
स्त्री एक उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. संकुचित प्रवृत्तीने अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवणे आधुनिक युगा नुसार जरी अयोग्य असले, तरीही आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्या प्रकारचा विचार, मानव प्रवृत्ती मध्ये दिसून येतो. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण, प्रस्तुत प्रकरणांमध्ये जेव्हा जेव्हा मानवी अस्मितेची भावना निर्माण होते, तेव्हा..तेव्हा, मानव म्हणून मानवतावाद आणि मानवता याचा विहंगम दृश्य रंगवताना आजचे सुधारणावादी लोक आपण पाहतो. तेव्हा मात्र वास्तव हे वेगळेच आहे.कारण बोलणे आणि कृती करणे यात जमीन आसमानचा फरक आहे. स्त्री विषय असणाऱ्या मानव विकृती , ही जेवढी गंभीर तेवढीच भयंकर आहे . सुधारणावादी विचार मांडत असताना किंवा करत असताना समाजाकडे आपण सहज अंगुली निर्देश करतो. पण आपणही त्या समाजाचा एक बिंदू आहोत हे विसरतो. स्त्री विषयी हीन भावना आजही बदलत नाहीये. तिचे स्वरूप समाज व्यवस्था ,जातीय व्यवस्था, धर्म व्यवस्थापन व्यवस्था यामध्ये रुजलेले आपण पाहतो. फरक एवढाच आहे प्रत्येक जण आपली भूमिका आणि इतरांची भूमिका यात भेद करतो आहे. त्यानुसार आपण कसे वेगळे आहोत . असा ससे मीरा मिरवताना आपण पाहतो किंबहुना भ्रमनिरासपणे मृगजळ दाखवतो. याचाच परिपाक आणि पक्व हेतू म्हणजे, 'द केरला स्टोरी होय.'
प्रस्तुत चित्रपटांमध्ये ही कथा पूर्णपणे एक 'कट 'आहे. चित्रपट एका नर्सिंग कॉलेजमध्ये सुरू होतो. त्या ठिकाणी त्यांना समाजसेवा , समाजाप्रती आपली बांधिलकी आणि कर्तव्य शिकवले जाते. त्यानुसार त्या मुली कार्यही करतात अर्थात शिक्षणात सुरू होते. नरसिंग चे शिक्षण घेत असताना तीन मैत्रिणी त्याचबरोबर एक चौथी मैत्रीण सुद्धा त्यांना मिळते. शालिनी उन्नीकृष्णन अर्थात फातिमा, निमा ,असिफा, गीतांजली या चार मैत्रिणी. नर्सिंग चे शिक्षण घेण्यासाठी एकत्र आलेल्या, एकाच रूम मध्ये राहतात. चौघींचीही कॉलेजमध्ये एन्ट्री होते . शालिनी, निमा आणि गीतांजली या नवख्या मैत्रिणी एकत्र राहत असताना त्यांच्यासोबत असणारी 'असिफा' ही देखील नर्सिंग शिक्षण घेत होती. चित्रपटांमध्ये असिफाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. कारण ,यांच्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात राबवणारी आणि त्या गोष्टींना योग्य प्रकारे वळण देणारी, कट रचनारी व इस्लाम धर्म विषयीचा सकारात्मक ब्रेन वॉश करून 'अल्ला' कसा मोठा आहे. याविषयी आपली भूमिका आणि सकारात्मक पाऊल पुढे उचलताना इसिसचे संबंधित दाखवली आहे. आय. एस. आय. एस. म्हणजेच, 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' या ठिकाणी अशा बळी पाडून आणलेल्या स्त्रियांना भरती केले जात असायचे. तेव्हा इसिसचे महत्त्व आणि इतर धर्म कसे तुच्छ आहेत . 'अल्लाह' एकमेव महान आहे. याची व्याख्याने देताना असिफा चित्रपटात दिसते.
शालिनी असिफाच्या चर्चेने आणि दिलेल्या व्याख्यानाने एवढी प्रभावित होताना दिसते की, आशिफाचे बोलणे शालिनीच्या गळी लवकर उतरते. आसिबाच्या प्रत्येक बोलण्यावर ती लक्ष देऊन ऐकते . शरीयत कानून जाणून घेण्याचा प्रयत्न करते, काही दिवसाच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. दिवाळीच्या सुट्टी असतील किंवा इतर सुट्ट्यांमध्ये शालिनीचे गाव दूर असल्यामुळे ती जास्त करून गावी जात नसायची. असिफा मात्र तिला आपल्या घरी घेऊन जात होती. ईद असेल किंवा इतर सणांच्या दिवशी आसिफा- शालिनी, निमा, गीतांजली एकत्र येऊन सर्व परिवारासोबत सण उत्सव साजरा करत असत. जेव्हा संधी भेटेल तेव्हा असे असिफा मात्र मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ! आणि अल्लाह कसा महान आहे. याची एकही संधी सोडत नव्हती. दोन हिंदू आणि एक ख्रिश्चन मैत्रीण असणारी फक्त असिफाच बोलणं ऐकून घेतात. मुस्लिम धर्माच्या अनुकरणाचा किंवा त्यानुसार बदल करण्याचा त्यांच्यामध्ये कोणताही लवलेश दिसत नाही. तेव्हा मात्र या तिघी जनीची पूर्वनियोजित कटकारस्थानानुसार एका दुकानांमध्ये वस्त्रे फाडली जातात. त्यांना खुलेआम- चेतावणी दिली जाते. एवढ्या मोठ्या दुकानांमध्ये कोणीही त्यांच्या मदतीला येत नाही. त्यामुळे तिघेही खचून जातात. तेव्हा ही गोष्ट असिफाला कळते . तेव्हा मात्र ती हिजाब अर्थात बुरखा महत्त्व समजावून सांगते . बुरखा तुम्ही घातला असता तर , तुम्हाला कोणीही छेडले नसते. तेव्हापासून तिघी हिजाब घालायला सुरुवात करतात.

हिजाब जेव्हापासून या तीन मुली घालायला सुरुवात करतात, तेव्हापासून त्यांची कोणीही छेड काढत नाही.तेव्हा मात्र शालिनी पूर्णपणे इस्लाम धर्माकडे झुकलेली दिसून येते . तिची ओळख संबंधित असणाऱ्या कथित डॉक्टर भावाबरोबर होते. याच ठिकाणी आपल्याला ' लव्ह जिहाद', दिसून येतो . कारण , घडणारी स्टोरी ही पूर्वनियोजित कटकारस्थान दिसून येते . त्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून घेण्यासाठी त्या मुलांना हवे ती रक्कम व नको ते स्वातंत्र्य दिले गेलेले असते . त्यावरच पुढील पैसा त्यांना ठरलेला असतो . पूर्णपणे एक धर्म मोठा आणि बाकीचे सगळे छोटे कसे आहेत? त्याची विचारधारा कशी अचूक आहे ? हे त्यांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. इथे एक प्रश्न पडतो, एवढ्या सुशिक्षित असणाऱ्या मुली, चांगल्या घराण्यातील मुली यांच्या विरोधात एखादं कटकारस्थान केलं जातं. तरीही त्यांच्या लक्षात येत नाही . ही गोष्ट मात्र थोडी विरोधाभासात्मक वाटते.
परत एकदा एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जी मुलगी आपल्या प्रियकरापासून गरोदर राहते , तोच प्रियकर अचानक गायब होतो. शालिनी अर्थात फातीमाच्या अब्रूची लुटा लुट करून इज्जतीची लक्तरे वेशीला टांगतो. काही दिवसानंतर आपला प्रियकर आपल्याला सोडून गेला, तेव्हा मात्र ती अत्यंत खचून जाते. जीवन संपवावेसे वाटते ,आपण फसलो याची तिला जाणीवही होते . घरचे आपणास स्वीकारणार नाही , दोष द्यायचा कुणाला? आणि याच्यावर उपाय काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला शोधूनही मिळत नाही. शेवटचा पर्याय म्हणून मौलवींचे मार्गदर्शन घ्यावे . यासाठी ती मुलगी जाते . इज्जत जाऊ नये म्हणून मौलवींच्या सांगण्यानुसार दुसऱ्या तरुणाला आपला पती मानते . मौलवींचे शब्दही तितकेच प्रखर आणि करारी असतात , ' निकाह अगोदर प्रियकरा बरोबर आलेल्या संबंधातून जे आपत्य पोटात वाढत आहे हे पाप आहे. हे पाप धुऊन काढण्यासाठी एका नवीन पुरुषाबरोबर निकाह करणे आणि त्याच्याबरोबर भारतात बाहेर सीरीयाला जाणे हा एकमेव पर्याय मौलवी देतात. याला अंधश्रद्धा म्हणावे की धर्मांधता ?

जो 'अल्लाहशी' काफीर होतो, जो काफीर असतो तो पापी असतो त्याच्यातून जर मुक्ती मिळवायचे असेल तर काफीर झालेल्या व्यक्तीला दगडाने मारावे किंवा त्याच्या तोंडावर थुंकावे तरच अल्ला नाराज होत नाही तो खुश होतो अशी दाहक प्रतिमा गीतांजलीच्या समोर उभी करून मृत्यूच्या दारावर उभा असणाऱ्या पित्याच्या तोंडावर गीतांजली थुंकते आणि काल्पनिक असणाऱ्या पापातून मुक्ती पाण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. ही तिची आपल्या धर्माविषयी अर्थात नवीन धर्माविषयी आपुलकी आणि ओढ होती, हे इथे निश्चित होते. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करावे ,त्याच्यासाठी माता, भगिनी, वडील यांचा त्याग करून मुस्लिम धर्म स्वीकारावा . इसिसमध्ये समाविष्ट व्हावे. यासाठीचे प्रयत्न जेव्हा तिच्या लक्षात येतात, तेव्हा मात्र तिची नग्न चित्रे सोशल मीडियावर व्हायरल करून तिच्या घराची, तिची इज्जत चव्हाट्यावर आणली जाते ..तेव्हा मात्र आपण या कटामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालो आणि आपला मार्ग चुकला याची जेव्हा तिला जाणीव होते.तेव्हा मात्र, जग संपलेला असतं.कारण , समाज काय म्हणेल ? आपल्या इज्जतीचा चोळामेळा आपल्या प्रियकराने असे सार्वजनिक करावा.. त्याचा तिला एवढा पश्चाताप होतो की, जवळच असलेल्या हिजाबने गळफास घेऊन आत्महत्या करते. शेवटी पर्याय उरलेला नसतो.
चित्रपट हा वस्तुस्थितीशी संबंधित आहे किंवा जवळीकता आहे. असे असले तरीही चित्रपटात पूर्ण राजकारण दिसते आहे. कम्युनिस्ट कार्यकर्ता व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीचा विचार करताना स्वतःच्या मुलीला धर्माचे शिक्षण देत नाही ही बाब प्रकर्षाने दाखवली आहे. त्यामुळे तिच्यावर संस्कार रुजले नव्हते. म्हणूनच तिच्यावर इस्लामी धर्माचा प्रभाव पडला, अशी झलक पाहायला भेटते.

वरील तीनही मुली जेव्हा धर्म शिक्षण घेतात तेव्हा त्या ठिकाणी इतरही मुली असतात. त्यांचेही तीच काम असते, त्यांनाही असंच फसवलेलं असतं,अशी भाग्यलक्ष्मी सांगते. असं निष्पाप मुस्लिम मुलावर प्रेम करणाऱ्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची अशीच फसवणूक झालेली या चित्रपटातून दिसते. सुरुवातीला ह्या मुलींना लव जिहादच्या नावाखाली आणि इसिसच्या भरती करिता कसे ब्रेनवॉश केले जाते. याचीसुद्धा एक कूटनीती आणि पूर्वनियोजित षडयंत्र पावलो पावली दिसून येते. सुरुवातीच्या प्रेमलीला मात्र जेवढ्या सुखद आणि आल्हाददायी चित्रित केलेले आहेत, त्यापेक्षा भयंकर त्या मुलींची भरती इसिस मध्ये होते.तेव्हा मात्र, त्यांच्यावर एका वेळेला अनेक जण बलात्कार करताना दिसतात. हवस भागवण्याची ती एक मशीन म्हणूनच तिचा वापर केला गेला. जिन विरोध केला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला तिच्या डोक्यात गोळीच दिसली! !आधुनिक युगामध्ये मोबाईल बंदी आहे , हा आश्चर्यचकित करणारा विषय . त्याचबरोबर ज्यांनी वापरला ,त्या महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे . ही एक अत्यंत निंदनीय बाब असून स्त्री स्वातंत्र्यावर मोठा घाला आहे. शालिनी गरोदर असताना तिच्यावर केलेला बलात्कार अत्यंत निंदनीय वाटतो. मानवतावादी दृष्टिकोनाला एक मोठी चपराक आहे. असे दुष्कृत्य होत असेल तर मग 'अल्लाह'चा अनुयायी तो खरच आहे का?
चिंतन...
वरील सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते, प्रत्येक समस्या ही निर्माण होत असते. पण....ती समस्या अंतिम असू शकत नाही. सुशिक्षित असणाऱ्या मुली छोटीशी कट रचना त्यांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्ष देते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय उरत नाही . म्हणून ,सर्व सुजाण मुलींनी प्रलोभनाच्या पाठीमागे किंवा दिखाउ सौंदर्याच्या पाठीमागे न लागता ,आई-बाबांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासावर विश्वास ठेवून त्यांच्या विश्वासांना तडा जाता कामा नये असे वर्तन करावे. ज्यामुळे आई-बाबांना गर्व वाटेल, देशसेवा ,समाजसेवा आणि समाजाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आलेल्या संधीचे सोने करावे अशी शिकवण मनी बाळगावी . शंभर लोक म्हणतात म्हणून, ते सत्य आहे . ही गोष्ट टाळावी . स्वतःच्या मनपटलावर उमटणाऱ्या छटा चांगल्या किंवा वाईट सत्याची सचोटीवर त्या उतरतात किंवा नाही. दूरदृष्टीचा विचार ठेवून पावले उचलली तर, ती व्यर्थ जाणार नाही असा विश्वास वाटतो . जगातील असा कोणताही धर्म नाही जो वाईट शिकवण देतो. प्रत्येक धर्म हा प्रेम शिकवतो, दया , करुणा, माया- ममता या सर्व धर्मामध्ये नीती पाहायला मिळतात . फक्त मांडणी आणि संरचना वेगळे असू शकते . पण प्रत्येक धर्माचे हित आणि सार मानव कल्याण हेच आहे. यावरून स्पष्ट होते . कोणताही धर्म मानवहिताशी किंवा मानव देहाची खेळत नाही . तो फक्त 'मानव कल्याण ' समर्पित आहे. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
अशा घडलेल्या, मानव कल्याणाच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या घटना निंदनीय आणि कलंकित जरी असल्या तरी, त्याचे योग्य मार्गदर्शन करून उपाय शोधणे काळाची गरज आहे. पण जेव्हा जेव्हा राजकीय पक्ष चित्रपट प्रमोट करतात. काही राज्यांमध्ये बंदी होते तर, काही राज्यांमध्ये टॅक्स फ्री साठी मागणी केली जाते . एवढेच काय तर राजकीय लोक चित्रपट गृहे बुक करतात. म्हणजेच प्रेक्षकांना फुकट सिनेमा दाखवतात आणि तेही कुठेतरी राजकारण , प्रचार, प्रसार आणि निवडणुका तोंडावर , असं होतं. निश्चितच ही लांच्छनास्पद बाब आहे.
# 📝डोंगरदिवे राहुल