मंगळवार, ३० मार्च, २०२१

कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान

कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान



 एक वर्ष उलटून गेले. कोरोनाच्या संकटावर पाहिजे तितकं नियंत्रण मिळवता आलं नाही. जगातील प्रत्येक राष्ट्र  कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. प्रत्येक राष्ट्राने याच्यावर वेगवेगळ्या लस निर्माण केल्या. त्याचे लसीकरण  अत्यंत जलद गतीने जगभर सुरू आहे. भारतासारख्या देशाने तर लस निर्माण करून इतर देशांना वितरितही केली. प्रत्येक  राष्ट्रने या लसी वर विश्वास ठेवून, त्याचे लसीकरण सुरू केले. धावपळीच्या काळात लॉकडाऊन मुळे अनेक संसार उघड्यावर पडले, भुकेने भुकबळी गेले, अपघाताने रस्त्यावरती मजूर मेले. मोठमोठ्या शहरांमध्ये तर मृत  लोकांचे आकडे सुद्धा बाहेर आले नाही. अशा प्रकारची दयनीय अवस्था कोरोनाने करून ठेवली. गोरगरिबांचे जिने तर सोडाच त्यांना जीवन जगणे सुद्धा अवघड झाले. दोन वेळचे जेवण सुद्धा त्यांना मिळत नाही. अशा अनेक प्रकारच्या व्हिडीओ क्लिप सुद्धा व्हायरल होताना आपण पाहिल्या. लाखो लोक आपल्या दैनंदिन समस्यांशी लढत आहेत. वैयक्तिक दुःख कोणाला सांगावे? कोणाला नाही? दुःख ऐकणारा परमेश्वरच कुठे जाऊन बसला? असे नानातर्‍हेचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आज रेंगाळताना दिसतात. सर्वधर्म किंबहुना श्रद्धास्थाने पोकळ आशेने आशावाद जागवताना दिसत आहे. प्रत्येकाची  श्रद्धा मात्र अपार आहे. श्रद्धेपोटी माणूसच सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगताना दिसतो आहे. 

कोरोना आला जगामध्ये हाहाकार ही माजवला, सर्वांना वेठीस पकडून कासावीस करून सोडले. भयंकर असणारी ही महामारी मानवाच्या जीवावर बेतली. पण ..ज्यांचं आयुष्य सुरू व्हायचं होतं, त्यांच्या जीवावर सुद्धा बेसुमार पणे आग ओकत आहे. पूर्व प्राथमिक , प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदवीत्तर इत्यादी शिक्षणावर मात्र गदा टाकली गेली. शैक्षणिक नुकसान कधीही न भरून निघणारे आहे. मोठ्या मुलांचा प्रश्न थोडा निराळा आहे,ते समजूनही घेतील- आपत्ती सुरक्षितता. परंतु, जी बालवयातील मुले आहेत,त्यांचा प्रश्‍न थोडा गंभीर होतो आहे. छोटी छोटी मुलं शाळेमध्ये जाण्यासाठी उत्सुक होती. तिच आज शाळेत जायला नको म्हणून भितात. शाळा म्हटलं की कोरोना रोग त्यांना भयंकर वाटतो. शाळेच्या बाबतीत त्यांची अवस्था एखाद्या लाजाळू वनस्पती प्रमाणे झाली आहे. शाळेच्या बाबतीत घोर निराशा त्यांच्या मनात निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी सुसंस्कार आणि त्याचे संगोपन पाहिजे, त्या  ठिकाणी मात्र भीतीने जागा घेतली. जगातील सर्व शिक्षण व्यवस्था अडखळली. 


भारतासारख्या विशाल लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशात, दहावी-बारावी आणि पदवी-पदव्युत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा होऊ घातल्या. पूर्व प्राथमिक, प्राथमिक,माध्यमिक व इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमोशन देऊन, आर.टी. ई. अँक्ट 2009 कलम 16 नुसार पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. कोणताही अभ्यास न करता विद्यार्थी पास होऊ लागले. हा या समस्येवर तोडगा असला तरी, तो समस्येवरील उपाय नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीचा वापर करायचा ठरवल्यास प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचलेले आहे असे नाही.जर पोहोचलेले असले,तर त्याचा वापर प्रत्येकालाच करता येईल, असे नाही. ही एक शोकांतिकाच आहे. यावर उपाय एकच,  कोरोनाचा  कहर कधी संपेल ? आणि सर्व काही सुरळीत होईल. 

 शैक्षणिक नुकसानीचा अलेख पाहिला तर हा चढता आहे.  संख्यात्मक शिक्षणाला महत्व देण्यात येत आहे. कारण त्याशिवाय गत्यंतर नव्हते. संख्यात्मक वाढ झाली. परंतु गुणात्मक वाढ कधी होणार? गुणात्मक वाढही कायमस्वरूपी त्याठिकाणी संपली. असेच म्हणावे लागेल. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा आणि त्या सुविधेचे परिणाम कसे झाले ? हे सर्व जगाने पाहिले. शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम हा चांगला दिसून आला. परंतु, हा परिणाम ग्रामीण भागात चांगला नव्हता. आपला निर्णय काही ठिकाणी योग्य असू शकतो, पण..परिपूर्ण नाही. 



पूर्वप्राथमिक किंवा प्राथमिक  शिक्षणाच्या पहिल्या वर्गात जाणारे विद्यार्थी परत त्या वर्गात जाऊ शकतील, अशी शाश्वती देता येत नाही. एखाद्या वर्गात कॉम्प्रोमाईज करण्याचा प्रयत्न केला, तर आयुष्यातील पुढील एक वर्ष कायमचे गेले. आपल्या आयुष्याचं गणित जरी असलं, तरी पुढील येणारी परिस्थिती कशी राहील ? याची शाश्‍वती कोणीही देऊ शकणार नाही. आयुष्याच्या या गणितामध्ये आयुष्य राहील किंवा नाही याची हमी कोण देईल ? सकारात्मक पाहिले तर, उज्वल भविष्य असेल. हा गंभीर विषय थोडासा बाजूला ठेवून विचार करूयात. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमोशन दिल्याने त्याचा वर्ग पुढे जाईल. परंतु, त्या इयत्तेतील अभ्यास अधूराच राहिल. पहिली ला फक्त ॲडमिशन झालेला विद्यार्थी डायरेक्ट दुसरीत चालला त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार काय असेल? पाचवी पर्यंतचे शिक्षण किती अमूल्य असते ? याची जाण सर्व शिक्षण तज्ञांना आहे. यावर निर्णय कोणता होईल हेही सध्या तरी सांगता येत नाही. पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रमोशन द्यावे की नाही ? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीतच. 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची तीच बोंब. फक्त दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या नववी अकरावी वर्गाचे काय? अशा प्रश्नांची विचार विमर्श होत असताना, केंद्र सरकारने, केंद्रीय स्तरावरील दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. केंद्राच्या या निर्णयाचा विचार करून,  इतर राज्याबरोबर  दहावीपर्यंत परीक्षाच नको, अशी भूमिका घेऊन  दहावीच्या परीक्षा महाराष्ट्र सरकारनेही रद्द केल्या .अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. परीक्षेशिवाय प्रमोशन हे विद्यार्थ्याला स्वतः पचनी पडत नाही. याचे गंभीर परिणाम आपणास निट, जी, आय टी, आयआयटी किंवा तत्सम इतर परीक्षा यामध्ये सामान्य वर्गातील मुले पास होताना दिसली नाही. मार्गदर्शनाअभावी त्यांच्या जीवनक्रमाचा क्रम बदलून गेला. परीक्षा शिवाय मी पास होऊ शकतो, ही संकल्पना म्हणजे गतकाळातील विद्यार्थ्याचे दिवास्वप्नच! आज कोरोना आपत्तीने साक्षात उतरवले आहे.विद्यार्थ्याचे ज्ञानार्जनाचे काम अपूर्णच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील टर्निंग पॉईंट म्हणून या वर्गाकडे पाहिलं जातं. जीवनातील हा टर्न जर पूर्णतः ब्रेक होत असेल, तर यां नुकसानीस कारणीभूत फक्त कोरोना महामारी. आजचा असणारा विद्यार्थी, भविष्यातील त्यांच्या पाल्यांना  सांगण्यासाठी कथाच होईल. यापेक्षा वेगळं काय असू शकतं. 

पदवी , पदव्युत्तर पर्यंत विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षणाचा टर्निंग पॉईंट  चुकल्यानंतर उच्च शिक्षण आणि मोठ्या पदावर जाण्याची स्वप्न पाहत असतो. हजारो लाखो विद्यार्थी त्यामध्ये यशस्वी होतात. कोऱोनाने येथेही घात केला. गतवर्षी अक्षरशः पदवी आणि पदव्युत्तर च्या शेवटच्या वर्षाचे परीक्षा विद्यापीठाकडून ऑनलाइन घेण्यात आल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी 'ए प्लस' श्रेणी पास झाले. गोष्ट अभिनंदनीय आहे.पण..खरंच गुणात्मक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो . उच्च शिक्षण घेऊन मोठमोठी पदे धारण  करत असताना, खरोखरच न्याय मिळेल काय?  अर्थातच शैक्षणिक क्षेत्राला मोठी खीळ कोरोनामुळे बसली. कोरोना चा फटका शैक्षणिक क्षेत्राला जबरदस्त बसला. 

स्पर्धा परीक्षा मध्ये एज बार होत असताना विद्यार्थी निराशेने आपल्या भविष्यामध्ये डोकावत आहेत. आयुष्यभर केलेल्या यशाची तयारी covid-19 ने संपवून टाकली. गत वर्षापासून अनेक विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत होते . शासनाने सुद्धा या परीक्षा मागे पुढे ढकलत आजपर्यंत आणल्या. मार्च 2021 मध्ये मुहूर्त सापडला. परीक्षा घेण्यात आल्या . पोस्टिंग कधी मिळणार यासाठी, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये किती दिवस जातील? याचीही हमी नाही. यूपीएससी च्या  क्षेत्रातही तेच झाले. एकही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी शिक्षण क्षेत्राचे नुकसान झाले नाही. शतकातील सगळ्यात मोठा घात शिक्षण क्षेत्रावर झाला. अर्थातच भविष्यातील तज्ञ, सुज्ञ,शिल्पकारांवर घात झाला, हे कधीही न भरून येणारे नुकसान.

कोरोना ही मानव निर्मित जागतिक आपत्ती जरी असली, तिचा सामना तर करावाच लागेल. सामना करत असताना फायदे आणि तोटे दोन्ही बाजू आपण लक्षात ठेवायला हव्यात. झालेली शैक्षणिक नुकसान हे एक प्रकारे  मानवी विकासातील सगळ्यात मोठी हानी आहे. याचा पश्चाताप करत न बसता वास्तविक जीवनातील समस्या  समजुन घेऊन भविष्यातील यशोशिखरे काबीज करण्यासाठी प्रयत्नशील राहायला काहीच हरकत नाही . वास्तवातील जटिल परिस्थितीतून अनेक मोठ्या विभूती निर्माण होणार नाहीत कशावरून. सातत्य चिकाटी आणि कठीण परिश्रम करण्याची जिद्द आपल्यात असल्यास, कोणतेही शिखर पादाक्रांत केल्याशिवाय ही पिढी स्वस्त बसणार नाही. असा अटळ आत्मविश्वास मनामध्ये निर्माण होतो. समस्येवरही खात्रीशीर इलाज शास्त्रज्ञ शोधतील आणि हा विषाणू समूळ संपुष्टात येईल ही शक्यताही नाकारता येत नाही किंबहुना निर्माण करण्यात आलेली लस याचे सर्वश्रेष्ठ फलित आहे. शिक्षण प्रक्रिया अखंडित राहने ही काळाची गरज आहे. त्याशिवाय प्रगती करणे अशक्य आहे. 

                 WRITER #RAHUL DONGARDIVE

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा