच्या प्रहरीच शपथविधी होतो... आठ दिवसाच्या आत पुन्हा सरकार पडते . नंतर काही दिवसांमध्ये नवीन सरकार तयार होते. दोन अडीच वर्षानंतर पुन्हा तोच खेळ खेळला जातो . ज्या खेळामध्ये केंद्र सरकारच्या बाजूने पारडे झुकलेले असते. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रादेशिक पक्षांना फोडले जाते, हे कामही प्रादेशिक पक्षातील इतर नेतेच करत असतात. त्यानुसार ते सत्ता हस्तगत करतात आणि राज्यकारभार सांभाळतात. भारतीय न्यायपालिका स्वतंत्र जरी असली, निर्णयाला मात्र वेळ लागतो. ही वस्तुस्थिती ! कारण, प्रत्येक पक्षाला आपले हक्क आणि कर्तव्याची जबाबदारी पार पाडत असताना , न्याय मागण्याचा अधिकार हा आहेच . म्हणून दोन्हीही पक्ष न्यायालयात धाव घेतात आणि प्रकरण न्याय प्रविष्ट बनते. पक्षांतर बंदी कायदा हा सुद्धा न्यायप्रविष्ट बनतो. निर्माण झालेल्या संवेदनशील मुद्द्यांवरती, प्रविष्ट प्रकरणावरती निर्णयास विलंब लागतो . त्यामुळे राजकीय पक्षांची बाजू तात्पुरती का होईना पुढे जाण्यास अनुकूल बनते.
न्यायप्रविष्ट प्रकरण जेव्हा बॉर्डरवर येते तेव्हा, मात्र दुसरा पर्याय शोधण्यास प्रारंभ होतो. इतर पक्षांची बहुमताचा आकडा काढण्यासाठी मदत घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ लागली असते. त्यामुळे नको त्या गोष्टींचा अवलंब राजकीय नेते करत असताना आपण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. हा भूकंप मात्र रिश्टर स्केलवर मोजता येत नाही , या भूकंपाची दाहकता सहजासहजी लक्षातही येत नाही . पण ..त्याचे दूर गंभीर परिणाम येणाऱ्या काळावर पडणार असतात. याची गंभीर दखल कोणीही घेत नाही. नंतर निवडणुका लागतील. पुन्हा तोच वचननामा जाहीरनामा यांची आश्वासने नवीन पद्धतीने मांडण्यात येतील. निसर्गाने सर्व मानवांना दिलेली 'विसरण्याची देणगी' ही राजकीय लोकांच्या कामाला येईल. पुन्हा नवीन राजकीय भूकंपाचे धक्के बसतील आणि पुढे कसे धक्के द्यायचे याचा विचार ही राजकीय लोक करून ठेवतात. नीती मूल्यांचा ऱ्हास होणारी राजकीय भूकंप आपल्याला नको आहेत. "व्यक्ती पेक्षा देश श्रेष्ठ! " ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजल पाहिजे. प्रथम 'राष्ट्र' आणि नंतर 'आपण' अशी सकस विचाराची भावना प्रत्येकाच्या मनात असल्यास, राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय प्रत्येक जण घेतील. मतदानाचा अधिकार हा 'दान' म्हणूनच केला जावा. योग्य उमेदवारास योग्य मतदान दिल्यास देशाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.
चला संकल्प करूया ,
विकसनशील या शब्दातून बाहेर पडूया ,
विकसित भारत घडवूया !!!
जय हिंद!!जय भारत!!!
Writer :- 🖊🖊🖊Rahul Dongardive
खूपच छान
उत्तर द्याहटवाThanks sarpanch
उत्तर द्याहटवाChan DR Sir
उत्तर द्याहटवाThanks Satis sr
उत्तर द्याहटवा