शनिवार, २७ मार्च, २०२१

कोरोना योद्धा

कोरोना योद्धा



कोरोनाचा प्रसार एवढा भयानक होता की,  अख्ख जग थांबलं. याचा अति प्रसार होऊ नये म्हणून प्रत्येक राष्ट्रांनी काही उपाय योजना आखल्या. त्यालाच आपण आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतो. आपत्ती व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी ज्या-त्या राष्ट्र प्रमुखांनी सर्व देश लॉकडाऊन करण्यात आला. विमान सेवा  सुरूअसल्यामुळे कोरोना एवढा पसरला. त्याची जाणीव,  तीव्रता आणि भयानक स्वरूप, समोर येण्याअगोदर त्याने सर्व जग व्यापून टाकले. एवढ्या तीव्र स्वरूपाचा विषाणू जगाला भांबावून सोडतो. अशा घटना जगात क्वचितच घडतात. याचे नियोजन आणि प्रसार थांबवण्यासाठी संपूर्ण जग किंबहुना जगातील मानव जात मेटाकुटीला आली. हे सांगणे नवं नाही.covid-19 येऊन एक वर्षे उलटूनही गेले. पण, त्याची दाहकता आणि त्याचे भयानक स्वरूप जगाला या विळख्यातून बाहेर काढेल, असे  स्पष्ट होत नाही. कारण, त्याचे विविध रूपं शास्त्रज्ञाने बाहेर काढली. प्रत्येक रुपाचं स्वरूपही वेगळं, त्यामुळे त्याच्यावर उपचार करणही सध्या तरी  शास्त्रज्ञाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. असे चित्र स्पष्ट दिसत. जागतिक संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक देशाचे लाखो कोरोना योद्धे जीवाची बाजी लावून अदृश्य असणाऱ्या शत्रूशी लढताहेत, म्हणूनच भयावह असणाऱ्या विषाणूला लगाम लागला आहे. 

 आपत्ती व्यवस्थापन म्हणून शासनाने आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांना कोरणा योद्धा म्हणून बाहेर काढले. डॉक्टर्स, नर्स, इतर स्टाफ यांनी स्वतःला मृत्युच्या दाढेत ढकलून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले. पंधरा-पंधरा दिवस महिना-महिना घरदार सोडून दवाखान्यातच मुक्काम ठोकला. दवाखान्याची ड्युटी करून पुन्हा पंधरा दिवस विलगीकरण कक्षामध्ये राहिले. डॉक्टर्स नर्स त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा दवाखान्यामध्ये व्यवस्थित नव्हती. त्यांच्या व्यथा आपण सर्वांनी ऐकल्या आहेत. ज्यांची मुलं मोठी होती त्यांचा काही प्रश्न नव्हता. काही मुलं तर खूपच लहान होती .  डॉक्टर्स नर्स यांचे काय हाल झाले असतील? त्याचा विचार करणं खूपच कष्टदायक आहे. अशीही एक नर्स पाहिली की, तिच्या मुलीला बाहेरुनच आई दाखवण्यात आली . तिचा टाहो डोळ्यासमोर तरळत आहे. ड्युटी करूनही पंधरा-पंधरा दिवस भेट होत नाही. याचे दुःख त्या मातेपेक्षा- वडिलांपेक्षा त्या लहान मुलांना विचारलेले बरे . कारण त्याची कल्पना आपण नाही करू शकत. 

कोरोना वॉर्डमध्ये शक्यतो कोणी ड्युटी करायला तयार होत नसे, शेवटी शासन आदेशही सक्तीचे होते.त्यामुळे ड्युटी करणं तर भागच होते. काही डॉक्टर्स,नर्स ने स्वच्छेने पुढाकार घेतला. त्याच शासन स्तरावरच सामाजिक स्तरापर्यंत  कौतुकही करण्यात आलं. त्यांचा मान सन्मान ही राखण्यात आला. मीडियानही त्यांना चांगली प्रसिद्धी दिली. पण..एखाद्या  डॉक्टर किंवा नर्स चा मृत्यू झाल्यानंतर मात्र त्या कुटुंबाची दखल घेण्यात आली का ? असा प्रश्न मनाला सतावतो.नामवंत डॉक्टर, नर्स यांचा बळी गेलेला आपण सर्वांनी पाहिले. एवढंच काय तर अनेक पत्रकारांचा कोरोनामुळे  बळी गेला .त्यानंतर त्या कुटुंबाची काय वाताहत झाली,हे शब्दात सांगणे तर कठीणच आहे. परंतु, त्या भावना ही व्यक्त करता येत नाहीत. कारण ,त्यांना विमा मिळालाही असेल,समोर ते कुटुंब उध्वस्त झाली.ते कुणीही नाकारू  शकत नाही. 

Covid-19 चा पेशंट सापडल्यानंतर त्याचं ट्रेसिंग केलं जायचं,सापडलेल्या त्या रुग्णावर  लक्ष ठेवण्याचे काम  नर्स आणि डॉक्टर यांनी केल. सुरुवातीला यावर उपचार हे नव्हते. डॉक्टर जीवाची बाजी लावून लक्षणांवरून औषध उपचार करत होते. कुठे यश येत होतं तर कुठे अपयश यायचं. covid-19 मे अनेक लोकांचे बळी घेतले. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले. घरातील कर्ता गेल्यावर त्या कुटुंबाची कशी अवस्था होते? त्या कुटुंबाला सामाजिक कोणकोणत्या अडचणी येतात? एकेकाळचे सदन कुटुंब आज तुटपुंज्या  मदती वरती जीवन जगत आहे. वैभवाच्या फक्त आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर येतात आणि तेच डोळे आज पाणवताना दिसतात. कोणा एक पहिला रुग्ण बरा झाला त्याला डिस्चार्ज देताना, एखाद्या सासुरवाशिणीला माहेरी जाताना जो आनंद होतो, तो आनंद देण्याचा प्रयत्न याच डॉक्टर आणि नर्स यांनी दिला. हातात गुलाबाचे फुल, वाजत गाजत त्याची रवानगी त्याच्या घरी करताना या लोकांनी कधीही जिवाची पर्वा केली नाही. टाळ्या वाजून त्याला घरी पाठवले. आनंद आपल्याला दिसत होता.परंतु, तो आनंद व्यक्त करत असताना त्यांच्या आनंदावर विरजन होतं. हेही आपल्या लक्षात ठेवायला हवे. रुग्णालयातील या लोकांची कोणीतरी घरी वाट पाहत होतं. ती त्याची बायको होती, पती होता ,आई वडील होते, लहान लहान मुलं होती, हा त्याग त्या पाठीमागे होता. म्हणून,रुग्णालयातील रुग्ण उपचाराने बरा होत होता. रुग्णा वरती उपचार करत असताना अनेकांचा बळी गेला. त्या घरात कधी आनंद दिसलाच नाही, ही करून काहिनी आपल्या स्मरणात राहील काय? 

हॉस्पिटल मधील लोकांचे कार्य अविश्वसनीय, अतुलनीय, अकल्पनिया आहे. यावरती विचार करताना या लोकांचा बळी आणि त्या लोकांचे योगदान वाखानण्याजोगे आहे. याला साथ देण्यासाठी पोलीस विभाग कोठेही पाठीमागे नव्हता.भर रस्त्यावर ती जनसंपर्कात जाऊन लोकांना त्यांच्या जीवाचे महत्त्व अनेक पोलीस दादांच्या गाण्यातून आपण ऐकले आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे नियम कडक असतात . नियमांची पायमल्ली झाल्यास पोलीस प्रशासन सतर्क होते.कधी कधी त्यांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात ते काही दुश्मनीचा बदला घेत नव्हते.परंतु, आपल्या जिवाच्या रक्षणासाठी  तुम्ही घरात राहा हा संदेश देत होत. पोलिसांनी विनवण्या केलेले सुद्धा व्हिडीओ खूप व्हायरल झाले.मग वर्दीतील सगळेच वाईट किंवा चांगले तर्कवितर्क कशाला. त्यांची भूमिका रस्ता आणि कायदेशीर होती. शेवटी विनंतीला मान न दिल्यास प्रशासनातील योग्य त्या कलांचा अविष्कार होता ना तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिलं.भारत बंद झाला . राज्य बंद झाली.जिल्हा तालुके गाव खेडी सर्व बंद झालं. हे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे पाहिजे तेवढे धन्यवाद द्यायला कमीच पडतील. 

मोठमोठ्या शहरांमध्ये पोलीस विभागाचे अनेक पोलीस कोरणा युद्धामध्ये बळी गेले. परंतु,पोलीस दादा कधीही डगमगला नाही.  त्याने सदैव जनसेवे मध्ये समाधान मानले. ह्या न दिसणाऱ्या covid-19 शी मोठ्या जोमाने लढा दिला. आपत्ती व्यवस्थापनामध्ये अशी कल्पना केली की, जर पोलिसदादा नसता तर लॉक डाऊन शक्य होते का ? त्याची उत्तरे सहज मिळेल ना! यावरून पोलिसांचे महत्त्व किती आहे, हे लक्षात येते. असं म्हणतातना,सगळेच वाईट नसतात आणि सगळेच चांगले ही नसतात . म्हणजे चांगले आहे ते घ्यायला काय हरकत आहे. पोलीस दादा एक रक्षकच म्हणावा लागेल. 

आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांचे कर्मचारी जेव्हा कमी पडू लागले. तेव्हा, या लढ्यात शिक्षण विभागानेही उडी घेतली. हा लढा चालू ठेवण्याचे काम केले. अनेक प्राध्यापक शिक्षक यांनी आरोग्य कर्मचारी आणि पोलीस विभाग यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले. डॉक्टर बरोबर शिक्षक टिकला आणि पोलिसांबरोबर ही टिकला दोन्ही विभागाकडून या शिक्षकांना प्राध्यापकांना मानाची वागणूक मिळाली. दोघांमधील दुवा साधण्याचं काम या शिक्षकांनी केलं. हे काम करत असताना ड्युटीवर असताना शिक्षकांचे प्राण तर गेलेच. ड्युटी च्या अगोदर किंवा नंतर घरी पोहोचत असताना किंवा ड्युटीवर पोहोचताना एक्सीडेंट मध्ये गेलेल्या शिक्षकांची नोंद जरा शासनाने उशीरा घेतली. असं ऐकायला मिळालं, ड्युटीवर गेला नाही अर्थात मृत पावला नाही. म्हणून तो विमा धारक होऊ शकत नाही. हा अजब कारभार शासनाने दाखवला. आजच कूटप्रश्न दिसतो आणि कूटनीति दिसते. त्या कुटुंबावर  शोककळा पसरली. त्यापेक्षा भयानक, शासनाने दुर्लक्ष केले , हे सर्वात मोठे दुर्भाग्य! 

दोन विभागाशी शासनाचा व्यवहार आणि शिक्षण विभागाशी अलग व्‍यवहार विचलित करणारा ठरतो. कामामध्ये कसूर करणार, यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाचा  नियम आहे . पण कर्तव्य बजावत असताना जाताना किंवा येताना तो मृत पावला तर त्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करणे हा कोणता नियम आहे? 

शिक्षकांचे योगदान कशाप्रकारे होते याची साक्ष देण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग आहेच ना! या तिघांनी मिळून लोक डॉन मधील परिस्थिती  योग्यरित्या हाताळली. तिघांच्या समन्वयाने आलेल्या प्रत्येक नागरिकांची नोंद घेण्यात आली. जिल्हयात येणाऱ्यांना जिल्हा बाहेर जाणारे, यांचा तपशील शासनाला योग्य वेळी पोहोचवला. प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी करण्यात आली. कुठून आला ? कुठे चालला? याचीही नोंद करण्यात आली. आलेल्या covid-19  बाधित प्रवाशांकडून शिक्षक पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांना कोरोना झाला. यामध्ये अनेक शिक्षकही मृत पावले. संपर्कात आल्यानंतर या  विभागातील कर्मचाऱ्यांना पंधरा-पंधरा दिवस विलगीकरण कक्षामध्ये राहावे लागले. या ठिकाणी कुसुमाग्रज सहज आठवतात," मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा , पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा" अशी शिक्षकांची किमया. 

डॉक्टर, नर्स ,प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. वास्तविक पाहता मैदानावर फ्रंट वारियर म्हणून या तीन विभागानं काम पाहिले आहे,पाहत आहे, आणि पाहत राहणार. कारण ,मानव निर्मित आपत्ती टाळण्यासाठी किंबहुना प्रतिरोध करण्यासाठी या मानवालाच उभे रहावे लागेल ,त्याशिवाय गत्यंतर नाही. 

समाज निर्मितीमध्ये शिक्षकांची कार्य अवर्णनीय आहे. कोणत्याही समाजाची निर्मिती करण्यासाठी त्याला योग्य आकार देण्यासाठी शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे. एक सृजनशील समाज कसा घडवायचा? हे शिक्षकांच्या हातातच आहे. शिक्षकांनी ठरवले तर समाजनिर्मिती सृजनशील होते. आई-वडिलांच्या संस्कारानंतर मुलावर अमूल्य असे संस्कार शिक्षकच करतात. शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये फक्त शिक्षकच नाही, तो घरून निघाल्यापासून शाळेत येई पर्यंत शिक्षण घेत असतो. शिक्षक फक्त त्याच्या स्वप्नांना मार्ग दाखवतात. त्या मार्गाने जायचे किंवा नाही जायचे, हे सर्वस्वी विद्यार्थ्यांच्या हातात असते. विचार प्रभावी असले तर, सर्व विद्यार्थी त्याकडे आकर्षित होतात . आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी तत्पर असतात. याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. सामान्य परिस्थितीतून असामान्य काम करणारे विद्यार्थी आपण पाहतो. 

Covid-19 च्या विषाणू संदर्भात समाजामध्ये समज गैरसमज आहेत. सुरुवातीला बाधित रुग्णांना संबंधी अनेक तक्रारी आल्या. त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले.  समज गैरसमज पसरवू नये, हा आजार पूर्णपणे बरा होतो. हे सांगण्यासारखे राहिले नव्हते. सोशल डिस्टंसिंग च्या नावाखाली त्यांच्याशी गैरवर्तणूक होती. पेशंट सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत होती. नातेवाईकही त्या कुटुंबाशी चांगले वागत नव्हते. कारणही तसेच होते. संपर्कात आल्याने हा रोग होतोच होतो .परंतु , त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तूंपासूनही हा रोग पसरतो. यामुळे कोणीही मृत्यूला आव्हान देऊ शकत नव्हते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये चेकपोस्टवर ड्युटी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे तर हाल विचाराय सारखेच नव्हते. हात  सॅनीटाईज करून हाताचे सालटेही जात होते. महानगर आणि उपनगरातील गावाकडे आलेल्या प्रवाशांची शहानिशा  झाल्यावर त्याची नोंद करणे आणि लगेचच सॅनीटाईज करणे.  हा नित्यक्रम ठरलेला असायचा. मनामध्ये अनेक तर्क आणि वितरकांचे थैमान घोंगावत असायचं. ड्युटी करून आल्यावर घरात प्रवेश नसायचा. खळखळ  उकळलेल्या पाण्यामध्ये अंगावरील कपडे टाकायचे . चप्पल किंवा बूट ही दुसऱ्या पाण्यात टाकायचे. स्वच्छ आंघोळ करायची, तीही दोन तीन वेळा साबण लावून. नंतर कुठे घरात प्रवेश करायचा.एवढे होईपर्यंत,लहान मुलांनी वाट बघायची. त्यांना सुद्धा या  कोरोना ची जाणीव झाली होती. हा भयंकर विषाणू आहे. जवळ जाण्याने सुद्धा होतो. त्यामुळे बिचारी दुरूनच आपल्या वडिलांचा प्रताप पहायची परंतु बाहेरून आल्यानंतर सहज लाडाने गळ्यात मिठी मारण्याची त्यांची उत्कंठा मनातच मारून टाकत असत , कारण कोरोनाविषाणू. 

असे हे असणारे  कोरोना योद्धे कोरोणाशी लढताहेत.  त्यांच्यामुळेच आज सर्व भारत व जगातील सर्वच कोरोना योद्धे जीव धोक्यात घालून या समाजाचे रक्षण करत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मदत नको, किमान त्या  कुटुंबाची उपेक्षा करू नका! 


                WRITER #RAHUL DONGARDIVE


४ टिप्पण्या: