ब्रह्मलीन निगमानंद महाराज यांची मूर्ती
जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे होए ||"
अध्यात्मातील ज्ञानाची गोडी निर्माण झाल्यानंतर भक्तीत तल्लीन होऊन नवीन शोधाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना, तहानभूक हरवून दुःखाचे कारण शोधत आत्मशक्ती जागृत होते. तिलाच आपण दैवी शक्ती असे म्हणतो. या दैवी शक्तीला प्राप्त करून घेण्यासाठी योग साधना अत्यंत महत्वाची असते. चित्त शुद्ध, एकाग्र झाले. अर्थातच सर्व विकारी गोष्टीवर नियंत्रण होते. या गोष्टीची परिपूर्ण जान ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराजांना होती. सदैव त्यांनी प्रभू नामाच्या चिंतनाची आस सोडली नाही. संकटसमयी भगवंताचा धावा तर सगळेच करतात. परंतु , सुखांमध्ये हि प्रभू नामाची आवड आणि निवड करता आली म्हणजे, त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. ही विशेष बाब भक्तजनांना बाबा सांगत असत. सर्व भक्तां प्रति बाबांची आशीर्वाद रुपी दया एक आगळेवेगळे विलक्षण देवत्व सिद्ध करते. प्रत्येकाची समस्या समजून व त्यावर योग्य असा उपाय सुचवणे किंबहुना संकट मुक्ति चे मार्गदर्शन बाबा करत असायचे. जीवन प्रवास खूप खडतर होता. या संघर्षमय जीवनात आत्मशुद्धी साठी शिक्षणाची आस कधी सोडली नाही. शिक्षण हे शैक्षणिक अथवा अध्यात्मिक असो ते परिपूर्ण असले पाहिजे . त्याविषयी सखोल ज्ञान असणे ही त्या विद्यार्थ्याची तळमळ असली पाहिजे.
मायंबा च्या सेवेसाठी निघालेले सिताराम महाराज अर्थातच आजचे निगमानंद बाबा! ज्ञानासाठी प्रथमता आळंदी नंतर पंढरपूर. आध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी - उच्चशिक्षणासाठी ऋषिकेश कडे बाबा वळू लागले. जिद्दीच्या जोरावर त्यांनी ऋषिकेश गाठले . बारा वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर त्यांनी वेद, उपनिषदे यांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांचे गुरू बाबां वरती एवढे खुश झाले की, त्यांनी बाबांना "निगमानंद" ही पदवी दिली. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास वेदातील आनंद असा त्यांचा अर्थ होतो. एवढंच नाहीतर भगवद्गीतेवरील त्यांचे प्रभुत्व एवढे होते की, एका पाश्चात्त्य व्यक्तीला भारतीय अध्यात्माने वेड लावावे. भगवद्गीता इंग्रजीतून शिकण्यासाठी बाबांच्या गुरुंकडे त्यांनी अट्टाहास धरला. बाबांच्या गुरूंनी मात्र निगमानंद इंग्रजीतून भगवद्गीता शिकवतील असा आदेश बाबांना दिला. इंग्रजीचे कसलेही ज्ञान नसताना त्या परकीय नागरिकाकडून इंग्रजी शिकून भगवद्गीतेचे भाषांतर इंग्रजीमध्ये सांगावे, ही एवढीच सरळ आणि साधी गोष्ट नव्हती. नंतर बाबांचे इंग्रजीवरील प्रभुत्व परिसरातील सर्व नागरिकांनी अनुभवले. एवढेच नाही तर बाबांनी या अंधकार मय परिसरामध्ये ज्ञानरूपी वटवृक्ष लावण्याचे कामही केले. श्री निगमानंद विद्यालय निमगाव येथे 1986 च्या नंतर विद्यार्थ्यांना इंग्रजी सुद्धा शिकवली ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हे वास्तव चित्र तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अनुभवणे, हे त्या विद्यार्थ्यांचे भाग्य!
देव म्हणजे आहे तरी काय ? एखाद्याचा पाठीवरती हात असणे, आणि एखाद्या संकटावर मात करणे. तोही देवच ! एखाद्याचा पाठीवरती हात नसणे आणि बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणे. अर्थात स्वयंस्फूर्तीने स्वतःतील चेतना जागृत करणे, तोही देवच ! एखाद्याच्या शाब्दिक आधाराने अस्थिर मनाला स्थिर करणे, तोही देवाच ! या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळणे त्यालाच संत म्हणतात. या संतांचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे, तोही देवाच! देवाचा अनुभव आणि अनुभूती ही वेगवेगळी असू शकते .सार मात्र' यश' हाच आहे. हाच अनुभव बाबांच्या सानिध्यातील भक्तगण घेत असावेत. म्हणूनच नांदेवाली याठिकाणी ब्रह्मलीन निगमानंद महाराजांचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. त्यामध्ये मनाला मोहीत करणारी मूर्ती एक आगळेवेगळे आश्चर्य. गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे सुद्धा मोठ्या आनंदी उत्साहाने तळणेवाडीकर बाबांची मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उभारणी करत आहेत. ही बाबांवर असणारी त्यांची श्रद्धा आणि भक्ती होय . मंदिरातील मुर्त्या पाहिल्यावर आपल्या असे लक्षात येतं, त्या मूर्तींची कीर्ती खूप असते . समाज विकासित व्हावा, त्याचे भले व्हावे ही प्रांजळ भावना त्या संतांच्या ठायी असते. त्यासाठी त्यांना अनेक समाज कंटक यांच्याशी लढा उभा करावा लागतो. तोही अहिंसा ,अध्यात्मिक शक्ती द्वारे .परंतु, हे परिवर्तन इथे सहज आणि सरळ सोपे नसते. त्यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. समाजाकडून होणारा त्रास सहन करावा लागतो. तोही समाजाच्या भल्यासाठी! हे विशेष . तेव्हा कुठे त्यांना देवत्व प्राप्त होते. अशा या महान संतांच्या चरणी नतमस्तक होतो .जय निगमानंद!
लेखक :: डोंगरदिवे राहुल रामकिसन