बुधवार, १० मार्च, २०२१

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी ( भाग-5)

भाग: ५

वाजेल 'टाळ'तर..पडेल काळ!



स्वामी निगमानंद महाराज

निगमानंद माऊली येथे आले, आणि सर्व  परिसरामध्ये आनंद, नवचैतन्य प्रवाहित होऊ लागले .  जो तो येणाऱ्या  अपेक्षित असणाऱ्या , सत्याचा  शोध घेण्याचा प्रयत्न करु लागला.समाजामध्ये अनेक प्रकारची लोक होती. कोणी सकारात्मक तर , कोणी नकारात्मक होती. परंतु, असाही एक वर्ग होता की, तो फक्त या बदलाचे साक्षीदार होऊ पाहत होता. ग्रामीण भागात  'डोळ्यावर नको',  या मताचा प्रवाह व प्रभाव आहे . 

महंत भीमसिंह महाराज यांच्या नेतृत्वाने मच्छिंद्रनाथ गडाची उभारणी झाली.  निगमानंद माऊली हे निश्चित या अघोरी प्रथांना बंद करणार, हा त्यांचा  अटळ विश्वास . मायंबा वर चालत आलेली अशीच एक प्रथा, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी व ती पूर्ण झाल्यास अथवा होण्यासाठी 'पशूबळी' दिला जायचा. वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा, बंद करणे आव्हानच होते. बंद नाही केले तर, त्यात दिला जाणारा पशुबळी, त्यांच्या किंचाळ्या, ती दाहकता, बाबांच्या हृदयाला घायाळ करत असे, बाबा  विवष होत असत. असेही काही धर्ममार्तंड होते की, ज्यांना हा चालत असणारा क्रुर डाव आवडत असे.  कारण, त्या नावाखाली त्यांच्या वाईट चालीरीतींना पाठबळ मिळत असे. यामुळे लोक व्यसनाधीन बनले होते, वाममार्गाला लागले होते. सदगृहस्थ शोधणे तर सहज शक्य नव्हते . प्रत्येक जण आपल्या स्वच्छंदी लहरीप्रमाणे, कोणाच्याही भाव भावनांची कदर न करता वागत होता. अज्ञानी अंधकारी,  रुढी-परंपरांचा गैरवापर करणारे, व स्वतःच  एक भय प्रस्थापित करून, समाजावर निर्बंध लादनारांना, हे माहीत नव्हतं की, ही अंदाधुंद बंद होणार आहे. या वाईट व क्रूर प्रथा क्रुर प्रथा बंद होणार आहेत. कारण, परिसरात बाबांच्या रूपात एक अलौकिक शक्ती , संचार करते आहे. हे अज्ञानी लोकांना काय कळणार? 

       "धरूनी केशवा भावबळे |
                   पापिया न कळे काही केल्या || "

मायंबावर मच्छिंद्रगड निर्माण झाला इथून पुढे इथे आता पशुहत्या होणार नाही हा संदेश सर्व परिसरामध्ये व दुर्जनांमध्ये पोहोचला त्यांच्या पोटात पोटशूळ उठले त्यांना ही बाब नवखी होती बाबांविषयी त्यांच्या मनात चीड होती पण ती अंतर्मनात होती प्रत्यक्ष सामना करण्याचे धाडस कोणामध्येही नव्हते बाबांचा सडपातळ उंच पुरा देह व सूर्यालाही लाजवेल असे अलौकीक तेज सर्वांना दिपून टाकत होते प्रत्येक दुर्जनांना या अनुभवाची अनुभूती येत होती टीकाटिप्पणी करायची पण ती त्यांच्या पाठोपाठ समोर नाही अपप्रचार व शंकांचे काहूर माजून ठेवले याशिवाय दुर्जनाकडे होतेच काय? निंदकाचे घर असावे शेजारी यानुसार या अज्ञानी लोकांकडे बाबा दुर्लक्ष करत पशुहत्या बंद झालीच पाहिजे या निर्णयाने बाबा कठोर झाले त्यांनी सर्व या समाजातील आंधळ्या (अज्ञानाने ) लोकांना, भीक घातली नाही पशुहत्या बंद झाली सर्वांना बरे वाटले म्हणतात ना देव चांगल्या माणसाची परीक्षा घेतो त्यामध्ये संत सुद्धा आले देवाच्या प्रत्येक आव्हानाला जाहीरपणे स्वीकारणे आणि ते विजय रूपाने सिद्ध करणे हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे ते संत म्हणजे निगमानंद माऊली होत. 

मच्छिंद्रनाथ गडावर आता भजनाला सुरुवात झाली. भजनाचा अविभाज्य घटक म्हणजे 'टाळ' हा  टाळ वाजल्याशिवाय   भजन ते काय ? कसे कळणार? नेमका या दुष्टप्रवृत्तीच्या लोकांनी, 'टाळा' वर आघात केला. नको त्या वावड्या व संभ्रम समाजात पेरण्यास सुरुवात केली. टाळ् वाद्य समोर ठेवून, एका अमंगळ वाक्याला सुरुवात केली, ' टाळ वाजल्याने काळ पडेल '. हा गैरसमज येवढा पसरला कि, गडावर टाळ न वाजण्याचा, प्रत्यक्ष प्रत्यय सर्वांना येऊ लागला. अशा गैरसमजांना सद्गुणी लोकांना बळी जाऊ देतील, बाबा. नाही. यावर त्यांनी समय सूचकते नुसार ,भजनाचा आयाम बदलला. दुष्ट लोकांच्या माथी हीच लाठी होती. परंतु , अज्ञानी लोकांच्या लक्षात आले नाही . देवाचे नामस्मरण ही बाब त्या मुढांना कळणार नाही. 

 बाबांना या दुष्टांच्या अपप्रचाराबद्दल जाणीव होती. त्यांनी त्यांच्या विरोधात अध्यात्मिक बदल करण्याचा स्वयम् निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्याशी वाद घालण्याचा मानस न ठेवता,संवाद साधत, ज्ञानामृत देत, त्यांच्याबद्दल घडवण्याचा प्रयत्न केला.'मुढाशी काय समजावणे ', यानुसार, बदल जरा समोर होत असे. " कुत्र्याचे शेपूट. ..", असा त्या दुराचारी दुर्जनांचा स्वभाव होता. बाबांच्या अमृतवाणीने सद्गुणी लोक जवळ येऊ लागले,त्या लोकांना नामस्मरण व भक्तीचा मार्ग आवडू लागला. परंतु ,धर्ममार्तंडाच्या,'टाळ वाजल्याने काळ पडेल', या दुष्टप्रवृत्तीचा प्रभाव त्यांना रोखत होता. ही गोष्ट बाबांना कळल्यावर, त्यांनी भजनही टाळावीना होऊ शकते, हा आत्मविश्वास दिला. सुरुवातीला याचा आरंभ करूयात असे ठरवले. 

टाळावीना भजन कसे? हा या सद्गुणी ग्रहस्ताना पडलेला प्रश्न. बाबांनी भजनाला सुरुवात केली भजन होते,कबीरपंथी! एक तारी भजनाला सुरुवात झाली. भजनामध्ये बाबा तल्लीन होत असत. भक्त जनाला हे प्रथम नवखे होते. कबीर पंथी  भजना मधून सुरुवात झाली. टाळाच्या काळावर हा उपाय होता. कारण यामुळेच टाळांचा काळ येणार होता. या निर्वीवाद सत्याची जाणीव बाबांना होती. एक तारी, कबीर पंथी भजनाने चांगलाच सूर आवळला होता. आगळ्यावेगळ्या भजनाने लोक मोहित झाले होते. भगवंत नामस्मरणाची अवीट गोडी प्रत्येकाच्या नसानसामध्ये सळसळायला लागली. कधी सायंकाळ होते? प्रभू नामस्मरणाला केव्हा सुरुवात होते? असे नव भजनी मंडळीला झाले होते.  भजनाचा नित्यक्रम सुरू झाला. 

एकतारी भजनाची सर्वांना गोडी लागली. टाळ नसल्याने सर्व भजनीजनात आनंद संचारला. वरचेवर भजनी मंडळ वाढत होते. कबीर पंथी भजनातून,"हरी मुखे म्हणा"..तुकारामाचे अभंग, लोकांच्या मुखातून, एकतारी मधून ,गाऊ लागले वाजू लागले. कबीर पंथातून कधी महाराष्ट्राच्या भजनाची सुरुवात झाली, हे त्या भजन कर्त्या मंडळींना  कळले सुद्धा नाही. गडावर गावामध्ये नामस्मरण व हरिनामाचा जप सुरु झाला. प्रत्येकाची भजनाची आवड एवढी वाढली की,भजनामुळे त्यांना मानाचे स्थान मिळू लागले.भजनीमंडळ - बाबांच्या मुळे, हे शक्य झाले. स्वतः  मनन चिंतन करत असत, बाबांचा शब्द त्यांना मोलाचा वाटू लागला. 

      "भक्ती ज्ञानाची माऊली , करी कृपेची सावली"

भजनात टाळ वाजला तर बघुयात काय होते अन प्रत्यक्ष भजनात टाळ वाजण्यास सुरुवात झाली-

 "देव पहाया सी गेलो, देव होऊनी ठेलो"

असा नवीन अभ्यास रुपी अनुभव त्या वारकरी भजनी मंडळाने अनुभवला. भजनाचा आत्मा टाळ भजनामध्ये वाजू लागला. साक्षात भगवंत आपल्यासोबत भजन करतो आहे.  याचे गोड कौतुक होऊ लागले. टाळा शिवाय भजनाला पर्याय नाही. पशुहत्या बंदी नंतर पेरले गेलेले विष , ज्ञानरूपी अमृताने नष्ट झाले. बाबा मधुर  वाणीतून-

" मुंगी आणि राव | आम्हा सारखाची जीव|"

ही संत तुकारामांची भावना पदोपदी सत्य कशी आहे हे सांगू लागले जीव मग तो मुंगी चा असो अथवा कोणा  एका मोठ्या व्यक्तीचा तो आमच्यासाठी सारखाच आहे म्हणून पशुहत्या नको हा शुभ संदेश जनतेने स्वीकारला

आज या छोट्याशा रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. भजन, नामसंकीर्तन, प्रवचने यांनी सर्व परिसर, जिल्हा भक्तिमार्गाने न्हाऊन निघाला आहे.  याच ठिकाणी 41 व्या सप्ताहाची परंपरा  पार पडत आहे. याच भूमीत टाळांचा निनाद अखंडपणे सुरू आहे. सर्व परिसर प्रफुल्लित झाला आहे. ज्ञानाचे अमृत सुरू आहे. प्रत्येक ज्ञानाच्या भुकेने अतृप्‍त भक्त, ज्ञानामृताने तृप्त होत आहे. असा निगमानंद माऊलींचा सोहळा सुरू आहे. बाबा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे संयोजन व  देखरेखीच्या  कारभारामध्ये प्रत्यक्ष लक्ष ठेवतात.   वंदनीय हरिभक्त परायण जनार्दन महाराज बाबांच्या छत्रछायेखाली, एक अकल्पनीय व्यक्तिमत्व साकारत आहे. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांनी चालवलेल्या सत कार्यास, सहकार्य व मनोभावे भक्ती करतात,जनार्दन महाराज. 

"एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ"

असा वारकरी व भजनी बाबांनी तयार केला. धर्ममार्तंडांनी पेरलेली अंधश्रद्धा बाबांनी पूर्ण झुगारून, वास्तव सत्य मांडले.

सर्व जणास-

"तमसो मा ज्योतिर्गमय "हा मार्ग दाखवला! 



Writer : RAHUL DONGARDIVE

२ टिप्पण्या: